Pune News : जिल्ह्यात खेड तालुका हा कांद्याचा आगार समजला जातो; परंतु यंदा पावसाने ओढ दिली आहे, तसेच सोयाबीन पिकाची उशिरा काढणी करण्यात आली. त्यामुळे रब्बी हंगामात कांदा लागवडीच्या क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. कांदा लागवड क्षेत्रात मोठी घट झाली असून, खेडमध्ये सुमारे २५ ते ३० टक्के कांदाक्षेत्र घटण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
खेड तालुक्यात व इतर तालुक्यात साधारणपणे १५ ऑगस्टला कांद्याची लागवड सुरू होते. यावर्षी दसऱ्याला कांद्याची लागवड काही शेतकऱ्यांनी सुरू केली. लागवड दोन महिने उशिरा सुरू झाली. त्यामुळे कांदा पीक उशिरा हातात येणार आहे. मात्र पावसाअभावी कांदा लागवड क्षेत्रात मोठी घट झाली आहे.
कांदा लागवडीत खेड तालुका आघाडीवर असतो. अजूनही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नसल्याने कांदा लागवडीला खोळंबा निर्माण झाला आहे. कांदा रोपांसाठी बियाणे टाकण्यासाठी पाणीच उपलब्ध नसल्याने रोपे तयार झालेली नाही, त्यामुळे कांदा लागवडीत घट होत असून शेतकऱ्यांना परतीच्या पावसाची आशा आहे.
जिल्ह्यात शिरूर, आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, हवेली तालुक्यात रब्बी हंगामात तसेच उन्हाळी हंगामात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते. यंदा जून, जुलै महिन्यात थोड्याफार झालेल्या पावसावर तसेच विहिरीत उपलब्ध पाण्यावर शेतकऱ्यांनी कांदा बियाणे टाकून रोपे तयार केली, असे शेतकरी गजानन गांडेकर यांनी सांगितले.
ओतूरच्या बाजारात कांद्याला साठ रुपये बाजारभाव
येथील कृषिउत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात उच्च प्रतीच्या कांद्याला किलोला साठ रूपया पेक्षा जास्त बाजारभाव मिळाला आहे. गुरुवारी (ता. २६) झालेल्या या उपबाजारात २६४२१ कांदा पिशव्यांची आवक झाली असून, मागील बाजाराच्या तुलनेत ३४८८ कांदा पिशवीची आवक झाली आहे.
यामध्ये उच्च प्रतीच्या कांद्याच्या बाजारभावात किलोला १५ ते २० रुपये वाढ झाल्याची माहिती कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे व संचालक तुषार थोरात यांनी दिली. या बाजारात प्रती दहा किलोला सुपर गोळा पाच सहा लॉट ६०० ते ६११ रुपये, तर गोळा कांदे ५५० ते ६०० रुपये, सुपर कांदे ४८० ते ५५०, गोल्टी,गोलटा कांदा ३३० ते ४००, बदला कांदा २०० ते ४०० असा बाजारभाव मिळाला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.