Amaravati News : पीकविम्याच्या माध्यमातून नुकसानभरपाई मिळावी, याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागलेल्या असताना तक्रारींचे शीर्षक बदलल्यामुळे शेतकरी मदत मिळण्यापासून वंचित राहिले होते. या बाबत शेतकऱ्यांनी तक्रारी करताच पुन्हा एकदा नव्याने नोंदणी केल्यानंतर विमा कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले व त्यांनी नियमानुसार पंचनामा करून नुकसानभरपाईचा मार्ग मोकळा करून दिला.
यावर्षी पथ्रोट भाग क्रमांक एक व दोन मिळून साडेतीनशे हेक्टरच्या जवळपास सोयाबीनची पेरणी झालेली होती. अशावेळी शेतात लागवड केलेल्या पिकांची जर नैसर्गिक आपत्तीमुळे हानी झाली तर त्याची नुकसानभरपाई मिळावी, याकरिता केंद्र शासनाच्या पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत मात्र एक रुपयामध्ये पीकविमा योजना सुरू करण्यात आलेली आहे.
ज्यामध्ये एका शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर जेवढ्या एकरचे पीक लागवडीचा उल्लेख असेल तेवढ्या पिकाचा मात्र एक रुपयामध्ये विमा उतरविण्यात आलेला होता. अशावेळी कापणीकरिता तयार असलेले सोयाबीनचे पीक परतीच्या पावसाने पूर्णतः नष्ट झाले होते.
एकरी २० ते २२ हजार रुपये खर्च करून सुद्धा नफा तर सोडा लागवडीचा खर्च निघालेला नव्हता. नुकसानभरपाई मिळावी, याकरिता प्रत्येक नुकसानग्रस्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने तक्रार नोंदविलेली होती.
३ सप्टेंबर २०२४ रोजी प्रवीण बोबडे, अतुल बोबडे, वरुण वर्मा, राजू गोरले, कमला लक्ष्मण गोरले, रोशन रसे, प्रवीण मडगे, सचिन मडगे, विजय गभणे, हरिदास गभणे, मनोहर गोबरे यासह सोयाबीनचा पीकविमा काढलेल्या असंख्य शेतकऱ्यांनी ऑनलाइन तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यावरून महिना उलटल्यानंतर सुद्धा पीकविमा कंपनीकडून पंचनामा झालेला नाही.
ढगफुटी, जलप्रलयाच्या शीर्षकाअंतर्गत तक्रार नोंदविली
शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईच्या मागणीसाठी विमा कंपनीकडे ऑनलाइन तक्रार नोंदविली असताना त्यामध्ये घटना शीर्षकांमध्ये तूट पाऊस म्हणून नोंद केलेली होती. ती पूर्णतः चूक असून या शीर्षकाअंतर्गत विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळत नाही. शेतकऱ्यांनी ढगफुटी, जलप्रलयाच्या शीर्षकाच्या अंतर्गत पुन्हा एकदा तक्रार नोंदवावी.
जेणेकरून मदत देण्यास ग्राह्य धरल्या जाईल, असे मत विमा कंपनीचे प्रतिनिधी शुभम काळे यांनी मांडले होते. त्यानंतर पुन्हा एकदा नुकसानग्रस्तांनी शीर्षक बदलून ऑनलाइन तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामा करून पावती शेतकऱ्यांच्या सुपूर्द केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.