Mango Orchard Damage : जळालेल्या आंबा बागेचे केवळ ‘पंचनामे पे पंचनामे’

Mango Orchard : ‘महावितरण’कडून शेतकऱ्याची पिळवणूक; भरपाईस टाळाटाळ
Mango Orchard Damage
Mango Orchard DamageAgrowon
Published on
Updated on

ॲग्रोवन वृत्तसेवा
Kolhapur News : मुंबई : अंगमेहनत करून देश-विदेशी जातीच्या साडेचारशेहून अधिक आंबा रोपांची लागवड केली. लहान मुलासारखे संगोपन केले. मोहराने झाडेही डवरली, पण धाकधूक होती तेच घडले. शेतातून ‘महावितरण’च्या अनास्थेमुळे १० एकरांवरील आंब्यांची बाग आणि ठिबक सिंचनाचे साहित्य जळून खाक झाले.

या आधी तीन वेळा पंचनामा होऊनही आता पुन्हा पंचनाम्याचे आदेश ‘महावितरण’ने काढले आहेत. १० लाखांची मागितलेली भरपाई अद्याप दूरच, पण शेतकऱ्याच्या नशिबी हेलपाटे मात्र नित्याचेच झाले आहेत.

राधानगरी तालुक्यातील वाकीघोल परिसरात सुमन चौगुले आणि मारुती चौगुले या वयोवृद्ध दांपत्याला ‘महावितरण’ने ठेंगा दाखविल्याने पदरमोड करून शेतीत पुन्हा बाग फुलवावी लागत आहे. वाकीघोल हा अतिशय दुर्गम भाग. काळम्मावाडी धरणाच्या बुडीत क्षेत्राला लागून चौगुले यांची शेतजमीन आहे. शेतीची आवड असल्याने त्यांनी शेतीत अनेक प्रयोग केले आहेत. त्यांच्या मालकीच्या शेतीत साडेचारशेहून अधिक आंबा रोपांची लागवड केली होती.

यात अनेक विदेशी जातीही होत्या. पूर्ण वाढ झालेल्या या झाडांना मोहर आल्यानंतर ३ एप्रिल २०१९ रोजी ‘महावितरण’च्या वीज वाहिनीला शॉर्ट सर्किट होऊन बागेला आग लागली. या बागेत केळीचीही लागवड झाली होती. तसेच केळीच्या पानांचे आच्छादन केल्यामुळे शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आग क्षणार्धात पसरली आणि बाग खाक झाली. शेजारचा ऊसही जळाला. पाइपलाइन, मोटर आदींचेही नुकसान झाले.

Mango Orchard Damage
Mango crop Advisory : मोहोर अवस्थेतील आंबा बागेचे व्यवस्थापन

मुळात चौगुले यांनी ‘महावितरण’कडे वारंवार मागणी करूनही लोंबणाऱ्या तारांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्यामुळे ही घटना घडली होती. ‘महावितरण’च्या ठेकेदाराने दोन खांबांमधील अंतर लांब ठेवल्याने तारा लोंबकळत होत्या.

त्यासंदर्भातील वस्तुस्थिती वारंवार लक्षात आणून देऊनही तारांची दुरुस्ती केली गेली नाही. या तारा अजूनही लोंबकळतच आहेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागून अडीच लाखांचे ठिबक सिंचन संचही जळून खाक झाले.

सरकारी दराप्रमाणे वन विभाग पूर्ण वाढ झालेल्या झाडाला सहा हजार रुपये देतो. मात्र आता चौगुले यांना ‘महावितरण’ने अडीच लाख रुपयांचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, त्याबाबतही अनिश्‍चितता आहे. वारंवार मागणी केल्यानंतर फेब्रुवारी २०२१ मध्ये त्यांना ‘महावितरण’ने नव्याने पंचनाम्याची प्रत मागितली आहे. त्याआधी तीन वेळा पंचनामा केला होता.

वास्तविक आग लागल्यानंतर झालेल्या पंचनाम्याची प्रत असताना पुन्हा नव्याने पंचनामा करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. २०१९ मध्ये लागलेल्या आगीचा २०२१ मध्ये तलाठी आणि ‘महावितरण’च्या अधिकाऱ्याने स्थळ पंचनामा करून अहवाल सादर करावा, असे आदेश दिले आहेत. तसेच आग लागलेल्या ठिकाणचे फोटोही सादर करण्यास सांगितले आहेत. या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता केली असूनही अद्याप चौगुले यांना पैसे मिळालेले नाहीत.

मेहनत करून बाग उभी केली होती. बागेत लोंबणाऱ्या तारांबाबत ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांना सांगूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले. त्यानंतर जे व्हायचे ते झाले.

आग लागून बाग खाक झाली. आता किमान भरपाई मिळेल म्हणून आम्ही खेटे मारत आहोत पण पैसे दिले जात नाहीत.
- मारुती चौगुले, शेतकरी, वाकीघोल, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com