Assembly Election Result : ‘मोदी फॅक्टर’ पुढे राहुल यांची ‘जादू फिकी’

Narendra Modi : चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तीन विरुद्ध एक असा विजय मिळवला असला तरी खुद्द भाजपलादेखील इतक्या दणदणीत विजयाची अपेक्षा नसावी.
Narendra Modi Rahul Gandhi
Narendra Modi Rahul GandhiAgrowon
Published on
Updated on

New Delhi : चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तीन विरुद्ध एक असा विजय मिळवला असला तरी खुद्द भाजपलादेखील इतक्या दणदणीत विजयाची अपेक्षा नसावी. चारही राज्यात भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी तर काँग्रेसकडून राहुल गांधी यांनी जोरदार प्रचार केला होता.

हिंदी अर्थात काऊ बेल्ट समजल्या जाणाऱ्या राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यांत पंतप्रधान मोदी यांची अक्षरश: जादू चालली तर दुसरीकडे राहुल गांधी यांनी सगळा जोर लावूनही पक्षाच्या पदरी निराशा पडली.

हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर भाजपने चार राज्यांच्या निवडणुकांच्या दृष्टीने सावध रणनीती आखली होती. कर्नाटकमध्ये मोदी यांना समोर ठेवत भाजपने प्रचार केला होता. भाजपने ‘बजरंग बली’लाच निवडणुकांच्या केंद्रस्थानी आणले होते. मात्र कर्नाटकाच्या जनतेने पक्षाला झिडकारून लावले. कर्नाटकचा कडवट अनुभव असूनही भाजपने चार राज्यांमध्ये मोदींना केंद्रस्थानी ठेवण्याचा निर्णय घेतला.

Narendra Modi Rahul Gandhi
Assembly Election Result 2023 : उत्तर भारतातील तीन राज्यांत भाजपराज; तेलंगणात काँग्रेसला कौल

दुसरीकडे प्रादेशिक नेत्यांची मोट बांधत केंद्रातले मंत्री आणि खासदारांना उमेदवारी देत मैदानात उतरविले. कोणत्याही परिस्थितीत निवडणुका जिंकण्याचा चंग भाजपने बांधला होता. तिकडे काँग्रेससमोर राजस्थान आणि छत्तीसगडची सत्ता कायम ठेवत मध्य प्रदेश आणि तेलंगणचे सत्ता सोपान गाठायचे लक्ष्य होते. मात्र राजस्थान, छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसला अनपेक्षितपणे सत्ता गमवावी लागली असून मध्य प्रदेशातही पक्षाच्या पदरी निराशा आली आहे.

एकमेव तेलंगणमध्ये काँग्रेसला घवघवीत यश मिळाले, हीच काय ती जमेची बाजू आहे. सरत्या नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी चार राज्यांत धुवांधार प्रचार केला. या काळात या नेत्यांच्या १०८ रॅली निघाल्या तर अनेक रोड शोदेखील झाले. ‘मध्य प्रदेशच्या मनात मोदी’ आणि ‘मोदी साथे आपनो राजस्थान’ अशा घोषणांना केंद्रस्थानी ठेवून भाजपने नियोजनबद्ध प्रचार केला होता.

राजस्थान आणि मध्य प्रदेश या दोन मोठ्या राज्यांवर मोदी यांनी विशेष लक्ष केंद्रित केले होते. राजस्थानमध्ये जयपूर आणि बिकानेर क्षेत्रात मोदी यांच्या १५ रॅली व दोन मोठे रोड शो झाले होते. तर मध्य प्रदेशात त्यांच्या १५ रॅली व इंदोरमध्ये एक मोठा रोड शो झाला होता. छत्तीसगड, तेलंगण ही तुलनेने लहान राज्ये असूनही या ठिकाणी मोदी आणि शहा यांनी स्थानिक मुद्द्यांना हात घातला होता.

निवडणुकांच्या राजकारणातील ‘मोदी फॅक्टर’ चे महत्त्व कमी झाले असल्याचे काँग्रेसच्या धुरिणांकडून सांगितले जात होते, तथापि काँग्रेसचा हा अंदाज सपशेल चुकीचा ठरला आहे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांना कमी लेखण्याची चूक काँग्रेस अथवा प्रादेशिक पक्षांनी करू नये, असा संदेशच चार राज्यांच्या निवडणूक निकालाने दिला आहे. प्रचारात जितका जोर मोदींनी लावला, तितकाच जोर अमित शहा यांनी लावला होता, हेही विसरता येत नाही.

Narendra Modi Rahul Gandhi
Assembly Elections : भाजपकडून ओबीसी नेत्यांची जुळवाजुळव सुरू

काँग्रेसला भोवल्या काही चुका...

लोकप्रिय आणि जनहिताच्या योजनांच्या आधारे राजस्थानचे मैदान मारू, अशी काँग्रेसला आशा होती, तथापि भाजपने हाती घेतलेला आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा आणि प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राहुल गांधी यांचा झालेला प्रवेश यामुळे काँग्रेसला फटका बसला असल्याचे स्पष्ट झाले आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेससाठी अनुकूल वातावरण होते. पण ‘महादेव ॲप’ प्रकरणात थेट भूपेश बघेल यांच्यावर चिखल उडाल्याने आणि आदिवासी पट्ट्यात मतदारांनी नाकारल्याने काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले.

मध्य प्रदेशात राहुल गांधी यांनी आक्रमक प्रचार करताना जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा उपस्थित केला. याठिकाणी कमलनाथ यांनी संपूर्ण ताकद पणास लावली होती. पण शिवराजसिंह चौहान सरकारने योजना, भाजप नेत्यांनी एकत्र राहत घेतलेली मेहनत, चंबळ पट्ट्यातील नेत्रदीपक कामगिरी आदी कारणांमुळे मध्य प्रदेशात काँग्रेसला निराशा पत्करावी लागली. काँग्रेसला ‘भारत जोडो यात्रे’चा मोठा फायदा तेलंगणमध्ये झाला. पण इतर राज्यांत या यात्रेचा फारसा फायदा झाला नाही, हेही या निवडणुकीने दाखवून दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com