Organic Farming : संवर्धित शेतीला प्रोत्साहनाची गरज

संवर्धित शेती ही पद्धत अवलंबताना शेती पद्धतीत हळूहळू बदल करावा. ही पर्यावरणपूरक व गुणवत्तापूर्वक शेती पद्धती असल्याने त्याचा भारतात प्रसार होत आहे. भविष्यात शेती टिकवण्यासाठी हा दूरगामी पर्याय असून, राज्यात ‘संवर्धित शेतीसाठी’ कृषी विद्यापीठात प्रयोग सुरू करावेत.
Organic Farming
Organic FarmingAgrowon

संवर्धित शेती एक पर्यावरणपूरक शेती (Eco-Friendly Farming) पद्धत असून, त्यात प्रात्यक्षिकांवर आधारित स्थानिक पातळीवर जमिनीचे व्यवस्थापन होते. संवर्धित शेतीचे तीन मुख्य स्तंभ आहेत.
(१) कमीत कमी मातीची हालचाल अथवा शून्य मशागत
(२) कायम स्वरूपी मातीवर आच्छादन
(३) पिकांची फेरपालट

Organic Farming
Farmer Loan Waive : ‘कर्जमुक्ती’च्या यादीत १२ हजार ९४२ शेतकरी

या त्रिसूत्री तत्त्वावर आधारित ‘संवर्धित शेती’ ही पद्धत स्थानिक संसाधने व हवामानानुसार वेगवेगळ्या भागात विकसित होत आहे. ‘जागतिक अन्न व शेती संघटना’ (एफएओ) २०१२ च्या अहवालानुसार संवर्धित शेती पद्धतीमुळे जमिनीवर व जमिनीखाली नैसर्गिक जैवविविधता विकसित होते तसेच पाणी व अन्नद्रव्य यांची कार्यक्षमता वाढून पीक उत्पादनात हळूहळू स्थिरता येते.

या पद्धतीत चांगले पीक उत्पादन घेण्यासाठी मातीला मशागतीची आवश्यकता नाही म्हणजेच ‘शून्य मशागत’ हे पहिले सूत्र आहे. मातीची उलाढाल कमीतकमी किंवा शून्य ठेवल्यास जमिनीतील सूक्ष्म जीवजंतू अनेक पटीने वाढतात व त्यांच्या हालचालींतून मातीची नैसर्गिक मशागत होते.

सर्व पीकअवशेष शेताबाहेर न काढता काही अंशी मातीत गाढणे व आच्छादन रूपाने पृष्ठभागावर ठेवल्याने मातीतील जीवजंतू, गांडूळ ते खाद्य म्हणून वापरतात व त्यांची विष्ठा मातीत मिसळून मातीत अन्नद्रव्य मिसळतात, तसेच काही अवशेष पृष्ठभागावर ठेवल्याने बाष्पीभवन कमी होऊन मातीतील ओलावा टिकून राहतो. पुढे हे पिकांचे अवशेष कुजून त्याचे खत जमिनीत मिसळते. यामुळे कायमस्वरूपी कमीत कमी ३० टक्के आच्छादन मातीच्या पृष्ठभागावर राहतील एवढीच मशागत करावी, हे या पद्धतीचे दुसरे सूत्र आहे.

Organic Farming
Agri Tourism : विषमुक्त शेतीतून कृषी पर्यटनाला आधार

अशा प्रकारे पृष्ठभागावर पीक अवशेषाचे आच्छादन ठेवल्याने सूर्यप्रकाश, वारा व पाण्यामुळे होणारी मातीची धूप कमी होते. तिसरे सूत्र म्हणजे पिकांची फेरपालट करून मातीत नैसर्गिक जैव प्रक्रिया होऊ देणे, यामुळे कीड-रोगांचे व तणाचे प्रमाण घटते. पीक फेरपालट अशा प्रकारे करावे, की ज्यात एक पीक ‘लेग्युम’ म्हणजे ज्या पिकांच्या मुळांवर गाठी (रायझोम) असतात. त्यातून हवेतला नायट्रोजन मातीत मिसळतो असे पीक असावे. उदाहरणार्थ ः तूर, भुईमूग, उडीद, मूग, सोयाबीन आदी.

ज्या शेती पद्धतीमध्ये मातीची धूप व ऱ्हास (degradation) होतो, ते अयोग्य शेती पद्धतीचे लक्षण आहे. त्यामुळे संवर्धित शेती ही हवामान बदलाच्या काळात पिकांच्या उत्पादनामध्ये स्थिरता आणण्यासाठी उपयुक्त सिद्ध होत आहे. वरीलप्रमाणे या पद्धतीची त्रिसूत्री तत्त्व हा केंद्रबिंदू ठेवून त्यात स्थानिक पातळीवर गरजेप्रमाणे बदल करून त्याचा अवलंब शक्य आहे.

उदाहरणार्थ ः जगात ६७ दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर ‘शून्य मशागत’ तंत्र सध्या वापरले जाते. शून्य मशागतीमुळे खोल नांगरट केलेल्या शेतापेक्षा ८० टक्के जास्त पिकांचे अवशेष जमिनीवर राहतात, पावसाचे पाणी जमिनीत मुरून पाणी वाहून जाण्याचे प्रमाण ९० टक्क्यांहून ६ टक्के इतके कमी होते, तसेच खोल नांगरट केलेल्या शेतात २८ टन प्रतिहेक्टर प्रतिवर्ष सुपीक माती (धूप) वाहून जाते, हे प्रमाण शून्य मशागतीमुळे फक्त एक टन प्रतिहेक्टर प्रतिवर्ष इतके कमी होते.

भारतात संवर्धित शेतीसाठी काही यंत्र विकसित झाले आहेत, त्यात शून्य मशागत पेरणी यंत्र हे एक आहे. भात काढल्यानंतर मशागत न करता गहू पेरणी या यंत्राने होते. कंबाइन हार्वेस्टर यंत्रांनी भात काढणी केल्यास भाताचे उंच धसकटे शेतात राहतात, ते न काढता त्यात ‘हॅप्पी सीडर’ या यंत्राने पेरणी करता येते. महाराष्ट्रात कोरडवाहू शेतीत मोठ्या प्रमाणात बीबीएफ पेरणी यंत्राचा वापर होत आहे. त्यामुळे २० ते २५ टक्के पाण्याचे संवर्धन होते, मातीची धूप कमी होते व ओलावा जास्त काळ टिकून राहतो.

हवामान बदलामुळे अतिवृष्टी व पावसाचे खंड हे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत राज्यात बीबीएफ या यंत्रामुळे पिके वाचतात हे सिद्ध झाले आहे. राज्यातील लाखो शेतकरी हे तंत्रज्ञान वापरत आहेत. हाही एक संवर्धित शेतीचाच भाग आहे. पीक अवशेष आच्छादनामुळे सेंद्रिय कर्ब टिकून राहते व वाढते. मातीतील ओलावा जास्त काळ टिकतो, मातीचा टणकपणा कमी होतो, मातीच्या कणांची रचना सुधारते, प्रदूषण कमी होते, पावसाचे पाणी जमिनीत जास्त मुरते, मातीची धूप कमी होते, मातीतील जीवजंतू यांची संख्या वाढते व त्याचे अनुकूल परिणाम आच्छादन केलेल्या शेतात स्पष्ट दिसतात.

Organic Farming
Dairy And Poultry Industry : दूध उत्पादनाचा खर्च कमी कसा कराल ?| Dr. Dinesh Bhosale | ॲग्रोवन

संवर्धित शेतीचे फायदे
१. उत्पादन खर्च, मजूर, वेळ आणि ऊर्जा बचत
२. निविष्ठा बचत व कार्यक्षमता वाढ
३. नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन
४. मातीतील सेंद्रिय कर्ब वाढते

५. पीक फेरपालटामुळे बॅक्टेरिया कृतिशील होतात
६. मातीची गुणवत्ता वाढते
७. पारंपरिक शेतीत अतिमशागत, अवशेष जाळणे थांबते
८. अन्नद्रव्य संतुलन राहते
९. पाण्याचा कार्यक्षम वापर
१०. जमिनीत पाणी मुरते व ओलावा टिकून राहतो
११. मातीची धूप कमी होते

Organic Farming
Sugar Production : कोल्हापूर विभाग साखर उताऱ्यात आघाडीवर

संवर्धित शेती ही पद्धत अवलंबताना संपूर्ण शेती पद्धतीत हळूहळू बदल करावा. ही पर्यावरणपूरक व गुणवत्तापूर्वक शेती पद्धती असल्याने त्याचा भारतात प्रसार होत आहे. भविष्यात शेती टिकवण्यासाठी हा दूरगामी पर्याय असून, राज्यात ‘संवर्धित शेतीसाठी’ कृषी विद्यापीठात प्रयोग सुरू करावे व कृषी विभागात प्रोत्साहनपर योजना सुरू करावी. यामुळे राज्यातील बहुतांशी जिरायती शेतीला स्थैर्य येऊन उत्पादन व उत्पन्न वाढीसाठी मदत होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com