Rabi Sowing : ज्वारी काहीशी वाढली; गहू, हरभरा, मका कमीच

Rabi Season : राज्यात रब्बी हंगामातील बहुतांश पिकांचा पेरणी कालावधी संपत आला आहे. मात्र अजूनही राज्यात रब्बीची पेरणी सरासरीच्या जवळ गेलेली नाही.
Rabi Sowing
Rabi SowingAgrowon
Published on
Updated on

Nagar News : राज्यात रब्बी हंगामातील बहुतांश पिकांचा पेरणी कालावधी संपत आला आहे. मात्र अजूनही राज्यात रब्बीची पेरणी सरासरीच्या जवळ गेलेली नाही. १२ डिसेंबरपर्यंत सरासरीच्या ६९ टक्केच पेरणी झाली आहे. ज्वारीची गतवर्षीपेक्षा केवळ ३७ हजार हेक्टर अधिक पेरणी झाली आहे. गहू, हरभरा, मका, तेलबियांसह अन्य पिकांचे पेरणी मात्र मागेच आहे. आतापर्यंत राज्यात ३७ लाख २० हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे.

राज्यात यंदाच्या पावसाळ्यात पाऊस नसल्याने अनेक भागांत रब्बी पेरण्याला अडचणी निर्माण झाल्या होत्या. आता जवळपास बहुतांश पिकांचा पेरणी कालावधी संपला आहे. रब्बीचे राज्याचे ५३ लाख ९६ हजार ९६९ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्यापैकी आतापर्यंत ६९ टक्के म्हणजे ३७ लाख १९ हजार ५३७ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

रब्बीत सर्वाधिक ज्वारीचे सरासरी १७ लाख ५३ हजार ११८ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी यंदा १२ डिसेंबरपर्यंत १२ लाख १३ हजार ६५४ हेक्टरवर म्हणजे ७० टक्के पेरणी झाली आहे. यंदा टंचाईची स्थिती असल्याने कोरडवाहू भागात कमी पाण्यावर येणारे पीक म्हणून ज्वारीचे क्षेत्र वाढेल, असा कृषी विभागाचा अंदाज होता.

Rabi Sowing
Rabi Sowing : खानदेशात रब्बीची पेरणी अंतिम टप्प्यात

रब्बी पेरणीच्या सुरुवातीच्या काळात ज्वारीचे क्षेत्र वेगाने वाढतही होते, मात्र मध्यंतरी झालेल्या पावसाने ज्या भागात पाणी उपलब्ध झाले तेथे पुन्हा ज्वारी पेरणीला ब्रेक लागला आणि गहू, कांदा, हरभरा याकडे शेतकरी वळल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षी ज्वारीची आतापर्यंत ११ लाख ७६ हजार ८३९ हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा गतवर्षीपेक्षा ३६ हजार ८८५ हेक्टरवर अधिक पेरणी झाली आहे.

यंदा ज्वारीची पेरणी हिंगोली, अमरावती, वर्धा या जिल्ह्यांत सरासरीपेक्षा जास्त झालेली असली, तरी तेथील सरासरी क्षेत्र कमी आहे. सोलापूर, त्यापाठोपाठ नगर, बीड, धाराशिव जिल्ह्यांत ज्वारीचे सर्वाधिक पेरणी क्षेत्र आहे. सांगली, सातारा, पुणे, जालना, परभणी जिल्ह्यांत यंदा ज्वारीचे क्षेत्र बऱ्यापैकी आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलडाणा, चंद्रपूर, कोल्हापूर, नांदेडसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत ज्वारीचे पेरणीक्षेत्र कमी आहे.

रब्बीची पेरणी गतवर्षीपेक्षा पावणे आठ लाख हेक्टरने कमी आहे. गतवर्षी आतापर्यंत ४५ लाख १ हजार ७९७ हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा गतवर्षीपेक्षा हरभऱ्याचे क्षेत्र सव्वापाच लाख हेक्टर, मक्याचे ६५ हजार, तर गव्हाचेही दोन लाख हेक्टर क्षेत्र कमी आहे. गव्हाची चार लाख ७० हजार ५४९ हेक्टरवर, तर हरभऱ्याची १७ लाख ५३ हजार ११२ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

Rabi Sowing
Rabi Sowing : नगरला दोन लाख ७१ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी

बहुतांश पिकांचा पेरणी कालावधी संपला

यंदा ओलाव्याच्या कमतरतेमुळे पेरणी रखडतच झाली. ज्वारी, मका, हरभरा, तेलबियांची पेरणी १५ नोव्हेबरपर्यंत होत असते. त्यातही अपवादात्मक स्थितीत १५ डिसेंबरपर्यंत ज्वारी पेरली जाते, मात्र उशिराने झालेल्या पेऱ्यात उत्पादनात नेहमीच्या तुलनेत ४० टक्क्यापर्यंत घट येते.

गव्हाची डिसेंबरअखेरपर्यंत पेरणी होते. आता रब्बीतील बहुतांश पिकांचा पेरणी कालावधी संपला आहे. अनेक भागांत कापसाची वेचणी पूर्णतः संपल्याने त्यात ज्वारीची पेरणी केली आहे. मात्र रब्बीतील मुख्य पिकांच्या पेरणीचा कालावधी संपला आहे. त्यामुळे यंदाही सरासरीच्या आतच रब्बीची पेरणी राहण्याचा अंदाज कृषी विभागातून व्यक्त होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com