
Jalgaon News : खानदेशात खरिपात पीककर्ज वितरण ७० टक्क्यांवरच झाले. अशीच स्थिती रब्बी पीक कर्जाबाबत असून, अद्याप १५ टक्केही कर्जवितरण झालेले नसल्याची स्थिती आहे. रब्बीची पेरणी पूर्ण होणार आहे. यंदा पेरणी १०० टक्क्यांवर होईल. पण पीककर्ज वितरण अपेक्षित गतीने झालेले नाही.
खानदेशात रब्बीसाठी सुमारे ९०० कोटी रुपये पीककर्ज वितरणाचा लक्ष्यांक आहे. यात अद्याप १५ टक्केही वितरण झालेले नाही. राष्ट्रीय बँकांत दोन-दोन महिने प्रस्ताव पडून आहेत. सर्वाधिक सुमारे ६२५ कोटी रुपये पीककर्ज जळगाव जिल्ह्यात वितरित करायचे आहे. जिल्ह्यात जिल्हा बँकेने रब्बी पीक कर्जाचे आवाहन केले होते.
परंतु बँकेकडे कमी रब्बी पीककर्ज प्रस्ताव आले. गाव पातळीवर बँक विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून पीककर्ज देते. सोसायट्यांत हे प्रस्ताव स्वीकारण्यात आले. यात अनेक शेतकरी अनभिज्ञ राहिले. तसेच गावकीच्या राजकारणामुळेही अनेकांना जिल्हा बँकेच्या रब्बी पीक कर्जापासून वंचित राहावे लागल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
जिल्हा बँकेने खरिपासह आता रब्बीतही पीककर्ज वितरण गतीने सुरू केले आहे. परंतु खानदेशात सर्वत्र राष्ट्रीय बँकांची पीककर्ज वाटपात पिछाडी आहे. काही बँका ऑक्टोबरमध्येही खरिपातील पीककर्ज प्रस्ताव मार्गी लावत होत्या. पण आता रब्बीचे प्रस्ताव रेंगाळले. राष्ट्रीय बँकांकडे एटीएम व अन्य सेवा असल्याने शेतकऱ्यांचा ओढा या बँकांकडे आहे.
परंतु या बँकांच्या शाखा ग्रामीण भागात कमी आहेत. ज्या शाखा आहेत, त्यांच्यावर चार ते पाच गावांचा भार आहे. यात अनेक बँका शेतकऱ्यांचे नवे कर्ज देण्यासंबंधी बँक खातेच उघडण्यास मज्जाव करतात. कारण बँकेवर ताण आहे, असे सांगितले जाते. यामुळेदेखील अनेक शेतकरी नवे पीककर्ज प्रस्ताव रब्बीत सादर करू शकले नाहीत. नवे पीककर्ज घेण्यासंबंधीचे शेकडो प्रस्ताव राष्ट्रीय बँकांकडे पडून आहेत. धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेला पीककर्ज वितरणाचा लक्ष्यांक देण्यात आलेला नाही.
प्रशासन उदासीन
खानदेशात खरिपात पीक कर्जासंबंधी दोन वेळेस आढावा बैठक झाली होती. रब्बीत मात्र अग्रणी बँका व अन्य बँकांसमवेत बैठक झालेली नाही. रब्बीत पीककर्ज वितरण लक्ष्यांक मंजूर होऊन चार महिने पूर्ण झाले, पण पीककर्ज वितरण संथ गतीने सुरू आहे. यामुळे याबाबत बैठक घेऊन कार्यवाही गतीने राबविण्याची गरज आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.