Nagar News : राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातील दोन्हीही लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकसभा मतदारसंघात घरोघरी जाऊन पक्षाची ध्येयधोरणे मागितली जाणार आहेत. राज्यात सर्व जिल्ह्यात हे अभियान राबवले जाणार आहे.
यापूर्वी जो मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे होता त्या मतदार संघावर विशेष भर दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दक्षिण लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून टार्गेट असेल तर स्पष्ट झाले आहे.
नगर जिल्ह्यात नगर (दक्षिण) लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. मागील निवडणुकीत आमदार संग्राम जगताप व भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यात लढत झाली होती. त्यात जगताप यांचा पराभव झाल्याने पक्षाला ही जागा गमवावी लागली. या जागेवरचा दावा पक्षाने सोडलेला नाही.
काँग्रेसने ही जागा आपल्याकडे घ्यायला हवी, अशी मागणी लावून धरताच स्वतः शरद पवार यांनी नगर राष्ट्रवादीच लढवेल, असे पक्षाच्या बैठकीत सांगितल्याचा दाखला पदाधिकारी देतात. यावरूनच राष्ट्रवादीला ही जागा किती महत्त्वाची आहे, हे दिसून येते.
पक्षाच्या बैठकीत मध्यंतरी या जागेवरून बरेच चर्वितचर्वण झाले. विखे यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याची चर्चा झाली. त्यात आमदार रोहित पवार, आमदार प्राजक्त तनपुरे, प्रताप ढाकणे, राजेंद्र फाळके यांची नावे समोर आली. काहींनी आमदार नीलेश लंके यांच्या नावाचा आग्रह धरला.
मागील निवडणुकीत पक्षाला नगर जिल्ह्याने मोठे यश दिले होते. त्यामुळे या निवडणुकीतही जिल्ह्यावर त्यांची भिस्त आहे. त्यासाठी या मतदारसंघात मेहनत घेतली जात आहे. प्रत्येक गावात जाऊन पक्षाची ध्येयधोरणांबाबत माहिती दिली जाणार आहे. शरद पवार यांच्या विचारांही माहिती दिली जाणार आहे. भाजपने घेतलेल्या शेतकरी विरोधी निर्णयाबाबतही मतदारांपर्यंत वस्तुस्थिती पोचवली जाणार आहे.
कार्यकर्त्यांना घरोघरी दिलेल्या भेटीचा वृत्तान्त पक्ष कार्यालयाला कळवायचा आहे. त्याचे व्हिडिओही शेअर करण्यास सांगितले आहे. स्वतः प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत व्हिडिओ क्लिपद्वारे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आहे. पक्षाने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू केली आहे.
नीलेश लंके कोणाकडून लढणार?
दक्षिण लोकसभा मतदारसंघात सध्या डाॅ. सुजय विखे पाटील भाजपचे खासदार आहेत. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण विभागातून पारनेरचे आमदार नीलेश लंके हे राष्ट्रवादीकडून लढणार असल्याची चर्चा आहे. मात्र ते सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आहेत.
लंके यांची दक्षिण भागातील लोकप्रियता पाहता त्यांनी आपल्याकडून लढावे असा शरद पवार गटाचा आग्रह आहे. लंके यांचीही दोन्ही गटावर श्रद्धा कायम असल्याने ते कोणाकडून निवडणूक लढणार याबाबत उत्सुकता आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.