Crop Loan : पीक कर्ज वाटपात बँकाची रब्बीत पिछाडी

Rabi Season Crop Loan : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने उद्दिष्टाच्या १६४ टक्के, महाराष्ट्र ग्रामीण बँकेने १०३ टक्के तर भारतीय स्टेट बँकेने ९६ टक्के कर्ज वाटप केल्यामुळे खरिपात यंदाही जिल्ह्यात शंभर टक्के पीक कर्जाचे वाटप झाले आहे.
Crop Loan
Crop LoanAgrowon
Published on
Updated on

Latur News : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने उद्दिष्टाच्या १६४ टक्के, महाराष्ट्र ग्रामीण बँकेने १०३ टक्के तर भारतीय स्टेट बँकेने ९६ टक्के कर्ज वाटप केल्यामुळे खरिपात यंदाही जिल्ह्यात शंभर टक्के पीक कर्जाचे वाटप झाले आहे.

सलग दुसऱ्या वर्षी जिल्ह्यात पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ओलांडले असले तरी केवळ या तीन बँकामुळेच उद्दिष्ट ओलांडले असून अनेक बँकांनी उद्दिष्टाच्या कमी वाटप केले तरी त्यांचे गंगेत घोडे वाहून निघाले आहे.

दरम्यान खरिपातील कर्ज वाटपाचा हा वेग रब्बी हंगामात कमी झाला असून आतापर्यंत सहा बँकांनी १० हजार ५२९ शेतकऱ्यांना १४३ कोटी २९ लाखाचे वाटप केले आहे. यामुळे रब्बीत आतापर्यंत २४ टक्केच पीक कर्जाचे वाटप झाले आहे. रब्बीच्या पेरण्या अद्याप सुरु असल्याने येत्या काळात हे वाटप वाढण्याची शक्यता आहे.

Crop Loan
Kharif Crop Loan : खरिपात राष्ट्रीयीकृत बँकांकडून ५५ टक्केच पीककर्ज वाटप

जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात मिळून यावर्षी तीन हजार कोटीच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. यात खरीप हंगामासाठी दोन हजार चारशे तर रब्बी हंगामात सहाशे कोटीचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट सर्व बँकांना वाटून देण्यात आले आहे. यात सर्वाधिक ८५३ कोटीचे उद्दिष्ट एकट्या जिल्हा बँकेला होते.

दरवर्षी उद्दिष्टाच्या दुपटीने बँकेकडून कर्जाचे वाटप केले जाते. यंदाही जिल्हा बँकेने कर्ज वाटपात मोठी आघाडी घेतली आहे. बँकेने पाच लाखांपर्यंतच्या पीक कर्जासाठी बिनव्याजी कर्ज योजना राबवून यंदाही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले आहे. यातूनच ८५३ कोटी रुपयांचे उद्दिष्ट असताना बँकेने एक लाख ६५ हजार ८४ शेतकऱ्यांना एक हजार ४०२ कोटी ५६ लाखाचे वाटप करून उद्दिष्टाच्या १६४ टक्के वाटप केले आहे.

उद्दिष्टापेक्षा जास्त कर्जाचे वाटप केल्यामुळे जिल्ह्याचे एकूण कर्ज वाटपाचे उद्दिष्ट तडीस गेले आहे. जिल्ह्यात यावर्षी पहिल्यांदाच अग्रणी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने उद्दिष्टाच्या ९६ टक्के वाटप केले आहे.

Crop Loan
Rabi Crop Loan : रब्बीत जिल्हा बँकेकडून ५० टक्के पीककर्ज वाटप

बँकेला ५२३ कोटीचे उद्दिष्ट असताना पाचशे सहा कोटीचे वाटप करून जिल्ह्यात पहिल्यांदाच ऐतिहासिक कामगिरी केली आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने २५६ कोटीचे उद्दिष्ट असताना २६४ कोटीचे (१०३ टक्के) वाटप केले आहे. खरीप हंगामात जिल्ह्यातील दोन लाख ३९ हजार २५५ शेतकऱ्यांना एकूण दोन हजार ३९० कोटीचे पीक कर्ज वाटप झाले आहे.

रब्बीत १४३ कोटींचे वाटप

रब्बी हंगामात सहाशे कोटी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना आतापर्यंत १४३ कोटीचे (२४ टक्के) वाटप झाले आहे. यात जिल्हा बँकेने सर्वाधिक आठ हजार ४६ शेतकऱ्यांना ६१ कोटीचे वाटप केले असून महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ४३९ शेतकऱ्यांना चार कोटी ३९ लाखाचे वाटप केले आहे.

भारतीय स्टेट बँकेने एक हजार ७०८ शेतकऱ्यांना साडेपंचेवीस कोटीचे, एचडीएफसी बँकेने १०८ शेतकऱ्यांना दोन कोटी २१ लाख, आयसीआयसीआय बँकेने १२६ शेतकऱ्यांना पाच कोटी ३४ लाख तर बँक ऑफ महाराष्ट्रने १०२ शेतकऱ्यांना एक कोटी १४ लाखाचे वाटप केले आहे. उर्वरित १८ बँकांनी अद्याप रब्बीच्या पीक कर्ज वाटपाला सुरवात केली नसल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com