Agriculture MSP : दीडपट हमीभावाची पुन्हा एकदा चलाखी

Minimum Support Price : उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव जाहीर केल्याचा दावा बुधवारी सरकारने केला. पण सरकारने पुन्हा एकदा हातचलाखी करत C2 ऐवजी A2 + FL वर आधारित उत्पादन खर्च काढला आहे.
Agriculture MSP
Agriculture MSP Agrowon
Published on
Updated on

Pune News : उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव जाहीर केल्याचा दावा बुधवारी सरकारने केला. पण सरकारने पुन्हा एकदा हातचलाखी करत C2 ऐवजी A2 + FL वर आधारित उत्पादन खर्च काढला आहे.

सरकारने C2 उत्पादन खर्च गृहीत धरून त्यावर ५० टक्के नफा दिला असता तर सोयाबीनला ६ हजार ४३१ रुपये आणि कापसाला ९ हजार ३४५ रुपये हमीभाव मिळाला असता. त्यामुळे सरकारने तांत्रिक खेळ थांबवून स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींप्रमाणे C2 वर आधारित हमीभाव द्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला शेतकऱ्यांच्या रोषाचा मोठा सामना करावा लागला. त्यामुळे शेतकऱ्यांना खूष करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले जातील, असा कयास लावला जात होता. हमीभावातही चांगली वाढ होईल, अशी अपेक्षा होती.

त्यातच केंद्रात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषिमूल्य आणि किंमत आयोगाच्या बैठकीत सोयाबीन आणि कापसाच्या भावाचा मुद्दा उपस्थित करून पंतप्रधानांशी चर्चा केल्याचे सांगितले होते. सोयाबीनला ५ हजार १०० रुपये हमीभाव द्यावा, अशी मागणीही केल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या.

Agriculture MSP
MSP 2024 : केंद्र सरकारने खाद्यतेल आणि कडधान्य आयातीला लगाम घालावा; कृषी मूल्य व किंमत आयोगाच्या शिफारस

सरकारने हमीभावात चांगली वाढ करण्याच्या अपेक्षेवर पाणी तर फेरलेच, शिवाय हमीभाव जाहीर करताना आपली जुनीच हातचलाखी कायम ठेवली. सरकारने हमीभाव जाहीर करताना खरिपातील सर्वच पिकांचा हमीभाव उत्पादन खर्चावर किमान ५० टक्के नफा गृहीत धरून जाहीर केल्याचे सांगितले.

पण सरकारने पिकांचा उत्पादन खर्च सर्वसमावेशक धरला नाही. म्हणजेच C2 उत्पादन खर्चावर ५० टक्के हमीभाव न देता A2 + FL खर्चावर ५० टक्के नफा दिला आहे. शेतकरी मागच्या अनेक वर्षांपासून C2 उत्पादन खर्चावर हमीभाव जाहीर करण्याचे मागणी करत आहेत. पण यंदाही सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले.

काय आहे C2 आणि A2 + FL खर्च ?

स्वामिनाथन आयोगाने उत्पादनखर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची शिफारस केलेली होती. पण हा उत्पादनखर्च सर्वसमावेशक असावा, अशी आयोगाची अपेक्षा होती. पिकांचा उत्पादनखर्च तीन प्रकारे मोजला जातो. A2, (A2 + FL) आणि C2.

A2 ः एखादे पीक घेताना बियाणे, खते, रासायनिक कीटकनाशके, मजूर, सिंचन, इंधन इत्यादींसाठी जो खर्च येतो हा खर्च A2 मध्ये मोजला जातो.

A2 + FLः खर्चाची ही व्याख्या थोडी व्यापक असून यात A2 खर्चासह शेतकरी आणि त्याच्या कुटुंबीयांनी शेतात केलेल्या कामाची मजुरी गृहीत धरली जाते.

C2ः खर्चाची ही व्याख्या सर्वसमावेशक आहे. C2 मध्ये A2 + FL खर्चासोबतच ज्या जमिनीवर पीक घेतले जाते, त्या जमिनीचे आभासी भाडे, खंड आणि स्थायी भांडवली साधनसामुग्रीवरील व्याज हे सुद्धा मोजले जाते.

C2 नुसार सोयाबीनचा हमीभाव ६४३१ रुपये

सरकारने A2 + FL वर आधारित उत्पादन खर्च गृहीत धरला आहे. या सूत्रानुसार सोयाबीनचा उत्पादन खर्च ३ हजार २६१ रुपये येतो. सराकरने त्यावर ५० टक्के नफा गृहीत धरून ४ हजार ८९२ रुपये हमीभाव जाही केला.

पण जर सरकारने C2 सूत्रानुसार उत्पादन खर्च गृहीत धरला असता तर उत्पादन खर्च आला असता ४ हजार २९१ रुपये. त्यावर ५० टक्के नफा दिला असता तर हमीभाव आला असता ६ हजार ४३१ रुपये. म्हणजेच सरकारने यंदा जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा १ हजार ५३९ रुपये जास्त हमीभाव मिळाला असता.

Agriculture MSP
Kharif MSP 2024: कापसाच्या हमीभावात ५०१, सोयाबीनमध्ये २९२ आणि तुरीच्या हमीभावात ५५० रुपयांची वाढ; नव्या हंगामातील पिकांचे हमीभाव काय?

C2 नुसार कापसाचा हमीभाव ९३४५ रुपये

सरकारने A2 + FL सूत्रानुसार कापसाचा उत्पादन खर्च क्विंटलला ४ हजार ७४७ रुपये गृहीत धरून त्यावर ५० टक्के नफ्यासह मध्यम लांब धाग्यांच्या कापसासाठी ७ हजार १२१ रुपये आणि लांब धाग्यांसाठी ७ हजार ५२१ रुपये जाहीर केला.

पण C2 सूत्रानुसार कापसाचा उत्पादन खर्च ६ हजार २३० रुपये येतो. यावर किमान ५० टक्के नफा गृहीत धरला तर कापसाचा हमीभाव ९ हजार ३४५ रुपये आला असता. म्हणजेच सरकारने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा पण सरकारने याला बगल देत जुन्याच पद्धतीने हमीभाव जाहीर केला.

तुरीचा हमीभाव असता १०,३४१ रुपये

तुरीच्या हमीभाव देखील सरकारने जुने सूत्र वापरून कमी जाहीर केला. A2 + FL सूत्रानुसार तुरीचा उत्पादन खर्च ४ हजार ७६१ रुपये गृहीत धरला. त्यावर ५९ टक्के नफा देऊन तुरीला ७ हजार ५५० रुपये हमीभाव जाहीर केला.

पण C2 सूत्रानुसार उत्पादन खर्च येतो ६ हजार ५०४ रुपये. त्यावर सरकारने दावा केल्याप्रमाणे ५९ टक्के नफा गृहीत धरला असता तर तुरीला १० हजार ३४१ रुपये हमीभाव मिळाला असता. म्हणजेच सरकारने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा २ हजार ७९१ रुपये अधिक.

मका, ज्वारीच्या हमीभावातही चलाखी

सरकारने A2 + FL सूत्रानुसार मक्याचा उत्पादन खर्च १ हजार ४४७ रुपये गृहीत धरून त्यावर ५४ टक्के नफा देऊन २ हजार २२५ रुपये हमीभाव जाहीर केला. तर ज्वारीचा उत्पादन खर्च २ हजार २४७ रुपये गृहीत धरून त्यावर ५० टक्के नफा देऊन ३ हजार १८० रुपये जाहीर केला. पण C2 सूत्रानुसार मक्याचा उत्पादन खर्च १ हजार ८६३ रुपये येतो. सरकारने दावा केला त्याप्रमाणे यावर ५४ टक्के नफा गृहीत धरल्यास मक्याचा हमीभाव २ हजार ८६९ रुपये आला असता. म्हणजेच सध्याच्या हमीभावापेक्षा ६४४ रुपये जास्त. तर ज्वारीचा उत्पादन खर्च C2 नुसार २ हजार ९५८ रुपये येतो. त्यावर ५० टक्के नफा गृहीत धरल्यास ४ हजार ४३७ रुपये हमीभाव आला असता. म्हणजेच सध्याच्या हमीभावापेक्षा १२५७ रुपये जास्त आहे.

तुटपुंजी वाढ

सरकारने शेतकऱ्यांचा हिरमोड केला. गेल्यावर्षीच्या तुलनेत सोयाबीनच्या हमीभावात केवळ साडेसहा टक्क्यांची वाढ केली. ४ हजार ८९२ रुपये हमीभाव जाहीर केला. तर कापसाच्या हमीभावात केवळ ७ टक्के, तुरीच्या हमीभावात जवळपास ८ टक्के, मक्याचा हमीभाव साडेसहा टक्के आणि ज्वारीचा हमीभाव गेल्यावर्षीच्या तुलनेत केवळ ६ टक्क्यांनी वाढविला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com