Indian Politics
Indian PoliticsAgrowon

Indian Politics : ‘कुरुक्षेत्रा’वरील महाभारत

Political Conflict : हरियानातील कॉँग्रेसच्या नेत्या कुमारी सेलजा आणि अतिमहत्त्वाकांक्षी नेते भूपिंदरसिंह हुडा यांच्यातील संघर्षाचे पडसाद विधानसभा निवडणुकीत उमटत आहेत. या दोघांमधील वादाचा फायदा उठविण्याचा भाजप प्रयत्न करीत आहे.
Published on

सुनील चावके

BJP strategy : सलग दोनवेळा मुख्यमंत्री राहिलेले भूपिंदरसिंह हुडा आणि त्यांच्या अतिमहत्त्वाकांक्षी व वर्चस्ववादी वृत्तीमुळे सतत डावलल्या जाऊन दिल्लीत वनवास भोगणाऱ्या कुमारी सेलजा यांच्यातील रस्सीखेचीमुळे हरियाना विधानसभा निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर यंदा काँग्रेसमध्ये महाभारत घडू पाहात आहे. हरियानाच्या राजकारणात न्याय्य वाटा मिळावा म्हणून सेलजा यांनी पुकारलेला संघर्ष कौरव-पांडवांमधील सत्तासंघर्षापेक्षा वेगळा नाही. हरियानामध्ये हुडा ज्यांचे नेतृत्व करतात ते जाट मतदार २६ टक्के, तर कुमारी सेलजा ज्यांचे प्रतिनिधित्व करतात ते दलित मतदार २१ टक्के. राज्यघटना संकटात सापडल्याच्या काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या प्रचाराचा परिणाम होऊन नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हरियानातील दलित मतदारांनी सत्ताधारी भाजपला चांगलाच झटका दिला. त्यामुळे हरियानातील भाजपची दलित मते आणि लोकसभेच्या जागा निम्म्यावर आल्या.

हरियानाच्या राजकारणावर वर्चस्व गाजवू पाहणाऱ्या जाट समाजाचे आजच्या घडीला भूपिंदरसिंह हुडा निर्विवाद नेते आहेत. पण हुडा यांच्या आक्रमक राजकारणाने काँग्रेसमधील दलित नेत्यांना पुरेशी संधी मिळू दिलेली नाही. सौम्य पण कणखर बाण्याचे राजकारण करणाऱ्या सभ्य आणि उच्चविद्याविभूषित कुमारी सेलजा यांचा राजकीय प्रभाव त्यांच्या समाजापुरता मर्यादित असला तरी त्या हरियानातील सर्वमान्य आणि काँग्रेसच्या सर्वोच्च दलित नेत्या आहेत. हुडा हरियानातील लोकप्रिय नेते आहेत, पण दोन दशकांपासून हुडा यांचा कणखरपणाने मुकाबला करीत हरियानाच्या राजकारणात पाय रोवून असलेल्या सेलजा यांच्यातही मुख्यमंत्री होण्यासाठीच्या सर्व पात्रता आहेत. त्याची जाणीव काँग्रेसश्रेष्ठींनाही आहे. पण हुडांना सतत झुकते माप देणाऱ्या काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणात सेलजा यांच्या वाट्याला नेहमीच उपेक्षा आली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर दीपिंदर हुडा यांना राज्यसभेवर पाठविताना हुडा यांच्यापुढे झुकलेल्या काँग्रेसश्रेष्ठींनी सेलजा यांना संधी नाकारली. त्या बदल्यात हरियाना प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी सेलजा यांची नियुक्ती करण्यात आली. पण हुडा यांनी त्यांना स्वतंत्रपणे काम करण्याची संधी मिळू दिली नाही. काँग्रेसनिष्ठा आणि गांधी घराण्याशी असलेली घनिष्ठता यामुळे सेलजा यांनी हा सातत्याने होणारा अपमान संयमाने सहन केला.

Indian Politics
Indian Politics : डाव केजरीवालांचा, कसोटी राहुल गांधींची

राजकारणातील उमेदीचा काळ व्यर्थ जात असूनही. यंदा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या यशात जाट मतांपेक्षा जास्त वाटा दलित मतांचा ठरला. ७७ वर्षीय हुडांचे वर्चस्व झुगारुन देण्यासाठी सेलजा यांच्यासाठी यापेक्षा चांगली वेळ असूच शकत नाही. म्हणूनच लोकसभेवर निवडून आल्यावरही त्यांनी मुख्यमंत्रीपदावर दावेदारी करण्यासाठी विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली. पण हुडा यांचा रोष ओढवेल म्हणून काँग्रेसश्रेष्ठींनी त्यांच्या इच्छेला केराची टोपली दाखवली. हरियानात दलित मतदारांपेक्षा जाट मते केवळ पाच टक्क्यांनीच जास्त आहेत. विधानसभेच्या ९० जागांचे तिकीटवाटप करताना सेलजा समर्थकांना केवळ नऊ, तर हुडा यांच्या समर्थकांना ७२ तिकीटे देण्यात आली. म्हणजे आठ पटींनी जास्त. शिवाय सेलजा यांच्या दोन खास उमेदवारांनाही तिकीटे नाकारण्यात आली. ज्या समर्थकांना उमेदवारी मिळाली त्यांच्याविरुद्ध हुड्डा यांनी काँग्रेसचे बंडखोर उभे केले. त्यातच सेलजा यांच्याविरोधात अपशब्द उच्चारले गेले आणि निवडणूक प्रचार रंगात येत असताना एका अनपेक्षित वादाला तोंड फुटले.

हरियानाची मानसिकता

हल्ली प्रतिस्पर्धी पक्षामध्ये एखाद्या महिला नेत्याचा अपमान, मानसिक किंवा शारीरिक छळ झाला की त्यांच्या मदतीला भाजपच्या दुसऱ्या फळीतील नेते कृष्णासारखे धावून येतात. आम आदमी पार्टीच्या राज्यसभा सदस्य स्वाती मालीवाल किंवा काँग्रेसने छळलेल्या राधिका खेडा त्याची ताजी उदाहरणे. भाजपच्या या यादीत यथावकाश दिल्लीच्या नवनियुक्त मुख्यमंत्री आतिशी यांचाही समावेश होईल, अशी चर्चा आतापासूनच सुरु झाली आहे. काँग्रेसश्रेष्ठींनी पुन्हा एकदा डावलल्यामुळे नाराज झालेल्या सेलजा आणि त्यांच्याविरुद्ध वापरलेल्या अपशब्दांचे भांडवल करीत भाजपने हरियानाच्या निवडणूक प्रचारात रान उठवले आहे. हरियानाची मानसिकता समजून न घेता साडेनऊ वर्षे खाष्टपणाने सत्ता दामटणारे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि त्यांचे कट्टर समर्थक काळजीवाहू मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांच्या मनात सेलजा यांच्याप्रती सहानुभूती उफाळून आली आहे. सेलजा यांनी भाजपमध्ये यावे, असा प्रस्ताव त्यांनी दिला आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुका आणि निवडणुकांनंतर भाजपने साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर करीत काँग्रेसच्या हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास हिरावला आहे. सेलजा यांच्या नाराजीमुळे त्या केवळ हरियानाच्या निवडणुकीत केंद्रस्थानी आल्या नाहीत, तर त्यांचे राज्याच्या राजकारणात वजनही वाढले आहे.

Indian Politics
Indian Politics : सत्तेची हाव घातक सिद्ध होतेय

लोकसभा निवडणुकीत दुरावलेल्या जाट आणि दलित मतांमुळे सत्ताधारी भाजपची चांगली कोंडी झाली आहे. भाजपची विवंचना दूर करण्यासाठी दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टीने चंद्रशेखर आझाद ‘रावण’ यांच्या आझाद समाज पार्टीशी हातमिळवणी केली आहे. दुसरीकडे अभय चौटाला यांच्या भारतीय राष्ट्रीय लोकदलाने मायावती यांच्या बसपशी समझोता केला आहे. राज्यघटनेच्या मुद्यावरुन भाजपने गमावलेली दलित मते विभाजित करण्यासाठी. त्यातच दिल्लीत बसपची दलित मतांची सद्दी संपविणारे हरियानापुत्र अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्षही सर्व ९० जागा लढविण्यासाठी रिंगणात आहे. विधानसभा निवडणुकीत जाट आणि दलित मते भाजपला मिळणार नसतील, तर ती काँग्रेसलाही मिळू नयेत, अशी त्यामागची रणनीती आहे. पण राज्यघटनेवरील संकटाचा मुद्दा पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे सेलजा यांच्यावरील अन्यायाचा मुद्दा ठळक होत चालला आहे. हरियानामध्ये हमखास सत्तेत येऊ पाहणाऱ्या काँग्रेसवर केवळ आपलीच हुकमत असावी, या भूपिंदरसिंह हुडा यांच्या अट्टहासातून ही परिस्थिती ओढवली आहे.

काँग्रेसच्या पराभवास कारणीभूत ठरलेल्या मध्य प्रदेशातील कमलनाथ-दिग्विजय सिंह आणि राजस्थानमधील अशोक गहलोत यांच्यापेक्षा हुडा यांची मानसिकता वेगळी नाही. काँग्रेसच्या भविष्यातील वाटचालीत अडसर ठरलेल्या या बुजुर्गांचे राजकारण निवडणुकांतील पराभवानेच संपणार याची राहुल गांधी यांना कल्पना आहे. पण कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर अज्ञानाने ग्रासलेल्या अर्जुनासारखी त्यांची स्थिती झाली आहे. अर्जुनाचा संभ्रम श्रीकृष्णाने दूर केला. लोकसभा निवडणुकीत राज्यघटनेच्या मुद्यावरुन दलित मतांचे ध्रुवीकरण करणारे राहुल गांधी आता काँग्रेस पक्षातील बुजुर्ग नेते, इंडिया आघाडीतील मित्रपक्ष आम आदमी पार्टी तसेच भाजपने रचलेल्या चक्रव्यूहात अडकले आहे. एकेकाळी राहुल गांधींच्या मर्जीतील अजय तंवरप्रमाणे कुमारी सेलजा भलेही भाजपच्या मोहात पडणार नाहीत. पण गांधी कुटुंबाने त्यांच्याविषयी दाखवलेल्या उदासीनतेचा फायदा उठवून सत्तेची अतिमहत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या हुडा यांच्या मनसुब्यांना सुरुंग लावण्याची संधी त्या सोडणारही नाहीत. हरियानाच्या निवडणुकीनिमित्त काँग्रेस पक्षात रंगणारे महाभारत उत्कंठा वाढविणारे ठरणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com