
Nashik News : नाशिक : दिवाळीत वेतनापोटी जमा होणारी रक्कम एकरकमी न मिळाल्याने आक्रमक झालेल्या नाशिक जिल्हा सहकारी संस्था सेक्रेटरी व कर्मचारी युनियनने बँकेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. याबाबत जिल्ह्यातील २७९ सचिवांनी कामकाजाबाबत असहाकर पुकारला आहे. यामुळे बँकेची १ नोव्हेंबरपासून सुरू झालेली वसुली ठप्प झाली आहे. याबाबत संघटनेने विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक यांना पत्र दिले आहे. जिल्ह्यात एकूण एक हजार २१ प्राथमिक कृषी सेवा सहकारी संस्था असून, त्यांपैकी आदिवासी सहकारी संस्था वगळून उर्वरित ८५० संस्थांवर एकूण २६९ सचिव गटसचिव कामकाज करीत आहेत. सचिवांची वेतनाची रक्कम एकरकमी न मिळता आठवड्याला पाच हजार रुपये रक्कम मिळते.
तीही नियमित मिळत नाही. यामुळे गटसचिव आर्थिक अडचणीत सापडले आहेत. ‘दिवाळी’साठी जिल्हा गटसचिव संघटनेने गटसचिवांचे वेतनापोटी जमा होणाऱ्या बचत खात्यातील ५० हजार मिळण्याची बँकेकडे मागणी केली होती. त्यावर जिल्हा बँक प्रशासक यांच्या समवेत झालेल्या बैठकीत गटसचिवांची ५० हजारांची मागणी होती. जिल्हा बँक केवळ १० हजार देण्यास तयार असताना २० हजार रुपये रक्कम वेतनाच्या पोटी जमा रकमेतून एकरकमी देण्यात यावी, अशी सूचना बँकेस विभागीय सहनिबंधकांनी केली.
त्यानुसार गटसचिव संघटनेस ते मान्य झाले होते. मात्र, प्रशासकाने १५ हजार गटसचिवांना बँकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे दिवाळी अॅडव्हान्स १०.५० टक्केव्याजदराने पाच समान मासिक हप्त्यांमध्ये देण्याचा निर्णय घेतला व त्याबाबतचे पत्र संघटनेला दिले. मात्र, संघटनेसह सचिवांनी त्यास विरोध केला. जिल्हा बँक प्रशासन गटसचिवांची आर्थिक पिळवणूक करीत असल्याचा आरोप संघटना पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या संदर्भात संघटनेने जिल्हा उपनिबंधक, विभागीय सहनिबंधकांनापत्र दिले. गटसचिवांच्या वेतनापोटी जिल्हा बँक बचत खात्यावरील जमा होणारी दरमहा वेतनाची रक्कम एकरकमी न मिळाल्याने बँकेच्या कामकाजावर बहिष्कार टाकत आहेत; परंतु निधीअभावी संस्थांच्या संगणकीकरण व शासन-प्रशासनाच्या कामकाजावरसुद्धा बहिष्कार टाकण्याची वाईट वेळ मानसिकता नसताना जिल्हा बँकेने आणून ठेवली आहे.
यावर तत्काळ योग्य तो निर्णय व्हावा अन्यथा जिल्हा बँक व सहकार खात्याचे सर्व कामकाजावर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा पत्रात दिला आहे. पत्रावर संघटनेचे गटसचिव संघटनेचे राज्याध्यक्ष विश्वनाथ निकम, जिल्हाध्यक्ष देवीदास नाठे, किरण गोसावी, विलास शिरसाट, राजेंद्र कासव (चांदवड), चंद्रकांत आवटे, सुनील माळी, नंदकिशोर पवार, राजू गोसावी, विठ्ठल कोटकर, नारायण गोरे, बाळासाहेब खोकले, अमित थिटे, संजय ढिकले, विलास पेखळे, मुन्ना बोरसे, सुनील पवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.