
Solapur News : पांगरी (ता. बार्शी) भागात वीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिके धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने सोयाबीन, उडीद, तूर, मूग यासारखी खरीप पिके सुकू लागली आहेत. पैशाचे व नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीन पिकावर याचा विशेषतः मोठा परिणाम होत आहे.
या भागात मे महिन्याच्या मध्यावर जोरदार पावसाने सुरुवात झाली. पावसामुळे नदी, नाले, तलाव पाण्याने भरले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई केली. काही शेतकऱ्यांच्या शेतात पावसामुळे दलदल निर्माण झाल्याने अद्याप पेरणी होऊ शकली नाही. जे शेतकरी लवकर पेरणी करू शकले त्यांनी पिके पंधरा ते वीस दिवसांपर्यंत वाढवली आहेत.
परंतु पावसाच्या अभावामुळे पिके मरगळलेली दिसत आहेत. त्यात दिवसभर जोरदार वारे वाहत असल्याने जमिनीतील ओलावा संपत चालला आहे. या वाऱ्यामुळे तणनाशक, किटकनाशक फवारणी अडथळा निर्माण झाली आहे.
दरम्यान, पंधरा दिवसानंतर तणनाशक फवारणी करणे अत्यावश्यक असते. मात्र पाऊस नसल्याने आणि ओलावा कमी झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी फवारणीकडे पाठ फिरवली आहे. परिणामी सोयाबीन पिकांवर अळीचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. यावर पिकांवर कीडनाशकांची फवारणी न झाल्यास मोठे नुकसान होऊ शकते.
पाण्याची उपलब्धता असलेल्या काही शेतकऱ्यांनी स्पिंकलरने पिकांना पाणी देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र डोंगराळ, माळरान भागातील शेतकऱ्यांना पाण्याची सोय नसल्यामुळे पिके हातून जातील की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या भागातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी खरीप कांदा लागवडीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. ममदापूर परिसर कांद्याच्या उत्पादनासाठी अग्रेसर असून शेतकरी कांदा बियाणे टाकून रोप तयार करण्याचे कामकरू लागले आहेत. शेतकऱ्यांनी पाऊस लवकर यावा आणि पिकांना जीवदान मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.