Climate Smart Agriculture : आता करावी लागेल हवामान अनुकूल शेतीच

Article by Dr. Venkatrao Mayande : हवामान बदलास अनुकूल शेतीची संकल्पना जागतिक बँक तसेच अन्न व शेती संघटन (एफएओ) यांनी २०१० मध्ये मांडली. त्यानुसार हवामान बदल अनुकूल शेतीबाबत वेगवेगळ्या घटकांवर जगभरात कामही होताना दिसते. या कामांची गती मात्र वाढवावी लागेल.
Climate Change
Climate ChangeAgrowon

डॉ. व्यंकटराव मायंदे

Climate Change : हवामान बदलाचा अनिष्ट परिणाम कृषी क्षेत्रावर सर्वांत जास्त होतो कारण कृषी उत्पादन हे हवामान घटकांवर अवलंबून आहे. जागतिक पातळीवर ‘एल निनो’चा प्रभाव पाऊसमानावर होतो व त्याचा फटका शेतीला बसतो. ‘एल निनो’ म्हणजे पॅसिफिक महासागरात पाण्याचे तापमान वाढणे. यामुळे २००३ मध्ये जगभरात उष्माघात आणि थंड लाट दोन्हीही आढळून आले.

भारतामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, पश्‍चिम बंगाल, ओडिशा आणि आंध्र प्रदेशमध्ये उष्णतेची लाट होती तर काही राज्यांमध्ये थंडीची लाट येऊन साधारणतः १० ते १०० टक्क्यांपर्यंत पिकांचे नुकसान झाले. त्याच दरम्यान युरोपमध्ये डिसेंबर २००२ ते जानेवारी २००३ या दरम्यान मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट होती.

अन्न व कृषी संघटन (एफएओ) यांच्या अभ्यासानुसार ‘एल निनो’च्या प्रभावामुळे भविष्यात १२५ दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत अन्नधान्याचे उत्पादन घटू शकते. काही ठिकाणी पाण्याची कमतरता तर दुसरीकडे अतिवृष्टी यामुळे कृषी उत्पादनात घट, मानवी आरोग्यास धोका, वनसंपत्ती व जैवविविधता यावर अनिष्ट परिणाम आढळून येत आहेत.

एकंदरीत हवामान बदलाची तीव्रता येत्या काळात वाढत असून, वाढीव तापमानामुळे व पाऊसमानात झालेल्या बदलामुळे शेतीवर होणारे दुष्परिणाम हळूहळू वाढत जाण्याची शक्यता आहे. भारतात अन्नसुरक्षेचा धोका कमी करण्यासाठी हवामान अनुकूल शेती तंत्रज्ञान यावर संशोधन सुरू आहे. मागील अनुभवानुसार शेतीच्या पद्धतीमध्ये हळूहळू बदल व त्याचा शेतकऱ्यांमध्ये प्रसार येत्या काळात करण्याची नितांत गरज आहे.

Climate Change
Climate Change : हवामान बदलाने वाढतेय भुकेची चिंता

जैव तंत्रज्ञान वापर : जैव तंत्रज्ञानावर आधारित पीक वाणांच्या वापरामुळे उत्पादन वाढ शक्य होईल. कीड-रोग प्रतिबंधक, अजैविक ताण प्रतिबंधक पीक वाण वापरामुळे हवामान बदलाच्या परिणामावर मात करणे शक्य आहे. जगभरात सध्या कृषीमध्ये जैवतंत्रज्ञानाचा वापर वाढत असून, त्यामुळे हवामान बदलाच्या परिस्थितितही अन्नसुरक्षा शाबूत ठेवू शकतो ही ताकद आहे.

यासोबत हेही लक्षात ठेवले पाहिजे, की जैवतंत्रज्ञानाला इतर आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आवश्यक आहे. अमेरिकन कृषी विभागाच्या अभ्यासानुसार हवामान बदलामुळे धान्य व तेलबिया पिके लवकर पक्व होतील, पण वाढीव तापमानामुळे उत्पादन घटेल. हिवाळी तापमान वाढीमुळे पशुधन जगेल पण उन्हाळी तापमानामुळे अनिष्ट परिणाम होईल.

कार्बन डायऑक्साइड वाढल्यामुळे पिकात तण वाढेल. जैव तंत्रज्ञानास उत्तम सिंचन, मृदा व्यवस्थापन, ओलावा संवर्धन, उष्ण वातावरणात तग धरणाऱ्‍या पशूंच्या जाती व पीक वाण याची जोड लागेल. जैव तंत्रज्ञानाने हवामान बदलावर मात शक्य आहे. उदा. तण व रोग प्रतिकारक पिकांचे वाण, शून्य मशागत, जनुकीय सुधारित ताण सहन करणारे वाणांमुळे हवामान बदलाचे विपरीत परिणाम कमी करता येतील.

माहिती तंत्रज्ञानाचा वापर : कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारीत तंत्रज्ञानाचा वापर करून हवामान बदलावर मात करणे शक्य झाले आहे. क्लायमेट स्मार्ट अॅग्रिकल्चर अथवा डिजिटल अॅग्रिकल्चर यावर जगभरात प्रयोग चालू आहेत. यात ड्रोन तंत्रज्ञान, रोबोट म्हणजेच यंत्र मानव याचा शेतीत वापर यशस्वीरीत्या होत आहे.

हे तंत्रज्ञान भारतात नुकतेच आले आहे. त्यामुळे हवामान बदलास पूरक हे तंत्र कसे काम करते, यासाठी थोडी वाट पाहावी लागेल. २०२५ पर्यंत माहिती तंत्रज्ञानावर आधारित यंत्र म्हणजेच ॲग्रिटेक मार्केट हे २२.५ बिलियन अमेरिकन डॉलर असेल असे अनुमान आहे. स्वयंचलित यंत्र, नियंत्रण सिस्टीम, डाटा प्रोसेसिंग सॉफ्टवेअर, वेब अॅप्लिकेशन, मोबाइल टूल्स यावर आधारित शेती पद्धती अमेरिका, चीन, कोरिया, युरोप, ऑस्ट्रेलिया या देशात प्रचलित होत आहे.

भारतातही यावर संशोधन सुरू आहे. येत्या ५-१० वर्षांत हे तंत्रज्ञान देशातील शेतकऱ्‍यांना उपलब्ध होऊ शकेल. ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रसार भारत सरकार करीत आहे. २०१० पर्यंत ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम, सेन्सर प्लॅटफॉर्म, सॅटलाइट नकाशे, डाटा लोगर याचा वापर होत होता, पण ड्रोन तंत्रज्ञानाचा विकास, वायरलेस सेन्सर, आयओटी, रोबोट्स, मोबाइल ॲप्स यामुळे डिजिटल अॅग्रिकल्चर व क्लायमेट स्मार्ट अॅग्रिकल्चर शक्य होत आहे.

Climate Change
Climate Change : शेतीचे संक्रमणपर्व

मातीचे आरोग्य, पाणी, हवामान बदल, शेताची उत्पादकता, उत्पादन खर्चावर नजर तसेच ड्रोन कॅमेरा वापरून हाय रिझोल्यूशन फोटोग्राफ्स मिळविता येतील. यामुळे मातीतील ओलावा, मातीची गुणवत्ता, शेतातील उत्पादन नकाशे, आयओटी तंत्रज्ञानावर आधारित सिंचन, अन्नद्रव्य मॉनिटरिंग शक्य झाले आहे.

या क्षेत्रात अजूनही प्रयोग चालू आहेत व दिवसेंदिवस यात सुधारणा होत आहेत. रियल टाइम डाटा गोळा करणे, त्याचे विश्‍लेषण व परिणाम लगेच मिळतात. त्यामुळे हवामान अनुकूल शेती अथवा क्लायमेट स्मार्ट अॅग्रिकल्चर आता शक्य होत आहे. हवामान बदलामुळे कृषी क्षेत्राला मोठा धोका निर्माण झाला आहे. यासाठी हवामान अनुकूल शेतीविषयी भारत सरकार व महाराष्ट्र सरकारने निक्रा व पोकरा प्रकल्पातून मागील सहा-सात वर्षांपासून शेतकऱ्यांच्या शेतावर प्रयोग केले. त्याचे चांगले निष्कर्ष हाती आले आहेत. अशा निष्कर्षांची शिफारस करून शेतकऱ्यांपर्यंत प्रसारण करणे हे पुढील काळात महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

एकात्मिक हवामान अनुकूल शेती किंवा क्लायमेट स्मार्ट अॅग्रिकल्चर ही संकल्पना एफएओने २०१० मध्ये मांडली व त्यामध्ये वेगवेगळ्या घटकांवर काम होताना दिसते. त्यातील काही उदाहरणे ज्यात स्टार्टअपनी काम केले आहे.

(१) अलकामा या कंपनीने उत्पादन वाढविण्यासाठी रसायनाचा वापर करण्याऐवजी जैविक घटकाचा वापर केला. त्यात त्यांनी मातीतील जिवाणू वाढविण्यासाठी जैविक द्रावण तयार केले. त्यामुळे कमी खर्चात फंजी, बॅक्टेरिया, निमॅटोड वापरून पिकावरील ताण कमी केला. हवेतील कार्बन डायऑक्साइड मातीत पृथक्करण (Sequestration) करण्यास मदत झाली.

(२) अमिनी या कंपनीने हवामान व पीक डाटा गोळा करण्यासाठी सॅटेलाइट, कृत्रिम बुद्धिमत्ता व मशिन लर्निंगचा वापर करून सुपरपॉवर सुविधा तयार करून पीक व्यवस्थापन, विमा यामुळे शेतकऱ्‍यांना आर्थिक पाठबळ मिळाले.

(३) बिलियन कार्बन कंपनीने वाया गेलेले अन्न वापरून जैविक खत बनवले. त्यात ब्लॅक सोल्जर अळी वापरून न्यूट्रियंट मायनिंग तंत्रज्ञानाधारित बायोरिएक्टर बनवला. यामुळे नत्र, स्फुरद, पालाश पुनर्निर्मित होऊन उत्पादनात वाढ होते, कमी खर्चात हवेतील कार्बनचे पृथक्करण होते.  

अशा काही उदाहरणांवरून दिसून येते, की हवामान अनुकूल शेतीचे मॉडेल अजून परिपक्व नाही पण यावर जगभरात संशोधन चालू असून, भारतातही प्रयोग सुरू आहेत. जैवतंत्रज्ञान व आधुनिक माहिती तंत्रज्ञान वापरुन हवामान अनुकूल शेतीची प्रयोगशील वाटचाल सुरू आहे व येत्या काळात वेगाने यावर संशोधन होऊन ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज आहे.

(लेखक डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com