
Pune News : केंद्र सरकारने कांदा ४ हजार रुपये प्रति क्विंटल (४० रुपये प्रति किलो) प्रमाणे कांदा खरेदी करावा, अशी मागणी शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आळेफाटा, ता. जुन्नर या ठिकाणी केली.
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यात शुल्क वाढविल्याने महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस व शेतकरी संघटना यांच्या वतीने आळेफाटा (ता. जुन्नर) येथील चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते.
या वेळी विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरद लेंडे, पांडुरंग पवार, माउली खंडागळे, मोहीत ढमाले, अंकुश आमले, देवराम लांडे, आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवदत्त निकम, रघुनाथ लेंडे, शेतकरी संघटनेचे अंबादास हांडे, प्रसन्न डोके, शिवसेनेचे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुरेश भोर, गणेश कवडे, शरद चौधरी, बाजीराव ढोले, जीवन शिंदे, श्याम माळी, जयवंत घोडके, मंगेश काकडे, तालुक्यातील विविध गावांचे सरपंच, पदाधिकारी शेतकरी वर्ग उपस्थित होते.
या वेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना खासदार कोल्हे म्हणाले, की केंद्राचे धोरण शेतकऱ्यांच्या विरोधातील असून, शेतकऱ्यांच्या मुळावर बसले आहे. शेतकऱ्यांच्या एकाही पिकाला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत येऊ लागला आहे. केंद्रातील नेते, मंत्री जेव्हा महाराष्ट्रात येतील तेव्हा त्यांचे स्वागत कांद्याची माळ घालून करावे. तेव्हाच त्यांना शेतकऱ्यांची व्यथा समजेल. याप्रसंगी खासदार कोल्हे यांनी गळ्यात कांद्याची माळ घालून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
श्री. शेरकर म्हणाले, की चालू वर्षी पावसाअभावी सोयाबीन, मूग, उडीद वाया गेले असून, हे आंदोलन तालुका, जिल्हा पातळीपुरते मर्यादित नसून पंजाबच्या शेतकऱ्यांनी ज्याप्रमाणे आंदोलन केले होते. त्याचप्रमाणे भविष्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी देशपातळीवर खासदार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहोत.
श्री. निकम म्हणाले, की केंद्र सरकारने जानेवारी महिन्यात कांद्याला अनुदान जाहीर केले होते ते अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळाले नाही, तर पुणे जिल्ह्यात तीन मंत्री आहेत त्यांनी ८ दिवसांत निर्णय न घेतल्यास त्यांच्या गाडीवर कांदा फेकला जाईल, असा इशारा त्यांनी दिला. याप्रसंगी तालुक्याचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांना निवेदन देण्यात आले. तर केंद्र सरकारच्या या निर्णयाची या वेळी होळी करण्यात आली.
दरम्यान, कांदा निर्यात शुल्क संदर्भात केंद्रीय कृषिमंत्री पीयूष गोयल यांची राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे, जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी मंगळवारी (ता. २२) दिल्लीत सकाळी भेट देऊन निवेदन दिले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.