Drip Irrigation : ठिबक सिंचन संचाची देखभाल

Drip Irrigation Maintenance : ठिबक सिंचन संच व्यवस्थितपणे सुरू राहण्यासाठी पाणी गाळण यंत्रणा आणि त्याची कार्यक्षमता, आवश्यक दाब, दाब तसेच प्रवाह यांचा परस्पर संबंध लक्षात घ्यावा.
Drip Irrigation
Drip Irrigation Agrowon

अरुण देशमुख
Crop Irrigation : ठिबक सिंचन संच व्यवस्थितपणे सुरू राहण्यासाठी पाणी गाळण यंत्रणा आणि त्याची कार्यक्षमता, आवश्यक दाब, दाब तसेच प्रवाह यांचा परस्पर संबंध लक्षात घ्यावा. ठिबक सिंचन संच रासायनिक द्रावणाने क्षार, तसेच खनिज पदार्थ धुऊन काढण्याची प्रक्रिया या बाबी महत्त्वाच्या आहेत.

सध्याच्या परिस्थितीमध्ये उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यासाठी ठिबक सिंचन संचाचे योग्य व्यवस्थापन अपेक्षित आहे. ठिबक सिंचन संच वापरादरम्यान भेडसावणाऱ्या प्रमुख समस्यामध्ये ड्रीपर बंद होऊन त्यांचा प्रवाह कमी होणे, वीज कमी जास्त होणे त्यामुळे संच चालण्यासाठी पुरेसा दाब न मिळणे, त्यामुळे शेतात सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात पाणी व खते न मिळणे, ठिबक सिंचनातील लोखंडी भाग गंजणे यांचा समावेश होतो. ठिबक सिंचन संचामध्ये पंपसेट व इलेक्ट्रिक मोटार, मेन लाइन (मुख्य वाहिनी), सबमेन लाइन (उपमुख्य वाहिनी), लॅटरल, ड्रीपर, ड्रीपलाइन, कंट्रोल व्हॉल्व्ह (नियंत्रण झडपा), खत संयंत्र (खत टाकी/ व्हेंचुरी/ इंजेक्शन पंप), दाबमापक या प्रमुख घटकांचा समावेश होतो.

ठिबक सिंचन संचाची निवड
  सिंचन पद्धतीतील सर्व घटकांना आयएसआय मार्क असणे जरुरीचे आहे.
  जमिनीचा प्रकार, पिकातील अंतर, जमिनीचा चढ उतार, पाण्याची गुणवत्ता, पिकाची पाण्याची गरज या सर्व बाबींचा विचार करून इनलाइन किंवा ऑनलाइन ड्रीपची निवड करावी.
  पाण्यात भौतिक पदार्थ तसेच शेवाळ जास्त प्रमाणात असल्यास वाळूच्या गाळण टाकीचा वापर करावा.


  खोल कूपनलिकेमधील किंवा नदीतील पाणी वापरत असल्यास पाण्यामध्ये वाळूचे बारीक कण येण्याची शक्यता असते. अशा ठिकाणी हायड्रोसायक्लोन फिल्टरचा वापर करावा.
  ठिबक सिंचन संचाचे सर्व सुटे भाग बाजारपेठेत सहज उपलब्ध आहेत याची खात्री करून घ्यावी.
 

Drip Irrigation
Drip Irrigation : ठिबक ‘ऑटोमेशन’साठी तज्ज्ञ समिती स्थापन

उन्हाळ्यात पाट पाणी पद्धतीने सिंचित होत असलेल्या क्षेत्राच्या दुप्पट क्षेत्रासाठी ठिबक सिंचन संचाची उभारणी करावी.
  ठिबक सिंचन पद्धतीमध्ये इनलाइन ड्रीप पद्धतीचा वापर करावा. ड्रीपरमधील अंतर आणि ड्रीपरचा प्रवाह जमिनीच्या प्रकारानुसार आणि पिकाच्या पाण्याच्या गरजेनुसार निश्‍चित करावा.
  जास्त खोलीच्या काळ्या जमिनीमध्ये दोन ड्रीपरमधील अंतर ५० सेंमी आणि ड्रीपरचा प्रवाह ताशी २ ते ३ लिटर असावा.

मध्यम खोलीच्या जमिनीत दोन ड्रीपरमधील अंतर ४० सेंमी आणि ड्रीपरचा प्रवाह ताशी २ लिटर असावा. कमी खोलीच्या हलक्या जमिनीत दोन ड्रीपरमधील अंतर ३० सेंमी आणि ड्रीपरचा प्रवाह ताशी १ किंवा १.६ लिटर इतका असावा.
  ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करताना ४० सेंमी अंतरावर दोन लिटर प्रति तास प्रवाहाचा ड्रीपलाइनचा वापर केल्यास १६ मिमी व्यासाची इनलाइन ड्रीप २५० फूट लांबीपर्यंत वापरणे फायदेशीर ठरते.  
 

Drip Irrigation
Drip Irrigation : उसासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा

पृष्ठभागाखालील ठिबक सिंचनासाठी दाब नियंत्रित इनलाइन ड्रीप वापरणे फायदेशीर आहे. दोन ड्रीपरमधील अंतर ४० सेंमी आणि ड्रीपरचा प्रवाह दर ताशी १.६ किंवा २ लिटर असावा. एका शिफ्टमध्ये जास्त क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी ताशी एक लिटर प्रवाह देणारे ड्रीपर असणारी इनलाइन वापरणे फायदेशीर आहे.


  एकदम सपाट जमिनीमध्ये दाबनियंत्रण नसलेली ड्रीपलाइन वापरावी.
  महिन्यातून एकदा न चुकता ड्रीपलाइन फ्लश करण्याअगोदर सबमेन फ्लश करून घ्याव्यात. त्यानंतर ड्रीपलाइन जास्त दाबाखाली फ्लश कराव्यात, ज्यामुळे त्यात साठलेली घाण सहजपणे निघून जाईल.
 

पाणी परीक्षण अहवालानुसार आम्ल प्रक्रिया करावी.
  पृष्ठभागाखालील ठिबक सिंचन पद्धतीमध्ये उसाच्या मुळ्या ठिबक लाइनमध्ये घुसू नयेत म्हणून प्रक्रिया करणे आवश्यक असते.
संच चालविण्यासाठीची काळजी  
  योग्य दाबावर ठिबक संच चालवावा.
  हंगामानुसार पिकाची पाण्याची गरज वेगवेगळी असते. संच चालविण्याचा कालावधीही वेगवेगळा असतो. साधारणपणे उन्हाळ्यामध्ये ३ तास, हिवाळ्यामध्ये २ तास आणि पावसाळ्यात पाऊसमान बघून आवश्यकतेनुसार एक तास ठिबक सिंचन संच सुरू ठेवावा.
  पावसाळ्यात ठिबक सिंचनातून पीकवाढीच्या अवस्थेनुसार योग्य ती खते पिकांच्या मुळांशी कार्यक्षम पद्धतीने देण्यासाठी ठिबक सिंचन गरजेनुसार चालविणे फार उपयुक्त ठरते.
  आठवड्यातून एकदा संपूर्ण संचाची आणि सर्व फिटिंग व्यवस्थित आहेत किंवा नाहीत याची खात्री करून घ्यावी. गरज असेल तिथे लगेच दुरुस्ती करून घ्यावी.  


  लॅटरल सरळ रेषेत अंथरलेली असावी. एंड कॅप व्यवस्थित बसविलेली असावी.
  साधारणपणे दोन महिन्यांतून एकदा तोट्यामधून मिळणारा प्रवाह तपासावा.
  व्हेंच्यूरीमधून फक्त पाण्यात विरघळणारी किंवा द्रवरूप खते द्यावीत. खत व पाणी यांचे प्रमाण साधारणत: १:१० असावे.

दररोज करावयाची देखभाल  
  डिझाइन केलेल्या दाबानुसार फिल्टर इनलेटवर आवश्यक दाब असल्याची खात्री करावी.
  वाळूची गाळण यंत्रणा फ्लशिंग पद्धतीने साफ करावी.
  सबमेनवरील फ्लश व्हॉल्व्ह खोलून सबमेन साफ करावी.
  जाळीचा फिल्टर, डिस्क फिल्टर फ्लश करावा.
आठवड्यातून एकदा करावयाची देखभाल  


धातूची गाळण यंत्रणा, डिस्क फिल्टर :  धातूच्या गाळण यंत्रणा किंवा डिस्क फिल्टरच्या चकत्या काढून जास्त दाबाच्या पाण्याखाली स्वच्छ धुवाव्यात.
मुख्य नळी व उपमुख्य नळी : मुख्य व उपमुख्य नळ्यांच्या शेवटच्या तोंडाचे फ्लश व्हॉल्व्ह सोडून नेहमीपेक्षा दीड पट जास्त दाबाने साफ कराव्यात.
लॅटरल : शेवटच्या तोंडाचे एंड कॅप काढून नेहमीपेक्षा दीड पट ते दुप्पट दाबाच्या पाण्याने फ्लश कराव्यात.

ड्रीपर : पाणी नेहमीपेक्षा जास्त दाबाने व वेगाने सोडावे म्हणजे छिद्रांच्या तोंडाशी अडकलेली घाण किंवा मातीचे कण निघून जातील.
एक ते दीड महिन्याने करावयाची देखभाल
  पाण्याची प्रतवारी चांगली असल्यास किंवा कूपनलिकेचे पाणी असल्यास मुख्य नळी / उपमुख्य नळी /लहान जलवाहिन्या एक ते दीड महिन्यांनी साधारणपणे दीड पट जास्त दाबाने फ्लश करून स्वच्छ कराव्यात.
सहा महिन्यांनी करावयाची देखभाल  
  बंद पडलेल्या तोट्या एक टक्का आम्लाच्या पाण्याने साफ कराव्यात.
  जैविक कारणाने तोट्या बंद पडल्या असतील तर सहा महिन्यांतून एकदा क्लोरिनची प्रक्रिया करावी.


  पाण्यातील विद्राव्य क्षारांमुळे तोट्या बंद होत असतील, तर आवश्यकतेप्रमाणे आम्ल प्रक्रिया करावी.
  लहान जलवाहिन्यात शेवाळाची वाढ होत असेल तर मोरचुदाची प्रक्रिया करावी.  
वर्षातून एकदा करावयाची देखभाल  
  एक वर्ष संच सुरू असल्याने सतत घर्षण झाल्यामुळे फिल्टरमधील वाळूचे कण गोलाकार झाल्यामुळे  फिल्टरमधील वाळू बदलावी.
  संचातील काही घटक खराब झाले असतील, तर ते दुरुस्त करावेत किंवा बदलावेत.
  पंपाची कार्यक्षमता तपासावी. पंप उत्पादकांनी दिलेल्या सूचनांनुसार पंपाची आवश्यक देखभाल करावी.

अरुण देशमुख,  ९५४५४५६९०२
(प्रमुख, कृषिविद्या विभाग, नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रा.लि., पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com