
गंगा बाकले
Spiritual Growth : महाराष्ट्राच्या मातीला संत परंपरा लाभली आहे. अनेक संतांनी येथे जन्म घेऊन समाजाला उपदेश केला आहे. यामध्ये अनेक महिला संतांचाही सहभाग आहे. अशी संत परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रातील एक अनोखा संत म्हणजे संत गाडगेबाबा. ते कर्ते संत होते, हे त्यांचे विशेष! संत गाडगेबाबांचे विचार हे वास्तववादी व विज्ञानवादी आहेत.
एक निरक्षर व्यक्ती पण विचार मात्र संशोधकाप्रमाणे, प्रत्येक गोष्ट निरखून-पारखून पाहण्याची सवय. शब्दपंडित होऊन केवळ तोंडसुख घेण्यापेक्षा कृती-भक्तीने हाताची भाषा बोलणारा निष्काम कर्मयोगी म्हणूनच जग संत गाडगेबाबा यांना ओळखते. त्यांचा जन्म परिटाच्या घरचा, बारा बलुतेदारांपैकी एक बलुतेदार, ज्याचे काम लोकांच्या कपड्यांची घाण साफ करणे, त्याऐवजी त्यांनी लोकांच्या मनातील घाण साफ करण्याचा वसा घेतला व तो आजन्म पाळला. समाज दुःखमुक्त करणे यासाठी ते सातत्याने झटले.
कण-कण करून कोटी केले,
कण न खर्चला स्व-हितासाठी,
वणवण फिरुनी, कण-कण झिजले
बाबा दुःखी जनतेसाठी
गाडगेबाबांचे विचार, त्यांचे राहणीमान, त्यांचा पोशाख याविषयी काही जणांना माहिती आहे. त्यांच्या डोक्यावर फुटलेल्या गाडग्याचे खापर असायचे म्हणून ते ‘गाडगेबाबा.’ पण त्यापेक्षा गाडगेबाबांच्या वेगळ्या बाजू माझ्या वाचनात आल्या आणि त्यावरून मला लिहिण्याचा मोह झाला. गाडगेबाबांकडे जेव्हा आपण एक माणूस म्हणून पाहतो, त्या वेळी त्यांचे अनेक पैलू आपल्या डोळ्यांसमोर उभे राहतात.
लहानपणापासूनच अनेक अडचणी, समस्या यांच्याशी झुंज देत त्यांचे बालपण घडलेले आहे. सुरुवातीला सर्व काही चांगले असताना वडिलांच्या व्यसनाधीनतेमुळे सर्वकाही गमावून बसणारे, जीवनातील अनेक वाईट परिस्थितीचा अनुभव घेणारे व्यक्तिमत्त्व म्हणजेच डेबूजी झिंगराजी जानोरकर. लहानपणापासूनच व्यसनाधीनता, देवाच्या नावावर केले जाणारे अनेक कर्मकांडं यांचा एक वेगळाच परिणाम डेबूजींच्या मनावर झाला. त्यांनी विचारकार्याने स्वतःला आणि समाजाला सावरले.
डेबूजी लहानपणापासूनच कृष्णाला आदर्श मानत असत, त्यांच्याप्रमाणे त्यांनी गोपालनही केले. त्यांचे आवडते भजन ‘गोपाला-गोपाला देवकीनंदन गोपाला’ हेच आहे. गाडगेबाबांनी त्यांच्या आयुष्यात गुराखी, आदर्श शेतकरी व सावकारीला धडा शिकवणारे खंबीर नेतृत्व अशा अनेक भूमिका वठविल्या आहेत. ते जे काम करत ते अगदी मनातून व मेहनत घेऊन करत. त्यामुळे त्यांना त्यातून अनुभव मिळत असत. अनेक लोक त्यांच्याकडे पाहून - त्यांना आदर्श मानून काम करत असत. आदर्श समाजाच्या निर्मितीसाठी त्यांनी हितोपदेश केला. ते सांगायचे,
• कर्ज काढून सणवार करू नका.
• दारू पिऊन धुंद होऊ नका.
• कष्टाशिवाय जगू नका.
• ऐश्वर्याने उन्मत्त होऊ नका.
• मुलाबाळांना शाळेत घातल्याशिवाय राहू नका.
या साध्या-सोप्या उपदेशातून त्यांनी जीवनाचे सार लोकांसमोर मांडले आहे. जीवन जगत असताना सरळ पद्धतीने पण स्वाभिमानाने कसे जगावे? याचा एक आदर्शपाठ त्यांनी जगासमोर ठेवला आहे. त्यांनी कीर्तनात कोणत्याही प्रकारच्या नमस्कार -चमत्काराला कधी स्थान दिले नाही, लोकांना सरळसरळ प्रश्न विचारून त्यांच्या विचारांची दारे उघडली आहेत, त्यांना विचार करायला.
भाग पाडून- त्यांच्याकडून उत्तरे काढून घेऊन वास्तववादी विचार त्यांच्यासमोर ठेवले आहेत. त्या वेळी समाजात अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा होत्या. पशुबळी, हुंडाबळी, नरबळी या अंधश्रद्धांपासून समाजाला जागे करण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या कीर्तनातून केला. कीर्तनाच्या बदल्यात लोकांकडून कोणत्याही अपेक्षा न ठेवता निःस्वार्थी भावनेने त्यांनी हे समाजकार्य केलेले आहे.
देव फक्त आणि फक्त भावाचा भुकेला आहे. तुमच्याकडून कोणत्याच प्रकारच्या अपेक्षा देव कधीच करत नाही. देवाला काहीतरी देण्याची आपली लायकी आहे का, असा प्रश्न विचारून त्यांनी समाजासमोर माणसातील देवगुणांचे महत्त्व पटवून दिले आहे. गाडगेबाबांनी आपल्या अनेक कीर्तनांतून संत तुकारामांच्या अभंगांचे अर्थ लोकांसमोर मांडले आहेत. ‘‘माणूस कधीही त्याच्या कर्मानेच मोठा होतो.
जे कर्म त्याच्या हाती आहे, ते त्याने अवश्य करावं. ते टाकू नये - अर्ध्यात सोडू नये. कर्म हे आपल्या लायकीने मिळते, ते हीन समजू नये’’, असे ते नेहमी सांगत असत. श्रीकृष्णाने गुरे वळली, अर्जुनाने घोडी धुतली, मुक्या जिवांना दाणापाणी केले. महात्मा गांधीजींनी झाडूचे काम केले. कामाने शरीर सशक्त व मन निर्भय बनते, अशा पद्धतीने अनेक उदाहरणांतून त्यांनी कर्माचे महत्त्व पटवून दिले आहे.
अनेक प्रकारच्या सामाजिक सेवा देण्याचे कामही त्यांनी केले आहे. अनेक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी घाट बांधणे, वृद्धांसाठी वृद्धाश्रम बांधणे, आजाऱ्यांसाठी दवाखाने, धर्मशाळा, मठ, पाणपोई, स्वच्छता, भुकेलेल्यांना अन्न... अशा प्रकारची अनेक कामे बाबांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेली आहेत. गाडगेबाबांनीच साऱ्या समाज सुधारकांना झाडूचे तंत्र शिकवलं आहे. स्वच्छतेकडून समृद्धीकडे नेण्याचे काम त्यांच्यामुळेच शक्य झालेले आहे. लौकिक अर्थाने निरक्षर असून सुद्धा विज्ञान, निसर्ग, महिला समानता यासारख्या अनेक गोष्टींचे प्रचंड ज्ञान गाडगेबाबांकडे होते. तेच ज्ञान आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या डोक्यात मुरवणारे ते महान साधक होते.
गुरू म्हटलं, की आपण एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा विचार करतो. पण गाडगेबाबांनी मुंगीला गुरू मानून - मुंगीप्रमाणे कष्ट करण्याचा वसा त्यांनी घेतला. एखादे काम हाती घेतले, की ते शेवटपर्यंत नेण्यासाठी ते अतोनात प्रयत्न करत असत. त्यामध्ये खंड पडला तर ते अस्वस्थ होऊन त्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू करत.
जेव्हाचे काम तेव्हाच पूर्ण करावे, ते तसेच पडून राहू देऊ नये, असे ते सांगत. ‘‘मी कुणाचा गुरू नाही आणि माझा कोणी शिष्य नाही, प्रत्येकाने आपले काम प्रामाणिकपणे व वेळेत पूर्ण करावे’’, असा उपदेश ते लोकांना ठणकावून सांगत. बाबांची प्रवचनाची रीत वेगळी, भाषा वेगळी आणि लिपी पण वेगळी तरीही या वेगळ्या पद्धतीची त्यांनी समाजाच्या मनावर एक वेगळी छाप उठवली आहे. ज्यातून लोकांना वास्तववादी विचार करण्याची प्रेरणा मिळते.
२३ फेब्रुवारी १८७६ रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी शेणगाव, जिल्हा अमरावती येथे जन्माला आलेले ‘डेबू’ नावाचे बाळ आयुष्यभर समाजासाठी जगून, समाजाला नवीन विचारधारा देऊन आणि एकसंध समाजाची बांधणी करून २० डिसेंबर १९५६ रोजी आपला जीवनप्रवास यशस्वी करून निघून गेले. मात्र विचारकार्यांनी अमर झाले. संत गाडगेबाबा म्हणजे, एक फिरते व्यासपीठ, चालते-बोलते संस्कारपीठ आणि दिन-दलितांचे विद्यापीठ होय. त्यांच्यासारखे कर्मविद्यापीठ जगात नाही. माणसांच्या भल्यासाठी माणसाला कर्मविचारांनी जागृत ठेवणाऱ्या संत गाडगेबाबांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करून - त्यांचे मानवतेचे विचार प्रत्येक मानवाच्या मनामनांत वर्धिष्णू व्हावेत, एवढीच सदिच्छा!
(लेखिका प्राथमिक पदवीधर शिक्षिका आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.