Kharip Crop Kolhapur : खरिपाच्या पेरणीला घरच्या बियाणातून आता फुटणार नवे अंकूर

New Seed : सोयाबीन, भातासह अनेक टन बियाणे घरातीलच वापरण्यात येणार असून या घरच्या बियाणातून आता नवे अंकुर फुटणार आहेत.
Kharip Crop Kolhapur
Kharip Crop Kolhapuragrowon

Agriculture News : सध्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बाजारात शेकडो जातींची बियाणे दाखल झाली आहेत. परंतु जिल्ह्यातील अनेक भागात शेतकरी घरच्या बियाण्याला पसंती देत असल्याचे चित्र आहे. यंदा सोयाबीन, भातासह अनेक टन बियाणे घरातीलच वापरण्यात येणार असून या घरच्या बियाणातून आता नवे अंकुर फुटणार आहेत. दरम्यान याबाबत सोशल मीडियावर बियाणे फोटो टाकून प्रसार केला जात आहे.

खरीप हंगामाचे वेध लागताच शेतकऱ्यांमध्ये शेती मशागत पूर्ण करण्यासह बियाणे, खते, औषधे उपलब्ध करण्यात धडपड पहायला मिळते. तालुक्यात खरिपामध्ये भात, सोयाबीन पिके प्राधान्याने, तर भुईमूग, ज्वारी, मका, नाचणीसह कडधान्ये व तृणधान्ये कमी प्रमाणात घेतली जातात. सोयाबीन १२ हजार २००, तर भाताची ८ हजार ८९० हेक्टरमध्ये यंदा लागवड होणार आहे.

शेकडो कंपन्यांची बियाणे सध्या बाजारात उपलब्ध असून खरेदीसाठी गर्दीही होत आहे. खतांचा साठाही मुबलक प्रमाणात आहे. अलीकडील काही वर्षांपासून सोयाबीन व भात बियाणांची दरवाढ होत आहे. यंदाचे वर्षही त्याला अपवाद नाही. यावर्षी दहा टक्क्यांनी दर वाढल्याचे सांगण्यात येते.

या पार्श्वभूमीवर कृषी विभागातर्फे सोयाबीन व भाताचे बियाणे घरातील वापरण्याचे आवाहन केले जाते. सोयाबीन बियाणे सलग दोन वर्षे वापरले तरी चांगले उत्पादन मिळवून देते. बियाणांची झालेली दरवाढ व कृषी खात्याने केलेल्या प्रबोधनानुसार अलीकडील काही वर्षांपासून शेतकरी घरचे सोयाबीन पेरणीसाठी वापरण्यास प्राधान्य देत आहे. यंदा हे प्रमाण सोयाबीनमध्ये ७५, तर भातामध्ये ४० टक्क्यांवर पोहचले आहे. सोयाबीन हेक्टरी ७०, तर भात बियाणे ४५ किलो लागतात.

यावर्षी घरचे सोयाबीन बियाणे वापरण्याचे प्रमाण ७५ टक्के, तर भाताचे ४० टक्क्यापर्यंत आहे. यामुळे बाजारात विक्रीसाठी सोयाबीनचे २ हजार २३ क्विंटल, तर भात २ हजार २२ क्विंटल बियाणे विक्रीसाठी मागणी केली असून बियाणांचा साठा मुबलक असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

उगवण क्षमता तपासावी

शेतकऱ्यांनी घरचे बियाणे वापरताना त्याची उगवण क्षमता आधी तपासावी. ओल्या सुतळी गोणपाटात हे बियाणे घालून त्याची गुंडाळी करावी. काही दिवसांनंतर त्यातील ७० टक्के बियाणे उगवले असले, तरच एकरी ३० किलोप्रमाणे त्याचा वापर करावा. ६० टक्क्यांपेक्षा कमी उगवण क्षमता असलेली बियाणांची पेरणी करू नये. भात बियाणे वापरताना १० लिटर पाण्यात ३०० ग्रॅम मीठ टाकून त्याच्या आळवणीत भात बियाणे टाकावे.

तरंगणारे बियाणे बाजूला करावेत. तळातील बियाणे स्वच्छ पाण्यात धुऊन सावलीत सुकवल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याची पेरणी करावी. यामुळे भातावरील करपा, कडाकरपा, काजळी रोग नियंत्रणात राहण्यास मदत होते, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे व तालुका कृषी सहाय्यक अधिकारी अनिल कांबळे यांनी दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com