Fruit Cluster : राज्यात केळी, आंबा, संत्रा पिकांचे नवे समूह होणार

Horticulture : राज्यात द्राक्ष व डाळिंब बागांच्या विकासासाठी समूह पद्धतीने (क्लस्टर बेस) प्रकल्प राबविण्यास सुरुवात झाली आहे.
Banana Cultivation
Banana CultivationAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यात द्राक्ष व डाळिंब बागांच्या विकासासाठी समूह पद्धतीने (क्लस्टर बेस) प्रकल्प राबविण्यास सुरुवात झाली आहे. तसेच केळी, आंबा, संत्र्याचे नवे समूह स्थापन करण्यास केंद्राने मान्यता दिली आहे. यात खासगी संस्थांना सहभागी करून घेण्यात आले आहे. प्रस्ताव पाठविण्यास एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे.

केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाकडून राज्यातील द्राक्ष व डाळिंबासाठी समूह तयार करण्यास यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे. सोलापूर भागात २४७ कोटी रुपयांचा डाळिंब समूह तयार करण्याचे काम बीव्हीजी ग्लोबल फार्म वर्क्स या कंपनीला देण्यात आले.

तसेच सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर्स कंपनीकडून नाशिकमधील ३०० कोटींचा द्राक्ष समूह साकारला जाईल. यानंतर आता राज्यात केळी, आंबा, संत्रा पिकांचे देखील समूह तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Banana Cultivation
Grape Cluster : द्राक्ष समूह प्रकल्पासाठी अखेर ‘सह्याद्री’ची निवड

पायाभूत सुविधा अर्थसाह्य प्रकल्पात महाराष्ट्रातील केळी, आंबा, संत्रा समाविष्ट केल्याचे केंद्रीय अन्न मंत्रालयाचे संचालक पंकज कुमार यांनी जारी केलेल्या सूचनेत नमूद केले आहे. त्यासाठी पंतप्रधान किसान संपदा योजनेत आठ नोव्हेंबरला सायंकाळी पाच वाजेपर्यंत https://sampada-mofpi.gov.in या संकेतस्थळावर प्रस्ताव पाठवावे लागतील. योजनेच्या अटींची माहिती https://www.mofpi.gov.in येथे उपलब्ध आहे.

समूह योजनेतून केळीसाठी जळगावमध्ये तयार होणाऱ्या ‘बनाना क्लस्टर’मध्ये पॅकहाउस, पिकवणगृह, रेफर व्हॅन, चिप्सकरिता सुकविण्यासाठी दुय्यम प्रक्रिया युनिट, मूल्यवर्धन केंद्र अशा सुविधा असतील. त्यासाठी अनुदान दिले जाईल. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग मिळून आंब्यासाठी एक समूह तयार केला जाईल.

Banana Cultivation
Pomegranate Cluster : ‘डाळिंब क्लस्टर`चा मार्ग अखेर मोकळा

या समूहात प्रीकूलिंग, शीतगृह, छाननी व प्रतवारी, दुय्यम प्रक्रिया युनिट, पल्प युनिट व इतर सुविधांचा समावेश राहील. अकोला, अमरावती व नागपूर असे तीन जिल्हे मिळून संत्र्यासाठी एक समूह उभा केला जाईल. त्यात पॅकहाउस, दुय्यम प्रक्रिया युनिट, ज्यूस व पल्प काढणे या सुविधांचा समावेश आहे.

द्राक्ष, डाळिंबासाठी प्रत्येकी दोन समूह

द्राक्षासाठी नाशिक व पुणे भागांचा एक समूह असेल. दुसरा समूह सांगली व सोलापूर भागांचा मिळून तयार होईल. या समूहात एकात्मिक पॅकहाउस, शीतगृह व सुकविण्यासाठी दुय्यम प्रक्रिया युनिटचा समावेश असेल.

डाळिंबासाठी देखील दोन समूह असतील. पहिल्या समूहात नगर, नाशिक व पुण्याचा समावेश आहे. दुसऱ्या समूहात सांगली व सोलापूर जिल्हा आहे. डाळिंब समूहात एकात्मिक पॅकहाउस, दुय्यम प्रक्रिया युनिट व इतर सुविधा उभारल्या जातील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com