Solapur News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठवड्यात अडीच हजार रुपयांचा सरासरी भाव मिळणारा कांदा मंगळवारी (ता. २९) १५०० रुपये क्विंटल दराने विकला. कांद्याची आवक वाढल्याने दर कमी झाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले. मंगळवारी बाजार समितीत तब्बल ७८० गाड्या कांदा आला होता. त्या कांद्याला सरासरी भाव दीड हजार रुपये तर सर्वाधिक चार हजारांपर्यंत मिळाला.
सोलापूर जिल्ह्यातील जवळपास ३२ हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे. शेजारील जिल्ह्यात व कर्नाटकातही कांदा लागवड जास्त आहे. पावसाळ्याच्या सुरवातीला अनेकांनी कांदा लागवड केली, पण सततच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचा कांदा जागेवरच खराब झाला.
पावसामुळे ज्या शेतकऱ्यांना वेळेत कांदा काढता आला नाही, त्यांचा काळपट पडलेला कांदा २०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल दराने विकला जात आहे. सप्टेंबरमध्ये अनेकांनी पावसाचा अंदाज घेऊन कांदा लागवड केली. तो कांदा नोव्हेंबरअखेर बाजारात विक्रीसाठी येईल, त्यावेळी आवक आणखी वाढणार आहे.
सर्वाधिक भाव जरी पाच हजारांवर असला, तरी तो अगदी थोड्या कांद्यासाठी मिळतो. मागील आठवड्याच्या तुलनेत सध्या कांद्याचा सरासरी भाव एक हजार रुपयांनी कमी झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढल्याची स्थिती आहे.
२० हजार रुपयेच मिळतात रोखीने
सोलापूर बाजार समितीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून अवघे २० हजार रुपये रोखीने दिले जातात. त्यांच्या विकलेल्या कांद्याची किंमत ५० हजार असो की एक लाख, तरीदेखील त्यांना १५ ते २० हजारांपर्यंतच रोखीने दिले जातात. धक्कादायक बाब म्हणजे, व्यापाऱ्यांकडून पणन कायद्यातील तरतुदी पायदळी तुडवून उर्वरित रकमेसाठी १५ ते २० दिवसांच्या मुदतीचा धनादेश दिला जातो.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.