
This is a special conversation with Parag Vaze :
तुमच्यासारखा एक मराठमोळा माणूस नासा संस्थेमध्ये अभिमानास्पद कामगिरी बजावताना दिसत आहे.
तसे बघता नासा ही अवकाश विज्ञान क्षेत्रातील एक महत्वाची संस्था आहे. येथे मानवजातीच्या कल्याणार्थ अनेक देशांचे शेकडो वैज्ञानिक, तंत्रज्ञ एकत्रितपणे विविध प्रकल्पांवर काम करीत असतात. नासामधील सारेच शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ व अभियंते आपापल्या पातळीवर बहुमोल कामगिरी बजावत असतात. त्यांच्या समूहात काम करण्याची संधी मला गेल्या ३० वर्षांपासून मिळतेय; आणि ते मी माझे भाग्य समजतो. तसा मी पुण्यातील मराठी कुटुंबातला. माझा जन्म मध्य प्रदेशात झाला; परंतु वडिलांनी त्यांच्या नोकरीनिमित्ताने मला आठव्या वर्षीच अमेरिकेत नेले.
तेथे मी विद्युत अभियांत्रिकी (इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग) विषयात पदवी तसेच संगणक शास्त्रात (कॉम्प्युटर सायन्स) पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले. उपग्रहांमधील विद्युत अभियांत्रिकीत कार्यरत असलेल्या एका खासगी संस्थेत मी प्रारंभी दोन वर्षे नोकरी केली. त्यानंतर नासासाठी उपग्रह तयार करणाऱ्या ‘जेपीएल’मध्ये मला सेवेची संधी मिळाली. तेथे मी आजपर्यंत विविध प्रकल्पांवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत आलो आहे. सध्या मी तेथील भूपृष्ठशास्त्र (अर्थ सायन्स) विभागाचा साहायक संचालक आहे. स्वॉट (सरफेस वॉटर ओशन टोपोग्राफी) प्रकल्पावर नासा आणि फ्रेंच स्पेस एजन्सीकडून (सीएनईएस) संयुक्तपणे काही वर्षांपासून काम सुरू होते. शेवटी २०२२ मध्ये स्वॉटचा उपग्रह सोडला गेला. या स्वॉटचेही काम मी सांभाळतो आहे.
आम्ही सारे कर्मचारी नासात मुख्यत्वे मानवी कल्याणासाठी काम करीत असतो. उपग्रहांची बांधणी तेथे होते. ते अवकाशात सोडले जातात. उपग्रहांनी अवकाशातून पाठवलेल्या माहितीचा उपयोग मानव जातीच्या समृद्धी, कल्याण आणि विकासासाठी कसा वापर होईल, हा नासाचा मुख्य उद्देश असतो. हवामान, पाणी, बर्फ, वायूमंडल अशा विविध क्षेत्रांतील ही माहिती असते. काही उपग्रहांकडून नासाला मिळणारी माहिती साऱ्या जगाला मोफत उपलब्ध करून दिली जात असते. ही माहिती जगभर विविध क्षेत्रांत वापरली जावी, त्यातून लोकांचे जीवनमान उंचावत जावे, असा आमचा सतत प्रयत्न असतो.
तुम्ही कार्यरत असलेल्या ‘स्वॉट’ प्रकल्पाची नेमकी उद्दिष्टे काय आहेत?
प्रथमतः आम्ही विविध खंडांमधील समुद्रांच्या खाऱ्या पाण्याचे मोजमाप करण्याच्या तंत्रावर काम सुरू केले. तुम्हाला माहिती आहे, की हवामान बदलामुळे उष्णता वाढते आहे. ही उष्णता मुख्यत्वे समुद्र साठवून ठेवत असतो. जवळपास ७० टक्के उष्णता समुद्र साठवतो आहे. त्यामुळेच तर समुद्राची पातळीदेखील वाढते आहे. यातून गेल्या ३० वर्षांत आपण हवामान बदलातील मोठमोठ्या घडामोडी अनुभवल्या आहेत. मी शाळेत असताना जगाची लोकसंख्या ५०० कोटी होती. आता तो आकडा वाढून ८०० कोटींच्या पुढे गेला आहे. त्यामुळे मानवी जात टिकून राहण्यासाठी आता माणसाला पिण्यासाठी, शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागणार आहे. आम्ही हीच बाब विचारात घेतली आहे. त्यासाठी सागरी जलसाठे आणि पिण्याचे पाणी याच्याशी संलग्न संशोधनावर नासाकडून भर दिला जात आहे.
तुमच्या एक ध्यानात येईल की, जगातील मानवी वसाहती मुख्यत्वे जलस्रोतांच्या बाजूला (उदा. नदी, समुद्र, धरण, तळी यांच्या काठाला) वसलेल्या आहेत. या जलस्रोताचे बिनचूक मोजमाप कसे होईल, यासाठी नासा आता धडपडते आहे. त्यासाठी आमचे नासाचे वैज्ञानिक अंतराळात सोडलेल्या उपग्रहाची मदत घेत आहेत. उपग्रहांच्या मदतीने भूपृष्ठीय जलस्रोतांचे बिनचूक मोजमाप घेण्यात आम्ही यशस्वी झालो आहेत. पृथ्वीवरील कोणत्याही भागातील अगदी ५० मीटर लांब आणि १० सेंटिमीटर उंचीचे जलस्रोतसुद्धा आता आम्ही मोजू शकतो. विशेष म्हणजे मोजमाप करण्याची ही सोय कोण्या एका देशापुरती किंवा एका जलस्रोतापुरती मर्यादित राहिलेली नाही.
माझ्या मते हेच आमच्या ‘स्वॉट’चे वैशिष्ट्य आहे. स्वॉट उपग्रह तयार करताना सागरी व भूपृष्ठावरील कोणत्याही भागातील पिण्यायोग्य पाण्याचे (उदा. नदी, तलाव, धरण) मोजमाप बिनचूकपणे करणारे तंत्रज्ञान उपग्रहात वापरण्यात आले आहे. त्यामुळे पाण्याची केवळ उंचीच नव्हे; तर उतार, प्रवाहाचा वेग मोजण्याची सुविधा आता उपलब्ध झाली आहे. आम्ही ५० मीटरपेक्षा जास्त रुंदी असलेल्या कोणत्याही नदीच्या पाण्याची मोजमापे आता बिनचूक घेऊ शकतो. दर चार-पाच दिवसांनी उपग्रह तुम्हाला पाण्याची ताजी माहिती देतो आणि तीदेखील मोफत.
म्हणजेच या मोजमापाच्या आधारे तुम्ही कोणत्याही नदीमधील पाणी, उंची, प्रवाह मोजू शकता. या नोंदींच्या आधारे तुम्ही पिण्याच्या पाण्याचे, शेती सिंचनाचे व्यवस्थापन अधिक काटेकोर करु शकता. सध्यादेखील पाण्याची मोजमापे घेतली जातात; परंतु ती मानवी मदतीने. मात्र आमच्या स्वॉट प्रकल्पामुळे उपग्रहाद्वारे पाण्याची मोजमापे जलद, बिनचूक व मोफत मिळण्याची सुविधा प्रथमच उपलब्ध होत आहे. त्यामुळे मला वाटते, की नासाच्या ‘स्वॉट’ प्रकल्पाची ही माहिती शेती सिंचन नियोजनात व पाणीटंचाई व्यवस्थापनात जगभर अत्यंत मोलाची भूमिका बजावणार आहे.
भारतासाठी ‘स्वॉट’ तंत्रज्ञानाचा उपयोग कसा होईल?
हे बघा, भारतामधील कोणत्याही भागातील पाण्याची उंची, उतार, प्रवाहाचा वेग, उपलब्धता मोजण्याची उपग्रहीय सुविधा यापूर्वी नव्हती. ‘स्वॉट’मुळेच ही सुविधा मोफतपणे आपल्या दारात आली आहे. त्यामुळे या माहितीचा वापर झाला पाहिजे, असे मला वाटते. यासाठी तुम्हाला काही नवे संगणकीय प्रणाली, पद्धती, प्रतिकृती विकसित कराव्या लागतील. अर्थात, त्यासाठी अत्यावश्यक असलेले मार्गदर्शन करण्याची तयारी नासाची आहे.
जगात या माहितीचा वापर केला जातोय; पण तो भारताने तसेच महाराष्ट्रातील विविध संस्था, तंत्रज्ञ, वैज्ञानिक, सरकारी यंत्रणांनी मोठ्या प्रमाणात करावा, असा माझा व्यक्तिगत आग्रह आहे. त्यासाठी https://swot.jpl.nasa.gov/ या संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी. जलस्रोतविषयक ही माहिती आपण वापरल्यास भारताच्या कृषी विकासाला नवे पैलू मिळतील, अशी मला खात्री आहे. सुदैवाने आपल्या भारताला नद्यांचे विशाल जाळे लाभले आहे.
या देशात पिण्यासाठी अफाट पाणी लागते. शेतीसाठीही भरपूर पाणी लागते. त्याकरिता नद्यांवर, जलाशयांवर अवलंबून राहावे लागते. अशावेळी या जलसाठ्यांमधील पाण्याचे बिनचूक व जलद मोजमाप करणे हा कळीचा मुद्दा बनतो. ही सुविधा भारताला मिळाल्यास नियोजनात निश्चित मोठे बदल होतील. नियोजनात एकदा बदल झाले की त्याचे अनेक लाभ निश्चितच मिळतील, असे मला वाटते.
‘स्वॉट'ची माहिती भारताने वापरावी, यासाठी काय करायला हवे?
जलस्रोत व्यवस्थापनात ‘स्वॉट’ची माहिती मोलाची भूमिका बजावते. त्यामुळे ही माहिती वापरणारी उपयोजने (अॅप्लिकेशन्स) जगभर आहेत. पण त्यासाठी आता भारतीय संस्थांनी, यंत्रणांनी पुढे यावे, असे मला वाटते. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) या माहितीमध्ये रस घेतला, याचा मला आनंद आहे. माझे म्हणणे असे आहे, की आधी भारतीय संस्थांनी ही माहिती काळजीपूर्वक अभ्यासावी, त्याचा वापर करावा आणि वाढवावा. त्यात काही समस्या येत असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी अनेक संसाधने नासाने उपलब्ध करुन दिली आहेत. त्यामुळे या प्रकल्पाबाबत कोणत्याही शंका असल्यास https://podaac.jpl.nasa.gov या संकेतस्थळावर कोणीही संपर्क करू शकते. तेथे शंकानिरसन केले जाते.
मी सध्या कॅलिफोर्नियात राज्यात राहतो. या राज्यात जगातील सहावी कृषी आधारित अर्थव्यवस्था आहे. केवळ एका राज्याला पाण्याच्या नियोजनाचे किती लाभ मिळतात हे मी जवळून बघतोय. त्यामुळे भारताने देखील स्वॉटचा वापर करीत नियोजनात थोड्या जरी सुधारणा केल्या तरी; त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम अतिशय दूरगामी आणि अनुकूल असतील. भारतीय कृषी सिंचनात, पिण्याच्या पाणी नियोजनात काही मूलभूत सुधारणा होण्यास स्वॉटच्या माहितीचा हातभार लागल्यास मला अत्यानंद होईल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.