
महागाई वाढली की सरकार पहिला दोष देते वायदे बाजाराला. सट्टेबाजीचे कारण पुढे करत सरकार वायदेबंदी करते. मागील तीन वर्षांपासून सात शेतीमालांच्या वायद्यांवर बंदी आहे. पण वायदेबाजार आणि महागाई यात संबंध नसल्याचे आयआयटी मुंबईने केलेल्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. आयआयटी मुंबईने नेमका काय अभ्यास केला? अभ्यासातील निष्कर्ष काय? आणि त्यांनी सरकारला काय शिफारशी केल्या? याविषयी आयआयटी मुंबईचे सहयोगी प्राध्यापक सार्थक गौरव यांच्याशी साधलेला संवाद.
शेतीमाल वायदेबंदीचा अभ्यास करण्याची गरज का भासली? तुम्ही नेमका कशाचा अभ्यास केला.
डिसेंबर २०२१ मध्ये सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया, अर्थात सेबीने सात शेतीमालांच्या नवीन एक्सचेंज ट्रेडेड कमोडिटी डेरिव्हेटिव्हज (ETCD) अर्थात वायदे सुरू करण्यास कमोडिटी एक्स्चेंजना बंदी घातली होती. यामध्ये मोहरी तसेच मोहरी तेल आणि मोहरी पेंड, सोयाबीन तसेच सोयातेल आणि सोयापेंड, हरभरा, गहू, कच्चे पाम तेल, मूग आणि बिगर बासमती तांदूळ या शेतीमालांचा समावेश आहे.
हरभऱ्याच्या वायद्यावर ऑगस्ट २०२२१ मध्ये महागाईच्या विरोधात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बंदी घातली होती. ही बंदी २० डिसेंबर २०२४ पर्यंत चालू ठेवण्यात आली होती. आणि आता ती ३१ जानेवारी २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. या अभ्यासामध्ये आम्ही वायदे बंदीचा ‘अॅग्री इकोसिस्टम’वर होणारा परिणाम तपासला. यात वायदेबंदी केलेल्या सात शेतीमालांपैकी मोहरी, रिफाइंड सोयाबीन तेल, सोयाबीन, हरभरा आणि गहू या पाच शेतीमालांचा अभ्यास केला.
आम्ही एक्स्चेंज ट्रेडिंगच्या निलंबनानंतर म्हणजेच वायदेबंदीनंतर भविष्यातील किमतीचा अंदाज (प्राइस डिस्कवरी) आणि जोखीम व्यवस्थापन (रिस्क हेजिंग) यावर कसा परिणाम झाला याचा अभ्यास केला. अभ्यास करताना या शेतीमालांच्या वायद्यांमधील किमती आणि हजर बाजारातील किमती, व्यापाराचे प्रमाण (व्हॉल्यूम) आणि बाजारातील अस्थिरता यामधील संबंध शोधण्याचा उद्देश ठेवण्यात आला होता. शेवटी, या अभ्यासाच्या माध्यमातून शेतीमाल बाजार मूल्यसाखळीतील विविध घटकांवर वायदेबंदीचा काय परिणाम झाला, याचा उलगडा झाला आहे.
तुम्ही केलेल्या संशोधन अभ्यासातून काय पुढे आले? वायद्यांमुळे खरेच महागाई वाढते का?
अभ्यास करताना आम्ही वायदेबंदीच्या आधीच्या काळातील या पाच शेतीमालांच्या किमती आणि वायदेबंदीच्या काळातील किमतीचा अभ्यास केला. यासाठी थेट बाजारातील विविध घटकांशी चर्चा करून काही निष्कर्ष काढण्यात आले तर काही निष्कर्ष दुय्यम माहितीचा, अर्थात उपलब्ध बाजारातील किमतीचा तुलनात्मक अभ्यास करून काढण्यात आले. दुय्यम माहितीच्या आधारे आलेले निष्कर्ष असे...
वायदेबंदी केलेल्या शेतीमालाच्या किरकोळ बाजारातील किमतींमध्ये वायदेबंदीनंतरही कोणतीही घट झाली नाही. किरकोळ बाजारातील किमतींवर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मागणी व पुरवठ्यामुळे चढ- उतार होत गेले. किमतींवर मागणी आणि पुरवठ्याचा प्रभाव दिसून आला.
वायदेबंदीनंतर या शेतीमालांच्या किरकोळ किमती आणि स्पॉटच्या किमतींमधील अस्थिरता वाढल्याचेही निष्पन्न झाले.
मोहरी, सोयाबीन आणि रिफाइंड सोयाबीन तेलासाठी व्यापाराच्या प्रमाणाचा (ट्रेडेड व्हॉल्यूम) स्पॉट किमतींशी सकारात्मक संबंध असल्याचे दिसून आले. ज्यावरून वायदेबंदीआधीच्या काळात वायदे बाजाराचा स्पॉट किमतींवर अस्थिर करणारा परिणाम झाला नाही, हे स्पष्ट होते.
वायदेबंदी केलेल्या शेतीमालाच्या किमती तसेच त्यांच्यासारख्या मालाच्या किरकोळ बाजारातील किमतीत झालेले बदल असे सुचवतात, की महागाई आणि वायदे बाजार यांच्यामध्ये थेट संबंध आहे, हे गृहीतक मनात ठेवू वायदेबंदी केली आहे. मात्र या गृहीतकाला आमच्या विश्लेषणातून कोणताही पुरावा मिळालेला नाही. उलट वायदेबंदीननंतरच्या काळात वायदेबंदी असलेल्या शेतीमालाच्या किमती वायदेबंदी नसलेल्या शेतीमालांच्या किरकोळ किमतीपेक्षा जास्त होत्या.
निलंबित शेतीमालाच्या वायद्यांमधील आणि हजर बाजारातील किमतींमध्ये सामान्यतः द्विदिशात्मक संबंध असल्याचे दिसून आले. यावरून वायदे बाजाराने हजर बाजाराला दिशादर्शक संकेत देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे स्पष्ट होते. हजर बाजारानेदेखील वायद्यांच्या किमतींवर प्रभाव टाकला, ज्यावरून भविष्यातील किमतीचा अंदाज लावण्यासाठी (प्राइस डिस्कव्हरी) वायद्यांची भूमिका महत्त्वाची राहिल्याचा पुरावा मिळतो.
वायदेबंदीनंतर वायदेबंदी असलेल्या शेतीमालाच्या भावातील अस्थिरतेत त्यांच्यासारख्या इतर शेतीमालाच्या तुलनेत कोणताही फरक आढळलेला नाही. म्हणजेच वायदेबंदी केली नसती तरीही किमतींची दिशा (प्राइस बिहेविअर) सारखीच राहिली असती.
शेतीमालाच्या वायदे बाजारातील (फ्यूचर्स मार्केट) सट्टेबाजीच्या प्रमाणाचा (स्पेक्युलेशन रेशो, म्हणजे व्यापाराचे प्रमाण व ओपन इंटरेस्टचे प्रमाण याचे गुणोत्तर) परिणाम रिफाइंड सोयाबीन तेल वगळता इतर शेतीमालाच्या हजार बाजारातील किमतींवर परिणाम झाला नाही. यावरून असे सूचित होते की, फ्यूचर्स मार्केटमधील जास्त सट्टेबाजामुळे हजर बाजारातील किमती वाढतात हा दृष्टिकोन चुकीचा आहे.
बाजारातील शेतकरी, व्यापारी आणि इतर घटकांकडून घेतलेल्या माहितीतून तुम्ही काढलेले निष्कर्ष कोणते?
निष्कर्ष पुढीलप्रमाणे आहेत.
या शेतीमालांचे वायदे उपलब्ध नसल्यामुळे बहुतांश भागधारकांसाठी भविष्यातील किमतीचा अंदाज घेण्यात (प्राईस डिस्कव्हरी) अडचण निर्माण झाली आहे.
हजर बाजारातील किंमत जोखीम व्यवस्थापनासाठी (प्राइस रिस्क हेजिंग) सर्वाधिक सहजपणे वापरला जाणारा मार्ग म्हणजे वायदे बाजार राहिला आहे. पण वायदेबंदीमुळे त्यावर स्पष्टपणे परिणाम झाला आहे.
वायदे बाजारात काम करणाऱ्या सुमारे १२० घटकांशी संवाद साधला. यात ३० शेतकरी उत्पादक कंपन्या आणि सीबीबीओ होत्या. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे स्पष्ट होते, की भविष्यातील किमतीचा अंदाज घेण्यासाठी वायदे बाजार महत्त्वाची भूमिका पार पाडतो.
वायदेबंदीनंतर भविष्यातील किमतींचा अंदाज लावण्यासाठी पर्यायी यंत्रणा शोधण्यात मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत.
कृषी व्यवसाय, व्यापारी, प्रक्रिया करणारे, निर्यातदार आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना भविष्यातील किमतीचा अंदाज घेण्यासाठी सोईस्कर पर्याय शोधण्यात अडचणी आल्या आहेत.
हजर बाजारात काम करणाऱ्या घटकांच्या मते, वायदेबंदीआधीच्या तुलनेत वायदेबंदीत शेतीमालाच्या हजर किमतींच्या अस्थिरतेत घट झाल्याचा व्यापक पुरावा मिळत नाही.
किमतीतील अस्थिरतेचा संबंध बाजारातील कालावधी आणि शेतीमालाच्या प्रकारावर अवलंबून असते.
हजर बाजारातील किमतींवर सट्टेबाजीचा थेट परिणाम होत असल्याचे कोणतेही ठोस मत समोर आलेले नाही.
वायदे बाजाराविषयी तुमच्या शिफारशी कोणत्या?
आम्ही सरकारला काही शिफारशी केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे :
शेतीमाल वायदे बाजारावरील बंदी तातडीने मागे घ्यावी.
वायदे बाजारात काम करणाऱ्या सहभागी घटकांसाठी भविष्यातील किमतीचा अंदाज घेण्यासाठी (प्राइस डिस्कव्हरी) आणि जोखीम व्यवस्थापन (रिस्क हेजिंग) यामध्ये वायद्यांची कार्यक्षम आणि महत्त्वाची भूमिका असल्याने निलंबन हटवणे आवश्यक आहे.
अचानक वायदेबंदीऐवजी सल्लामसलत आणि विचारविनिमयावर आधारित दृष्टिकोन ठेवण्याची गरज आहे.
एक्स्चेंज स्तरावरील नियंत्रणांबाबत (जसे की अधिक अस्थिरतेशी संबंधित मार्जिन, जोखीम देखरेख, स्ट्रेस टेस्टिंग) पारदर्शकता आणि चर्चा करण्याची आवश्यकता आहे.
शेतीमालाच्या वायदे बाजाराविषयी भारत अजूनही ठोस भूमिका घेऊ शकला नाही, याचा कसा परिणाम होत आहे?
वायदे बाजाराचा वापर प्रामुख्याने किंमत जोखीम व्यवस्थापन आणि भविष्यातील किमतीचा अंदाज घेण्यासाठी शेतकऱ्यांना होत असतो. पण जर देशात वायदे सुरू नसतील तर हजर बाजारातील सर्वच घटकांना आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीचे संकेत येतात, त्यावरच अवलंबून राहावे लागते. वायदे बाजाराने हजर बाजारात जसे की बाजार समित्या, या बाजारात काम करणाऱ्या सर्वच सहभागी घटकांसाठी किंमत जोखीम व्यवस्थापनाचा पर्याय दिलेला आहे.
याचा चांगला फायदा होत असतो. आमच्या अभ्यासानुसार वायदे बाजारातील व्यापाराचा अनुभव असलेल्या घटकांना पहिला महत्त्वाचा फायदा म्हणजे चांगल्या किमतीच्या संधीची जाणीव (बेटर प्राइस रिअलायझेशन) आणि त्यानंतर किंमतविषयक माहिती मिळते. याच विचार करूनच वायदे बाजाराविषयी धोरण ठरवावे लागणार आहे.
शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी वायदे बाजारातील संधींबद्दल काय सांगाल?
वायदे बाजारात शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना संधी आहेत. एक्स्चेंजेसनी शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सहभागासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. तरीही वायदे बाजाराबद्दल असलेली जागरूकतेची कमतरता हा शेतकऱ्यांच्या अधिक सहभागामधील मोठा अडथळा आहे.
सरकारने शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि सहकारी संस्थांमध्ये शेतीमाल वायदे बाजाराबाबत प्रशिक्षण देण्यासाठी आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच अचानक वायदेबंदी हे भविष्यातील किमतीचा अंदाज (प्राइस डिस्कव्हरी) आणि जोखीम व्यवस्थापनासाठी (रिस्क हेजिंग) वायद्यांवर अवलंबून राहण्याच्या संभावनांवर परिणाम करते.
अशा प्रकारचे नियामक धोके, जसे की अनियोजित वायदेबंदी, शेतीमाल बाजारातील सहभागी घटकांच्या विश्वासावर आणि आत्मविश्वासावर प्रतिकूल परिणाम करतात. त्यामुळे, धोरणात्मक हस्तक्षेप ठरवण्यासाठी सल्लामसलत आणि विचारविनिमयावर आधारित दृष्टिकोन स्वीकारण्याची आवश्यकता आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.