Krushik Agriculture Exhibition 2024 : कृत्रिम बुद्धिमत्ता नव्हे, शेतीत मदतीला तत्पर तज्ज्ञ!

Future Farming : बारामती येथे अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टद्वारे ता. १८ ते २२ जानेवारी या कालावधीमध्ये कृषिक हे कृषी तंत्रज्ञान प्रात्यक्षिक प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
Krushik
Krushik Agrowon
Published on
Updated on

Krushik Agri Expo Baramati 2024 : बारामती येथे अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टद्वारे ता. १८ ते २२ जानेवारी या कालावधीमध्ये कृषिक हे कृषी तंत्रज्ञान प्रात्यक्षिक प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनामध्ये फार्म ऑफ द फ्यूचरसह (भविष्यातील शेती) विविध प्रकारची प्रात्यक्षिके एकाच जागी पाहण्याची संधी शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे

इंग्लंड, अमेरिकेमध्ये शेतांचा आकार मोठा असून, त्या ठिकाणी शेती करण्यासाठी मोठी यंत्रे, उपकरणे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वापरासंदर्भात मोठे काम सुरू आहे. मात्र भारतामध्ये आपल्या शेतकऱ्यांची जमीनधारणा कमी आहे. त्यामुळे भारतातील शेतकऱ्यांसाठी हे तंत्रज्ञान वापरताना अनेक अडचणी येतात. आपल्या भारतीय शेतीसाठी उपयोगी पडेल आणि शेतकऱ्यांना सहजपणे वापरता येईल अशा तंत्रज्ञानाचा विकास करण्याचे आव्हान होते.

शेतीमध्ये वापरण्यायोग्य कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या विकासासाठी लंडन येथील ऑक्स्फर्ड विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. अजित जावकर, मायक्रोसॉफ्ट, बिल गेट्स फाउंडेशन आणि अॅग्री पायलट एआय अशा जागतिक पातळीवरील महत्त्वाच्या संस्थांसोबतच बारामती येथील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट एकत्र आली आहे. त्यांना एकत्र आणण्याचे व एकूणच सर्व घटकातील समन्वयाचे काम ट्रस्टचे विश्‍वस्त आणि ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी केले आहे.

या सर्वांच्या सहकार्याने सेंटर ऑफ एक्स्लन्सअंतर्गत फार्म व्हाइब्ज हा प्रकल्प राबवला जात आहे. त्यात ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार आणि नीलेश नलावडे यांच्या नेतृत्वाखाली अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे संशोधक व कर्मचारी भविष्यातील शेती तंत्रज्ञानावर संशोधन आणि विकासाचे काम करत आहेत.

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानातील महत्त्वाचे टप्पे

१) माहिती गोळा करणे : शेतीसाठी आवश्यक माहितीमध्ये प्रामुख्याने हवामान, पिकाची माहिती, माती गुणधर्म, कीड, रोगांची माहिती आणि शाश्‍वत शेती पद्धतीतील विविध घटकांचा समावेश असतो. या माहितीचा प्रामुख्याने समावेश करावा लागतो.

उपग्रहाद्वारे मिळणारी नियमित माहिती - (AI नो टच)

ड्रोन, रोबोट्सवरील वेगवेगळ्या प्रकारचे उच्च क्षमतेचे कॅमेरे आणि सेन्सर्स. त्यांनी घेतलेल्या (प्रतिमा) व विविध घटकांची माहिती. (यंत्रमानव)

प्रत्यक्ष शेतामध्ये लावलेले विविध प्रकारचे सेन्सर्स. (AI लो टच)

याला प्रकल्पामध्ये प्रत्यक्ष प्रयोगशाळेतून उपलब्ध केलेल्या माहितीची जोड देण्यात आली. उदा. या शेतीक्षेत्रातून मातीचे नमुने

गोळा करून, त्याचे प्रयोगशाळेत पृथक्करण करून आलेले अहवालही विश्‍लेषणासाठी घेण्यात आले. त्यासोबत सेन्सर्सकडून उपलब्ध माहितीची तुलना करून अचूकतेचा अंदाज घेण्यात आला. सध्या त्यात ५ ते ७ टक्क्यांपर्यंत तफावत दिसून येत आहे. भविष्यात सेन्सर्सची अचूकता वाढवून ही तफावत कमी करण्यासंदर्भात संशोधन हाती घेतले आहे.

२) मिळालेल्या माहितीवर प्रक्रिया करणे : सध्या प्रामुख्याने उपग्रहाकडून व विविध सेन्सर्सकडून मिळालेली माहिती मध्यवर्ती संगणकाला नियमितपणे पोहोचवली जाते. त्यासाठी ‘मायक्रोसॉफ्ट Azure’ हा खास प्लॅटफॉर्म विकसित केला आहे.मध्यवर्ती संगणकावर नियमित काही कालावधीनंतर येणाऱ्या भरगच्च माहितीचे विश्लेषण करून त्याचा योग्य अर्थ लावणे. हा कालावधी आपल्या प्रकल्पामध्ये दर १५ मिनिटे इतका कमी आहे. हे प्रचंड मोठे काम आहे. यावर ऑक्स्फर्ड विद्यापीठातील टीम डॉ. अजित जावकर यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. त्यांनी महाराष्ट्रातील गेल्या ३० वर्षांची माहिती गोळा केली आहे. त्याचेही विश्‍लेषण केले आहे. याच टप्प्यावर आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग होणार आहे.

३) त्यातून प्रत्यक्ष काम करण्यायोग्य सूचना व माहिती मिळवून मोबाइल, संगणकाद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पाठवणे.

मोबाइल अॅप किंवा डॅशबोर्ड कसे काम करते?

● सध्या स्वयंचलित हवामान केंद्र पुरविणाऱ्या एका खासगी कंपनीचे अॅप आपण हवामानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी वापरत आहे. हे अॅप डाऊनलोड करणे मोफत असून, अॅण्ड्रॉइड प्रणालीवर चालणाऱ्या स्मार्ट मोबाइलमध्ये चालते. या अॅपमध्येही शेतीची संपूर्ण माहिती नोंदवावी लागते. या शेतीच्या सीमा (कोऑर्डिनेट) नोंदवल्यानंतर आपले शेत सेंटिनल या उपग्रहाकडून नियमितपणे सर्वेक्षणाखाली राहते. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना संगणक किंवा टॅबवर पाहण्यासाठी अॅग्री पायलट. एआय हा डॅशबोर्ड तयार करण्यात आला आहे. त्यावर उपग्रहाकडून येणारी माहिती व त्याचे विश्‍लेषण याची माहिती दर १५ मिनिटांनी उपलब्ध होईल.

● नोंदणी केलेल्या जमिनीमधील माती, मातीचा प्रकार, त्यातील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण यांची माहिती उपग्रहाकडून उपलब्ध होईल. त्यावर आधारित पिकाची निवड करण्यासाठी हे तंत्रज्ञान आपल्याला मदत करणार आहे. आपली जमीन ही एखाद्या पिकाच्या लागवडीसाठी योग्य की अयोग्य हे सांगितले जाईल.

● आपल्या जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण आणि हवामानातील कमाल व किमान तापमान, सापेक्ष आर्द्रता याच्याही नोंदी उपग्रहाद्वारे उपलब्ध होतील. जर आपण आपल्या शेतात छोटे हवामान केंद्र, पिकामध्ये वेगवेगळे सेन्सर्स बसवले तर त्याचीही माहिती नियमितपणे एकत्र केली जाईल. या माहितीच्या आधारे पिकाच्या व्यवस्थापनासंदर्भात आवश्यक त्या सर्व सूचना आपल्या मोबाइलवर उपलब्ध केल्या जातील.

उदा. आपल्या जमिनीतील ईसी सेन्सर पिकाच्या मुळांच्या परिसरातील असलेल्या क्षारांच्या प्रमाणाविषयी माहिती घेईल. ती माहिती आभासी साठवणीमध्ये (क्लाउड स्टोअरेज) पाठविल्यानंतर तिथे त्या जमिनीत उभ्या असलेल्या पिकाची गरज यांची सांगड घातली जाईल. त्यानुसार त्या पिकाला कोणती खते किती मात्रेत द्यायची, याची सूचना आपल्या मोबाइलवर प्राप्त होईल. हा पहिला टप्पा आहे. पुढील टप्प्यामध्ये ही सूचना आपल्या मोबाइलसोबतच शेतातील स्वयंचलित सिंचन व खते पुरविणाऱ्या यंत्रणेला दिली जाईल. ती यंत्रणा आपोआप सुरू होऊन सूचनेनुसार खते व पाणी पिकांना दिले जाईल. पीएच सेन्सरद्वारे मातीचा सामू नोंदवला जाईल. त्यात सुधारणा करण्यासाठी आवश्यक मात्रेमध्ये आम्ल किंवा आम्लारी सिंचनाच्या पाण्यामध्ये टाकीतून आपोआप मिसळली जातील. यालाच इंटरनेटद्वारे उपकरणांची जोडणी (इंटरनेट ऑफ थिंग्ज -आयओटी) असे म्हणतात.

Krushik
Agrowon Agriculture Exhibition 2024 : ज्ञानाची शिदोरी गाठीशी बांधत शेतकरी परतले

एआय तंत्रज्ञानाचे असे होतील फायदे

हे तंत्रज्ञान परदेशामध्ये केवळ संरक्षित शेतीमध्ये वापरले जात असले, तरी या प्रकल्पामध्ये पारंपरिक शेतीसह पॉलिहाउस, शेडनेट अशा संरक्षित वातावरणामध्ये वापरण्याच्या दृष्टीने तयार केले जात आहे. त्याचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्यांसोबतच संरक्षित आणि आधुनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही होणार आहे.

शेतकरी आपल्या मोबाइल, टॅब किंवा संगणकावरून सर्व तंत्रज्ञान सहजपणे हाताळू शकेल. म्हणजेच तो शेतापासून दूर असला, तरी सर्व कामांच्या सूचना तो पुरवू शकतो.

पिकाच्या पूर्वमशागत, लागवड, व्यवस्थापन ते कापणी या सर्व टप्प्यांवर कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान शेतकऱ्यांना नियमितपणे मार्गदर्शन करेल. कोणत्या वेळी, कोणते काम, कशा प्रकारे करायचे याच्या सूचना प्राप्त होतील. त्यामुळे पिकांची वाढ जोमाने होते. वाढीच्या त्या त्या टप्प्यावर आवश्यक त्या बाबी पुरवल्या गेल्यामुळे पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ होते. प्रकल्पाच्या प्राथमिक निष्कर्षानुसार उत्पादनामध्ये २५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ मिळत असल्याचे दिसून आले.

या तंत्रज्ञानामुळे पिकातील विविध निविष्ठांच्या मात्रा नेमक्या वेळी व योग्य प्रमाणात वापरल्या जातात. त्यामुळे निविष्ठांवरील खर्चात मोठी बचत साध्य होते. प्राथमिक प्रयोगातून खर्चात ३० ते ४० टक्क्यांपर्यंत बचत होत असल्याचे दिसून आले आहे. पिकाची काढणी योग्य पक्वतेला होईल. त्यामुळे विविध पिकातील आवश्यक घटकांचे उदा. हळदीतील कुरकुमीनचे प्रमाण, उसातील साखरेचे प्रमाण सर्वोच्च पातळीवर असेल. परिणामी, शेतकऱ्याला उत्तम दर मिळविण्यासोबत साखर कारखान्यासारख्या प्रक्रिया उद्योगांच्या फायद्यातही वाढ होईल.

काढणीनंतरची कामे आणि प्रक्रिया यातून मूल्यसाखळी आणि बाजार व्यवस्था मजबूत होण्यास मदत होईल.

ऊस शेतीला फायदा

फार्म व्हाइब्ज द्वारे राबविल्या जाणाऱ्या फार्म ऑफ द फ्यूचर या प्रकल्पात पहिल्या टप्प्यामध्ये ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता वापरासंदर्भात भर दिला जात आहे. सध्या महाराष्ट्रातील काही शेतकरी एकरी १०० ते १५० टनाचा टप्पा गाठत असले तरी सर्वसामान्य शेतकऱ्यांचे सरासरी उत्पादन हे अत्यंत कमी (४० ते ४५ टनांच्या आसपास) आहे.

वेळीच तोडीअभावी दीर्घकाळ शेतात ऊस राहिल्यामुळे साखर उताराही कमी येतो. नव्या कृत्रिम बुद्धिमत्ता, कॉझल मशिन लर्निंग, संगणकीय दृष्टी इ. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे अशा सामान्य शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होईल. हवामानाचे अंदाज वेळीच मिळाल्यामुळे पिकासाठी वापरल्या जाणाऱ्या पाणी, खते, कीडनाशके व अन्य निविष्ठांचे प्रमाण कमी राहील.

त्यामुळे जमीन, पाणी आणि हवा यांच्या प्रदूषणाचे प्रमाण कमी राहून, जमिनी क्षारपड होणे, रसायने व खते मिसळल्यामुळे प्रवाही पाणी व भूजल खराब होणे इ. समस्या टाळता येणे शक्य होईल. साखरेचे प्रमाण अत्युच्च असतानाच तोडणीची सूचना शेतकरी आणि कारखान्याला मिळून त्या दृष्टीने तोडीचे नियोजन केल्यास साखर उताऱ्यामध्ये वाढ होईल.

Krushik
Agrowon Agriculture Exhibition 2024 : सिंचन सुविधा, आधुनिक तंत्रज्ञानाकडे कल

या तंत्रज्ञानाचा होणार शेतामध्ये वापर

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)

इंटरनेटद्वारे यंत्रे, अवजारे यांची जोडणी (आयओटी - इंटरनेट ऑफ थिंग्ज)

आभासी वास्तव किंवा सत्यता (व्हर्च्युअल रिॲलिटी)

संवर्धित वास्तव किंवा सत्यता (ऑगमेंटेड रिॲलिटी)

ड्रोन तंत्रज्ञान सॅटेलाइट मॅपिंग रिमोट सेन्सिंग

पहिल्या टप्प्यात एआय आणि आयओटी तंत्राच्या शेतीतील वापरावर भर दिला आहे.

... अशी करता येईल शेतकऱ्यांना नोंदणी

कृषिक प्रदर्शनातील ‘फार्म ऑफ दी फ्युचर’ च्या प्रकल्पाला भेट द्यावी. येथे केवळ २० रुपयांमध्ये आपल्याला नोंदणी (रजिस्ट्रेशन) करता येईल. एका छोट्या फॉर्मवर आपली व आपल्या शेतीसंदर्भात काही प्रश्नाची उत्तर लिहावयाची आहे.

तिथे agripilot.ai चे मोबाईल अॅप व संगणकासाठी डॅशबोर्ड डाऊनलोड करता येईल.

त्यासाठी युजर आयडी आणि पासवर्ड दिला जाईल.

प्रति एकर प्रति वर्ष १०० रुपये या प्रमाणे उपग्रहाच्या सेवा उपलब्ध होतात. त्यात वातावरणातील सर्व घटकांची माहिती, जमिनीतील अन्नद्रव्ये, पिकांची निवड ते काढणीपर्यंतचे नियोजन मार्गदर्शन उपलब्ध होते.

शेतासाठी स्वयंचलित हवामान केंद्र आणि पिकातील सर्व प्रकारचे सेन्सर घेणार असल्यास प्रकार आणि दर्जा यानुसार ३० ते ६० हजार रुपये खर्च येतो. हे सेन्सर साधारण १० एकरपर्यंत सलग क्षेत्रासाठी पुरेसे होतात.

प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ऊस, मिरची (ढोबळी आणि तिखट), टोमॅटो, स्ट्रॉबेरी या पिकांसंदर्भात सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे. भविष्यात महाराष्ट्रातील सर्व पिकांच्या सेवा देण्याचा मानस आहे.

...अशी होईल शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाची मदत

● पिकाची निवड ः मॅपिंगनंतर ज्या पिकासाठी जमीन योग्य आहे, तेच पीक लावण्याची शिफारस मिळते. आपल्याकडील पीक पद्धतीतून योग्य ते पीक निवडण्यासाठीही हे तंत्रज्ञान उपयोगी ठरते.

● सिंचन ः जमीन वाफसा स्थितीमध्ये असताना पिके अत्यंत कार्यक्षमपणे अन्नद्रव्यांचे शोषण करू शकतात. त्यामुळे जमिनीतील आर्द्रतेची स्थिती जाणून घेण्यासाठी या प्रकल्पामध्ये वरील थरातील एक आणि दीड ते दोन फुटांवरील ओलावा मोजण्यासाठी दोन प्रकारचे सेन्सर लावण्यात आले आहेत. त्यामुळे वरच्या थरात वाढणारे उसासारखे पीक किंवा मुळे खोलवर जाणारी फळ पिके यांच्या सिंचनाचे नियोजन करता येते. त्यामुळे जमीन कायम केवळ वाफसा स्थितीमध्ये राहिल्याने पिकांची वाढ जोमात होते. त्यासोबतच पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होते.

● आवश्यक तिथेच खते किंवा कीडनाशकांची फवारणी : उपग्रहाची माहिती आणि सेन्सर्सद्वारे सातत्याने उपलब्ध होत असलेल्या माहितीमुळे पिकाच्या वाढीसाठी आवश्यक त्या मूलद्रव्याची कमतरता लगेच लक्षात येते. मग पिकाच्या तेवढ्याच भागामध्ये आपण स्पॉट अॅप्लिकेशन करून खते किंवा कीडनाशकांची फवारणी करू शकतो. ही कामे आपण मजुरांच्या साह्याने करू शकतो.

● आयओटीचा वापर ः सध्या शेती क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी मनुष्यबळाची मोठी कमतरता भासत आहे. भविष्यात त्यात आणखीच वाढ होणार आहे. हे लक्षात घेता या कृत्रिम बुद्धिमत्तेला अन्य स्वयंचलित यंत्राची, उपकरणाची जोड देण्याचेही नियोजन केले जात आहे. त्यात अत्याधुनिक सिंचन यंत्रणा, ड्रोन किंवा स्वयंचलित रोबोट यांच्या वापरासंदर्भात प्रयोग सुरू आहेत. ही सारी यंत्रे शेतकऱ्याच्या आणि कृत्रिम बुद्धिमत्तेकडून मिळणाऱ्या सूचनांप्रमाणे कार्यरत होतील. यालाच इंटरनेट ऑफ थिंग्ज म्हणतात. त्यात विविध उपकरणे, सेन्सर्स यांची एकमेकांशी माहितीची देवाणघेवाण करून त्याद्वारे विविध कामे पार पाडू शकतील. म्हणजेच प्रत्येक वेळी शेतकऱ्याला शेतावर लक्ष ठेऊन ही कामे करण्याची गरज कमी होईल. त्यातून मजुराच्या समस्येसह शेतकऱ्याला मानसिक ताणातून मुक्ती मिळण्यास मदत होईल.

● प्रमुख पिकांसाठी योग्य शिफारशी : राज्यातील प्रमुख पिकांसाठी वेगवेगळ्या परिस्थितीनुसार कामांच्या शिफारशी व पीक उत्पादन मार्गदर्शिका तयार केल्या जात आहेत. त्यासाठी ट्रस्टमधील संशोधक, राज्यातील चारही विद्यापीठांसह कर्नाटकातील धारवाड आणि बंगलोर येथील विद्यापीठातील शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. सोबतच भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या विविध पिकांमध्ये कार्यरत संशोधन संस्था, केंद्रे यांची मदत होत आहे.

कृषिक प्रदर्शनामध्ये काय पाहता येईल?

अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती आयोजित ता. १८ ते २२ जानेवारी या कालावधीमध्ये बारामती येथे होणाऱ्या कृषिक या कृषी प्रात्यक्षिकयुक्त प्रदर्शनामध्ये वेगवेगळे अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पाहता येईल.

देशातील पहिली भविष्यातील शेती क्लस्टर आधारित प्रात्यक्षिके - विविध देशी परदेशी भाजीपाला, टोमॅटो, मिरची, मका, ऊस, गळीत धान्य, भरडधान्ये, सेंद्रिय शेती, जिरायती शेती, पशुसंवर्धन, आधुनिक अवजारे, यंत्रे व प्रक्रिया उद्योग इ.

अधिक उत्पादनक्षम उच्च तंत्रज्ञानयुक्त संरक्षित शेती - पॉलिहाउस, शेडनेट हाउसमध्ये थरांची शेती (व्हर्टिकल फार्मिंग), मातीविना शेती, अॅक्वापोनिक्स, हायड्रोपोनिक्स, एअरोपोनिक्स इ.

नावीन्यपूर्ण शेती तंत्रज्ञान - विविध देशी परदेशी पिके, इन्सेक्टनेट, बांबूचे कमी खर्चाचे शेडनेट, नॅनो खते, अवर्षण आणि अन्य अजैविक ताणांवरील उपाययोजना, वनशेतीतील चंदन, मिलिया डुबिया इ.

नैसर्गिक शेती तंत्रज्ञान - यात सेंद्रिय शेती, जैविक शेती, संपूर्ण नैसर्गिक, होमिओपॅथी तंत्राचा वापर यासह सेंद्रिय खते उदा. गांडूळखत, स्फुरदसमृद्ध सेंद्रिय खत (प्रॉम), पालाशयुक्त खते इ.

पशुपक्षी प्रदर्शन - संकरित जर्सी, होलस्टिन फ्रिजियन इ. परदेशी आणि थारपारकर, साहिवाल, गीर इ. दुधाळ गायींच्या विविध प्रजाती व त्यांच्यातील दूध काढण्याची स्पर्धा; उत्तम कालवडींचा हिरकणी शो; खिलार, लाल कंधारी, देवणी इ. देशी जातीचे देखणे बैल व गायी; मुऱ्हा, पंढरपुरी इ. म्हशींच्या विविध जाती पाहता येतील. पक्षिपालनामध्ये कोंबड्याच्या विविध प्रजाती, बटेरपालन, बदकपालन पाहता येईल. ता. १९, २० जानेवारी रोजी देशी परदेशी वाणांच्या श्‍वानांचे प्रदर्शन आयोजिले आहे. आणि ता. २०, २१ जानेवारीला डॉ. अप्पासाहेब पवार अश्‍वप्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

भरडधान्य : उत्पादन आणि त्यावरील प्रक्रिया केंद्र

फुलशेती - देशी परदेशी फूलजाती उदा. ऑर्किडचे १५ प्रकार, सेलोशिया, झिनिया, सलविया, ग्लॅडिओलस, शेवंती, पांढरा झेंडू, जिप्सोफीला, लिमोनियम, अॅस्टर, स्पायडर लिली, डेलिया, गुलछडी इ.

देशी बियाणांचे प्रात्यक्षिक - रानभाज्या, पालेभाज्या, फळभाज्या, कंद भाज्या इ.

(लेखक अॅग्रोवनमध्ये वरिष्ठ उपसंपादक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com