Krushnat Khot : कोलाहलातील शांतता शोधता आली पाहिजे

Article by Balasaheb Patil : साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या ‘रिंगाण’ कादंबरीचे लेखक कृष्णात खोत यांनी लेखनाचा, त्यामागील भूमिकेचा पट उलगडला.
Krushnat Khot
Krushnat KhotAgrowon

बाळासाहेब पाटील


Interview with Krishnat Khot : रिंगाण कादंबरीत तुम्ही विस्थापितांच्या जगण्याचा पट मांडला आहे. ते मांडताना म्हैस आणि देवाप्पा यांच्यातील संघर्ष हे सूत्र मांडलेय. ही तादात्म्याची, तुटण्याची नेमकी प्रक्रिया काय आहे?
- माझ्या रिंगाण कादंबरीचा नायक देवाप्पा कोण आहे? तो सगळ्यांपासून तुटलेला माणूस आहे. अशी अनेक माणसं असतील. त्याचं विश्‍व वेगळं आहे. चांदोली धरणग्रस्तांच्या मुलांसाठी क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी चालविलेल्या वसतिगृहावर मी एक वर्ष रेक्टर होतो.

तेथे मुलांशी, त्यांना भेटायला येणाऱ्या पालकांशी बोलायचो. त्या बोलण्यातल्या अनेक गोष्टी कादंबरीत उतरल्या आहेत. १९९० ते ९३ या काळात मी तो परिसर अनुभवला. तिथल्या मुलांशी, माणसांशी एकरूप होऊन बोललो ते सगळं कुठतरी आत साठत गेलं. कादंबरीत आलेला प्रदेश, पर्यावरण, वातावरण हे सगळं या परिसरातील आहे.

मी झोळंबीपर्यंत चालत गेलो तेव्हा तिथं पडलेली घरं, त्यावर उगवलेलं गवत, तिथला तो कुंड पाहून मला आत पोटात कालवल्यासारखं झालं होतं. रौंदाळा कादंबरी लिहीत असताना चांदोलीच्या धरणावरील गेस्ट हाउसला होतो. माझे नातेवाईक तिथे नोकरीला असल्याने मला जंगलात जायची मुभा होती. कधी मोटारसायकल कधी चालत जिथवर जाता येतं तिथवर जायचो. १९९० मध्ये बघितलेला परिसर पुन्हा नव्यानं बघत होतो. तेव्हा वाटायचे, की ती मुलं, माणसं कुठं गेली असतील?

एका वस्तीवर मी गेलो तिथं शाळा होती. प्रकल्पग्रस्तांची शाळा होती ती. त्या शाळेत जिल्ह्याचा नकाशा टांगला होता. त्या नकाशात धरणही दिसत होतं, पण त्यात खुणा करून गावांची नावं लिहिली होती. मी तिथल्या शिक्षकांना विचारलं, की हे काय आहे? इथल्या मुलांना कळावं, की आपलं गाव तिथं होतं म्हणून त्या खुणा केल्या आहेत, असं ते सांगते झाले. या मुलांमध्ये त्या गावात जन्माला आलेली मुलं होती, तशी विस्थापन झाल्यानंतर जन्माला आलेलीही होती.

त्यांना त्या खुणांपलीकडे गावाचे अस्तित्व ठाऊक नव्हते. धरणग्रस्तांचे स्थलांतर होते, ते केवळ माणसांचे होत नाही. वेशभूषेचेही मोठे स्थलांतर होते. डोंगरात, गावात गुडघ्याच्या वर लुगडं नेसणाऱ्या महिला विस्थापित झाल्यानंतर आसपासच्या नजरा बघून गुडघ्याखाली नेसू लागल्या. लंगोट लावल्यानंतर आपण सुदृढ आणि ताकदवान आहोत असं समजणारा देवाप्पा जेव्हा अर्धी चड्डी घोलतो, तेव्हा आपण काहीच घातलं नाही असं जाणवून अस्वस्थ होतो.

ती चड्डी घातली म्हणजे काहीतरी परिधान केलं आहे असं लोकांना वाटतं, पण त्याला तसं वाटत नाही ना? म्हणून जेव्हा देवाप्पा म्हशीला आणायला जंगलात जातो, तेव्हा एकेक कपडा काढून फेकत पुन्हा लंगोट्यावर जातो. तो रक्ताळून दगड उचलतो हे सगळं चित्र माझ्या डोळ्यासमोर नाचत राहायचं. हा परिसर डोळ्यात साठवला होता, तो लिहिता झालो.

‘रिंगाण’मधील लोकजीवनाचे भावविश्‍व आकारताना नेमकं काय गवसत गेलं?

रिंगाणचा आकृतिबंध माझ्या मनात पक्का झाला तेव्हा ती मी लिहायला घेतली. ही कादंबरी जवळपास सात ते आठ वेळा लिहून काढली. त्याची हस्तलिखितं अजूनही माझ्याकडे आहेत. ही कादंबरी प्रकाशकांना लवकर हवी होती; मात्र माझे समाधान होत नाही तोवर मी ती देणार नाही असं सांगितलं.

ही कादंबरी केवळ म्हैस आणि देवाप्पाची नाही तर ती संपूर्ण मानव आणि प्राणिजगताचे भावविश्‍व, जगण्याचा संघर्ष मांडते. त्याआधी माझी आता येणारी ‘काळ्या माळ्या भिंगोळ्या’ ही कादंबरी लिहून तयार होती. पण मला ‘रिंगाण’ने भारून टाकले होते. माझे वडील २००३ ला गेले. आमच्या गावात जनावरांवर निरपेक्ष प्रेम केलेला त्यांच्याइतका दुसरा माणूस नव्हता. बैलाचा मूळ उतरला की तो लंगडतो, पाय टेकत नाही. पण वडील काही सेकंदांत ते मूळ बसवायचे.

Krushnat Khot
Krushnat Khot : पडीक आदिम भुई नांगरणारा लेखक

गावातील कुणाची म्हैस व्यायला झाली, की ते बाळंतपण करून घरी यायचे. कुंपण घालणे, गवत रचून देणे, भिंत बांधून देणे ही कामे ते विनामोबदला दिवसदिवसभर करत. ते जेवायला बसले, की त्यांच्याभोवती मांजर, कोंबडी, कुत्रा, पाळलेला पोपट रिंगाण करून एका विशिष्ट अंतरावर बसत. त्यांना खायला घालून ते जेवत. आज विचार करतो तेव्हा लक्षात येते, की हे कसे काय शक्य आहे? हा आनंद कसा पचवला असेल?

हे सगळं पाहत मी आलोय म्हणूनच देवाप्पा आणि म्हैस किंवा एकूणच कादंबरीत जनावरांशी तादात्म्य पावण्याचे चित्रण आले आहे. लहानपणापासून खेड्यापाड्यात जे जगणं अनुभवलं आहे तेच कुठंतरी मुरून पुढे कादंबरीत उतरत गेलं आहे असं वाटत राहतं. मी या कादंबरीचे हस्तलिखित काही लोकांसमोर वाचले. ही लोकं साहित्यप्रकार न समजणारी होती. त्यांना कंटाळा आला, की मी खुणा करून ठेवल्या. तेथे आवश्यक ते बदल केले. मी वाचायचे बंद केल्यानंतर समोरच्याने उत्स्फूर्तपणे ‘वाचा’ असे सांगितले पाहिजे, इथवर मी त्याचे पुनर्लेखन करत गेलो.

प्रचंड घुसळणीच्या काळात लेखकाला लिखाणाची उसंत कशी मिळेल?

कोणताही सकस लेखक समाजाकडे संवेदनशीलने पाहतो. त्याला वाटत राहते, की बदल झाला पाहिजे. जे दिसते ते बरोबर नाही असे त्याला वाटत राहते. मला एकच गोष्ट वाटते, की प्रत्येकाच्या घरात, मनात शांतता नांदत आली पाहिजे. तो शांततेचा आवाज पकडता आला पाहिजे. तो आवाज दीर्घ करता आला पाहिजे. तो दीर्घ करणे म्हणजे काय? देवाप्पाचे मन अस्वस्थ झाले आहे, म्हणून तो तिथं परत गेला. तिथं तो मरायला तयार झालाय. लेखकाला शांततेचा आवाज ऐकायची सवय हवी. कुठल्याही लेखकाला कोलाहालात शांतता शोधता आली पाहिजे.

ती शोधता आली तरच तो काहीतरी सांगू शकेल. इथं शांतता आहे हे वाचकाला तो तेव्हाच सांगू शकेल. वर्तमानात विस्थापित आणि प्रस्थापित असा संघर्ष सुरू असल्यासारखे जाणवते, पण स्थलांतरितांच्या विस्थापनाकडे तुम्ही कसे पाहता? आपल्याकडे विकासाची परिमाणं तयार झाली आहेत. पण आपण जे दृश्य स्वरूपात पाहतोय हा खराखुरा विकास आहे का? लेखक म्हणून मला तो विकास दिसत नाही. सामान्य माणसाला तो दिसतो. सामान्य माणसाला वाटत राहतं, की आपलं घर झालं, गाडी आली.

पण आपण कुठल्यातरी खाईत निघालोय हे लेखकाला दिसतंय. कोळशाच्या खाणीतील प्राणवायू संपत चाललाय हे कबुतराला कळते मग ते बाहेर पडते आणि पाठोपाठ माणसं बाहेर पडतात. तसं लेखकाला दिसलं पाहिजे. गंभीरपणे विचार करणाऱ्या लेखकाला ते दिसते. आपण जो विचार मांडतोय तो किती सत्यात उतरेल हे त्याला माहीत नाही. पण ते लेखकाला दिसते. तो मुद्दा दाखवत असतो. रिंगाणमध्ये पाळीव म्हैस रानटी झाली. पण तिलाही संघर्ष करावाच लागला आहे ना! ती उत्क्रांत झाली तेव्हा पाळीव झाली. आपण मानव म्हणून उत्क्रांत होत या टोकाला आलो आहोत, संघर्ष करत आपण या टप्प्यावर आलोय. पण इथंही काहीच सापडत नाही.

Krushnat Khot
Sahitya Akademi Award 2023 : कृष्णात खोत यांना ‘रिंगाण’साठी साहित्य अकादमी पुरस्कार

मग आपल्याला परत संघर्ष करावा लागेल. तो संघर्ष स्वत:शी असेल. म्हैस जशी उत्क्रांतीकडून पुन्हा मूळपदावर येण्यासाठी सगळ्यांशी, समूहाशी संघर्ष करत ती तगून राहिली आहे. पृथ्वीवर कितीही रोगराई आली तरी माणूस हा प्रचंड चिवट प्राणी आहे. तो आपल्या मेंदूत प्रचंड बदल करून घेऊन तगून राहतो. तो मानव जात कधीच नष्ट होऊ देणार नाही. आपण कितीही टोकावर असलो तरी टिकून राहण्याचा मेंदूतील एक भाग कायम सक्रिय असतो. केवळ माणूसच नाही तर प्रत्येक जिवात ते आहे.

जेव्हा बंद खोलीत एखाद्या मांजरावर आपण हल्ला करतो तेव्हा ते नखे, केस, डोळे विस्फारून तुमच्या अंगावर येते. आपल्या हातात हत्यार असले तरी हातपाय गळून जातात. म्हणजे वेळ आल्यावर मांजरीत असलेले वाघाचे हिंस्र अंश उपाळून येतात आणि टिकून राहण्यासाठी ती ते योग्यवेळी वापरते. तसेच माणसाचेही आहे.

उक्रांतीकडे येऊन पुन्हा मूळ रुपात जाण्यासाठी म्हैशीच्या मेंदूत जसे बदल झाले तसे बदल माणसाच्या मेंदूत आज ना उद्या होतील. त्याला कधीतरी वाटेल की आपण हे बदल केले नाहीत, तर आपण नष्ट होऊ. माणूस कधीच स्वत:ला नष्ट होऊ देणार नाही. म्हशीने जसे स्वत:ला नष्ट होऊ न देण्यासाठी बदल करून घेतले, तसेच बदल तो स्वत:त करत जाईल. ‘रिंगाण’मधील म्हैस देवाप्पाशी संघर्ष करते. ती पुन्हा माणसाळायला तयार नाही.

मी माणसाळलेले आयुष्य पाहिलेय, आता मला जो रानटीपणाचा जो आनंद आहे तो उपभोगायचा आहे. यासाठी मी संघर्ष केला आहे, तो पुन्हा संघर्ष कशाला याच भावनेने ती देवाप्पाशी उभा दावा ठेवत आहे. आपण उत्क्रांत होत होत इथवर आलोय, पण आता पुन्हा मागे परतण्याची प्रक्रिया सुरू होईल, आणि तो नव उत्क्रांतवाद असेल. हा प्रवास उत्तम आणि आधुनिकच असेल.

तुमच्या ‘गावठाण’पासून ते ‘रिंगाण’पर्यंतच्या कादंबरीत भाषा, शैलीचे एक सूत्र आहे. त्याबद्दल काय सांगाल?

- कोणताही लेखक, कोणत्याही भाषेतील लेखकाला नेहमी एकच सूत्र सांगायचे असते. तो त्यासाठी वेगवेगळी फुलं गोळा करतो. ते सूत्र म्हणजे त्याची भूमिका असते. तो थेट कधी सांगत नाही पण सातत्याने त्याला ती भूमिका मांडायची असते. ती कुठे ना कुठेही उमटत राहतो. भवताल उद्ध्वस्त होत असताना अस्वस्थ होतो. इथल्या रितीरिवाजांपासून अनेक गोष्टी हरवल्यावर आपली घालमेल झाली पाहिजे.

रितीरिवाज खूप चांगले होते अशातला भाग नाही. पण सगळं हरवल्यानंतर शिल्लक काही राहत नसेल तर आपण अस्थिर होतो. हा सगळा अट्टहास माणसाचं जगणं सुंदर होण्यासाठी आहे. त्याला स्वत:चं जगणं सुंदर करताना बाकीचे सगळे विद्रूप करून चालणार नाही. त्याला आपलं जगणं सुंदर करायचे असेल तर भवताल सुंदर करता आला पाहिजे. एका बाजूला सुबत्ता अणि दुसरीकडे गरिबी आहे तेव्हा संघर्ष हा होणारच. आपली मूळ गरज पैशाने संपेल असे नाही. निसर्गाने जे दिले ते आपण पुरवून वापरले पाहिजे. आज आहारातील बदलांमुळे अनेक आजारांनी ग्रासलेली पिढी दिसत आहे.

अनेकदा ग्रामीण भागात जेवणाची चिंता नसे, पण शहरी भागात भविष्याला घाबरणारी पिढी आज आपण पाहतोय. हा ताण न पेलणारा आहे. त्यामुळे न ऐकलेले आजार अकाली जडू लागले आहेत. आहारातील अनेक गोष्टी ज्या जिभेचे चोचले पुरवतात त्यांनी आपल्या जगण्यातील कुतूहल संपवले आहे. कुतूहल आणखी एका गोष्टीने संपवले आहे ते गावोगावच्या रहस्यांनी. ती रहस्ये विस्तारात संपली आहेत.

जगण्याचे सपाटीकरण झाल्याने कुतूहल नावाची गोष्टच जिवंत नाही. आपण मंगळावर गेल्याच्या बढाया मारतो, तेव्हा आपण कुणाचेतरी काहीतरी हिसकावून घेतो याची जाणीव झाली पाहिजे. या निसर्गाशी तादात्म्य पावले पाहिजे. आपल्याभोवती अनेक जीवजंतू जगत आहेत याचे भान ठेवूनच आपल्याला जगावे लागेल. या सगळ्या जीवजंतूपैकी आपण एक आहोत याची जाणीव माणसाला झाली, की त्याला काहीच कमी पडणार नाही.

ज्या वेळी आपल्या हक्कासाठी इतरांच्या हक्कावर गदा आणत गेलो तर मानव जातीला भोगावे लागेल. ही कादंबरी जसे विस्थापितांचा स्वर अधोरेखित करते, तसा मानव जातीच्या, प्राण्यांच्या पुढच्या पिढ्यांची भाकितं करते. डॉ. आनंद जोशींनी मलपृष्ठावर म्हटलेच आहे, या कादंबरीमध्ये म्हैस जशी मागे गेली तसा माणूसही मागे जाईल. तसा प्रत्येकाच्या मेंदूत ती शक्यता ठेवलेली असते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com