River Conservation : पाण्याचा उपसा करण्यापेक्षा आटलेल्या नद्या करू वाहत्या

जमिनीला खोल छिद्रे पाडून भूगर्भातील पाण्याचा उपसा करण्यापेक्षा भूपृष्ठावरील आटलेल्या नद्यांना वाहते करण्याची गरज असल्याचे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. निसर्ग घटकांना आपण फक्त ओरबाडत, उपसतच राहिलो तर पाचशे फुटांपेक्षाही खोल गेलेल्या विंधन विहिरी, हरवलेल्या मोटी, भरलेल्या विहिरी आणि पाटाच्या पाण्याचे आपण मारेकरी ठरू. पाणी संवर्धन व वापराबाबत आपण अत्यंत जागरूक असणे गरजेचे झाले आहे.
River Conservation
River ConservationAgrowon

सन १९६५ मध्ये भालजी पेंढारकर यांचा ‘साधी माणसे’ हा अतिशय सुंदर मराठी सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात स्व. लताजींच्या (Lata Mangeshkar) कोकीळ कंठामधून उमटलेले एक गीत होते, ‘माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचे पाणी जातं, गुलाब जाई जुई मोगरा फुलवीत.’ या गीतातून १९६० ते ६५ च्या दशकापर्यंतची ग्रामीण भागामधील (Rural area) पाण्याची श्रीमंती (Water Richness) पाहावयास मिळते.

माझ्या शालेय जीवनात शाळेला जाण्यापूर्वी आणि शाळा सुटल्यावर माझी मैत्री आणि सहवास असे तो. पाटाच्या पाण्याबरोबरच भरलेल्या विहिरीतून चार बैलांनी ओढलेली मोट, तिचे पाटात होणारे रितेपण आणि ते झुळझुळ वाहणारे स्वच्छ पाणी पाहण्यात मी जेवढा हरवून जात असे. आणि त्यापेक्षाही भरलेल्या मोटेमधील अर्धे अधिक पाणी मोटेने पुन्हा विहिरीस परत केल्याचे पाहिल्यावर. ज्याच्याकडून दान घेतले त्याला ते कुठल्यातरी मार्गाने थोडे तरी परत करावयास हवे.

River Conservation
Climate Change : हवामान बदल समजून घ्या...

भविष्यात दिसेल फक्त खालचा खडक

मोट आणि विहीर यांचे नाते आणि सेंद्रिय खत आणि शेतजमीन असेच तर आहे. काळ बदलला आणि आम्ही निसर्ग घटकांना फक्त ओरबाडत, उपसतच राहिलो. पाचशे फुटांपेक्षाही खोल गेलेल्या विंधन विहिरी, आज हरवलेल्या मोटी, भरलेल्या विहिरी आणि पाटाच्या पाण्याचे आपण मारेकरी आहेत. आज निर्माण झालेले जलसंकट हे भूगर्भामधील हजारो वर्षे साठवलेल्या पाण्याच्या अनियंत्रित उपशामुळे निर्माण झाले आहे. खरे तर आपण फक्त काळ्या आईच्या वरच्या सुपीक थराचे मानकरी.

River Conservation
Climate Change : महाराष्ट्रातील पर्यावरणाकडे गांभीर्याने पाहा...

बाकीचा सर्व निसर्ग तिचाच. आमच्या पूर्वजांनी पाळलेला हा नियम आम्ही हव्यासापोटी मोडून टाकला. पूर्वी शेतात खोल नांगरट करताना एखादा मोठा दगड लागला तर शेतकरी त्याचा सांभाळ करीत. अगदी बाजूने नांगर घेत. कारण त्याच्या खाली जैवविविधतेची श्रीमंती असे. आज शेतात असे दगड कुठेच आढळत नाहीत.

जमिनीचा वरचा पौष्टिक थर नष्ट करीत आम्ही पावसाच्या पाण्याला भूगर्भात जाण्यापासून वंचित तर केले आहेच, त्याबरोबर रासायनिक खतांचा अनियमित वापर करून जमिनीचे वाळवंटही. हेच वाळवंट आता कोसळणाऱ्या पावसात वाहून जात आहे. म्हणूनच भविष्यात दिसणार आहे तो खालचा खडक. ज्यास ठेच लागूनही आमचा हव्यास असाच सुरू राहणार आहे. कारण आम्हास ओढ आहे, ती भूगर्भातील साठलेल्या शाश्‍वत पाण्याबरोबर पाठशिवणीच्या खेळाची.

River Conservation
Climate Change : महाराष्ट्रातील पर्यावरणाकडे गांभीर्याने पाहा...

जीवनवाहिनीचे महत्त्व

वातावरण बदलाच्या पार्श्‍वभूमीवर पाणी हा जेवढा संवेदनशील विषय आहे तेवढेच त्याचे व्यवस्थापनदेखील. पण अजूनही या जीवन वाहिनीचे महत्त्व आणि गांभीर्य आपल्या लक्षात येत नाही. पाणी हे निसर्गाचे मानवास आणि जीवसृष्टीला मिळालेले वरदान आहे. पृथ्वीवरील पहिला एकपेशीय जीव पाण्यातच जन्मला होता. पाणी आपणास बाष्प, बर्फ आणि द्रवरूपात आढळते.

River Conservation
Climate Change : नेमका प्राधान्यक्रम ठरविण्याची आवश्यकता

अतिशय स्वच्छ पाण्यास ना चव असते ना रंग, म्हणूनच तर कवीनी म्हटले आहे, की ‘पानी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाये उस जैसा’. अतिशय दूर अंतरावरून पाणी आपणास निळसर दिसते; त्यास कारण सूर्यप्रकाशामधील तांबूस किरणे त्यात शोषली जाऊन निळी किरणे परावर्तित होतात. बाहेर पडतात. आपल्या पृथ्वीच्या भूपृष्ठाचा ७१ टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. म्हणूनच तर तिला पाण्याचा ग्रह म्हणतात. (The Water Planet) यामधील समुद्राचा भाग ९७ टक्के आणि उरलेले ३ टक्के गोड पाणी, त्यातील १.२ टक्काच आपणास उपलब्ध आहे. वातावरण बदलामुळे समुद्राचे पाणी वाढत आहे, तर गोड पाणी कमी होत आहे. होणारे तिसरे महायुद्ध हे गोड पाणी मिळविण्यासाठीच असणार आहे.

‘सीओपी’द्वारे जागृती

वातावरण बदलाची वसुंधरेवर होत असलेल्या परिणामांची जाणीव व्हावी, त्यावर मंथन व्हावे म्हणून १९९४ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने सीओपी (Conference Of the Parties) या स्वतंत्र गटाची स्थापना केली. वातावरण बदलाची झळ बसत असलेल्या सर्व राष्ट्रांना त्याचे सदस्य करून घेतले. सीओपी १ ची पहिली बैठक बर्लिन, जर्मनी येथे मार्च १९९५ मध्ये झाली. प्रति वर्षी एक सदस्य राष्ट्र त्याच्या बैठकीची जबाबदारी घेते.

याच क्रमाने नोव्हेंबर ६ ते १८, २०२२ या काळात इजिप्तमध्ये सीओपी २७ ची बैठक झाली. त्याआधी २६ ची बैठक ग्लासगोमध्ये झाली होती. आतापर्यंत झालेल्या बैठकांमध्ये वातावरण बदल, वाढते तापमान, हरितगृह वायू आणि ते कमी करण्याचे संयुक्त प्रयत्न, त्यासाठी लागणारा पैसा, राखीव निधी, आरोप, प्रत्यारोप, निदर्शने आंदोलने या मुद्द्यांवरच विचारमंथन झाले.. त्यातून काहीही निष्पन्न न होता अब्जावधी रुपयांचा धुरळा उडवून या बैठकी समाप्त होत.

पाणी या संवेदनशील विषयास प्राधान्य देऊन १९९५ पासून एकाही बैठकीत सविस्तर चर्चा अशी झालीच नाही. अपवाद होता सीओपी ६ चा. जेथे सर्वप्रथम या विषयास मंचावर स्थान मिळाले. वातावरण बदलाचा वेग वाढवण्यासाठी यापुढे पाणी हा अतिशय महत्त्वाचा घटक असणार आहे. याच मुद्यावर मंचामध्ये पर्यावरण तज्ञ शेवटपर्यंत आग्रही राहिले. परंतु शेवटच्या ठरावात हा विषय पुन्हा मागे पडला.

इजिप्तने केलेले प्रबोधन

नंतर २७ च्या बैठकीत मात्र इजिप्त या यजमान राष्ट्राने हा विषय उचलून धरला. त्याने पाणी आणि वातावरण बदल यांचा संबंध अधोरेखित करण्यासाठी पाणी विषयासंबंधी भव्य असा मंडप (Water Pavilion) उभारला होता. यामध्ये जगातील पाणी क्षेत्रात कार्य करणाऱ्या ४० संस्थानी सहभाग नोंदवला. चौदा नोव्हेंबरला या बैठकीमध्येच इजिप्तने जलदिन (Water Day) साजरा करून सर्व सहभागी राष्ट्रांना पाण्याचे महत्त्व समजावून दिले. याचा परिणाम म्हणून प्रथमच वातावरण बदलाचा दाह (Mitigation) शमविण्यासाठी पाणी आणि त्याचे व्यवस्थापन यावर चर्चा झाली.

भविष्यात ताजे पाणी अतिशय संवेदनशील होणार आहे. म्हणूनच सर्व राष्ट्रांनी पाण्याबद्दल आपले धोरण बदलून त्यावर निश्‍चित सकारात्मक आखणी करण्याचे आवाहन केले. यामध्ये अर्थातच भूगर्भातील पाणी, वाहत्या अथवा थांबलेल्या नद्या, पावसाचे पाणी साठविणे, तलाव आणि पाणथळ भूमीचे रक्षण करणे, सांडपाण्याचे व्यवस्थापन या मुद्द्यांचा समावेश होता. मात्र यावर जेवढी चर्चा मोठया प्रमाणावर व्हावयास हवी होती तेवढी झाली नाही. म्हणूनच रशिया- युक्रेन युद्ध, अन्न सुरक्षा, शून्य हरितवायू निर्मिती आणि दीड अंशाने वाढलेले तापमान यावर गदारोळ होत बैठक कधी संपली कळालीच नाही.

उत्तर शोधणे गरजेचे

पाणी आणि वातावरण बदल यांना एकत्रित करून निसर्गावर आधारित उत्तर शोधणे गरजेचे आहे. यजमान इजिप्तच्या पर्यावरण मंत्र्यांनी आपल्या सीओपी २७ बैठकीच्या मुख्य भाषणात वातावरण बदलावर भाष्य केले. त्यात तो ओला दुष्काळ (To Much Water) आणि कोरडा दुष्काळच (To Little Water) आहे हे समजावले. त्या वेळी पाकिस्तानात आलेला २०२२ चा प्रचंड मोठा महापूर तर अनेक आफ्रिकी राष्ट्रांत लागोपाठ तीन वर्षे पडलेला दुष्काळ आणि त्यामुळे तेथे निर्माण झालेली भूक या परिस्थितीचा तुलनात्मक आढावा घेतला.

भाषणात मंत्री महोदया म्हणतात, की जमिनीस खोल छिद्रे पाडून भूगर्भातील पाण्याचा उपसा करण्यापेक्षा भूपृष्ठावरील आटलेल्या नद्यांना वाहते करा. आज अनेक आफ्रिकी राष्ट्रांत भीषण पाणीटंचाई आहे. त्यासाठी त्यांना विंधन विहिरी घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय मदत दिली जात आहे. प्राप्त परिस्थितीत हे चुकीचे नाही. मात्र यामध्ये हवे तेवढे यशही मिळत नाही. यापेक्षा व्हिक्टोरियासारख्या जगातील सर्वांत मोठ्या तलावाचे पाणी वाचवून, संवर्धित करून अनेक गरीब राष्ट्रांची तहान सहज भागवता येते हे म्हणणे तंतोतंत खरे आहे. आज हा नैसर्गिक जल स्रोत जलपर्णीने वेढला जात आहे. गरीब राष्ट्रांना आर्थिक मदत येथे हवी आहे. भूमातेस छिद्रे पाडून वेदना देण्यासाठी नव्हे.

(लेखक शेतीप्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com