NDRF Jawan : एनडीआरएफ आता जंगलातील वणवे आटोक्यात आणणार, १५० जवानांच्या तुकडीचे प्रशिक्षण

NDRF Control Forest Fire : एनडीआरएफ जंगलातील वणवे आटोक्यात आणण्यासाठी योगदान देणार असून दलाने आपल्या १५० जवानांच्या पहिल्या तुकडीला प्रशिक्षणही देऊन तैनातही केले आहे.
NDRF Jawan
NDRF Jawanagrowon

India NDRF Team : देशात पूर, वादळांसारख्या आपत्तीत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) नागरिकांच्या मदतीला नेहमी धावून जाते. आता एनडीआरएफ जंगलातील वणवे आटोक्यात आणण्यासाठी योगदान देणार असून दलाने आपल्या १५० जवानांच्या पहिल्या तुकडीला प्रशिक्षणही देऊन तैनातही केले आहे. त्याचप्रमाणे या जवानांना वणव्यांचा सामना करणाऱ्या परदेशांच्या मदतीने सखोल प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे केली असल्याची माहिती 'एनडीआरएफ' चे महासंचालक अतुल कारवाल यांनी दिली.

'पीटीआय'शी बोलताना कारवाल म्हणाले, की 'एनडीआरएफ'च्या अग्निशमन दलाला जंगलातील वणवे विझविण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. अशा प्रत्येकी ५० जणांच्या तीन पथकांना गुवाहाटीतील दलाच्या पहिल्या क्रमांकाच्या तुकडीबरोबरच, आंध्र प्रदेशातील विजयवाडातील १० व्या क्रमांकाच्या आणि उत्तराखंडमधील १५ क्रमांकाच्या तुकडीसह तैनात केले आहे. त्याचप्रमाणे, चौथ्या पथकालाही प्रशिक्षण देण्यात येत असून हे पथक राखीव ठेवले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, "एनडीआरएफच्या अग्निशमन दलाला परदेशांतून प्रशिक्षण देण्याची विनंती आम्ही केंद्रीय गृहमंत्रालयाला केली आहे. जंगलातील वणव्यांचा सर्वाधिक सामना करणाऱ्या परदेशांकडून हे प्रशिक्षण दिले जाऊ शकते. या वणव्यांवर नियंत्रण कसे मिळवायचे, हे आपण त्यांच्याकडून शिकू शकतो. एनडीआरएफ आग विझविण्याचे काम हाती घेईल. जंगलात जाळरेषा आखल्या जात असून वणव्यात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी तिची मदत होईल", असेही त्यांनी सांगितले.

आपत्तींचा सामना करण्यासाठी बनविलेल्या 'एनडीआरएफ'च्या कार्यात जंगलातील वणव्यांचा समावेश न केल्याबद्दल संसदीय समितीनेही चिंता व्यक्त केली होती. या वणव्यांमुळे जैवविविधतेचे नुकसान होत असून आदिवासींच्या उदरनिर्वाहावर विपरीत परिणाम होत असल्याचे निरीक्षणही या समितीने नोंदविले होते.

NDRF Jawan
Leopards In Maharashtra : राज्यात बिबट्यांची संख्या वाढली, महाराष्ट्राचा कितवा नंबर

वन खात्याची मर्यादित क्षमता लक्षात घेता वणवे विझविण्यासाठी प्रशिक्षित दलाची मदत घेण्याची शिफारसही समितीने केली होती. नागालँडमधील झुकू खोऱ्यासह ओडिशातील सिमिलीपाल तसेच मध्य प्रदेशातील बांधवगड येथील जंगलात २०२१ मध्ये लागलेल्या भीषण आगीनंतर ही शिफारस करण्यात आली.

भारतीय वन सर्वेक्षण ही केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या अंतर्गत असणारी एक संस्था असून देशातील वनसंपत्तीचे सर्वेक्षण आणि मूल्यांकन करणे हे तिचे प्रमुख कार्य आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com