Agriculture Market : शेतीमाल विक्रीसाठी ‘एनसीएमएल’ महत्त्वाची संस्था

NCML : नॅशनल कमोडिटीज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड ही शेतीमालाच्या काढणी पश्‍चात तंत्रज्ञानाबाबत सहकार्य करणारी देशातील सर्वांत मोठी कंपनी आहे.
Agriculture Warehouse
Agriculture Warehouse Agrowon

National Commodity Management : नॅशनल कमोडिटीज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड ही शेतीमालाच्या काढणी पश्‍चात तंत्रज्ञानाबाबत सहकार्य करणारी देशातील सर्वांत मोठी कंपनी आहे. या कंपनीच्या देशभरातील केंद्रांच्या साखळीद्वारे शेतीमाल खरेदी, साठवणूक, वाहतूक, शेतीमाल तपासणी व चाचणी, इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग, पीक व हवामान इत्यादीबाबत मार्गदर्शन केले जाते. तसेच बाजारभावाबाबत माहिती, विविध कृषी, अन्न आणि इतर शेतीमाल विषयक वस्तूंबाबत प्रशिक्षण दिले जाते.

राज्यात गोदाम उभारणी आणि नाफेडची खरेदी यामध्ये सर्व शेतकरी कंपन्या व्यस्त आहेत. यंदाच्या खरीप हंगामात बहुतेक शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या गोदामांची उभारणी होऊन साठवणुकीस सुरुवात होईल.

परंतु तत्पूर्वी या समुदाय आधारित संस्थांनी गोदाम व्यवसायाबाबत स्वत:ची क्षमता बांधणी करताना पर्यायी बाजारपेठेबाबत माहिती जमविणे, त्याबाबतचे तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे. मागील काही भागांत आपण एनसीडीएक्स, एनईआरएल, एनईएमएल, ई-समृद्धी यांसारख्या विविध यंत्रणांची माहिती घेतली आहे. आज आपण नॅशनल कमोडिटीज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड (NCML) संस्थेची माहिती येत आहोत.

देशातील आघाडीची शेतीमाल आधारित सेवा देणारी, नॅशनल कमोडिटीज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड ही शेतकरी आणि गुंतवणूकदारांसाठी एक आघाडीची कंपनी आहे. या कंपनीची स्थापना २००४ मध्ये झाली. स्वायत्त संचालक मंडळाद्वारे संस्था चालविण्यात येत आहे. नॅशनल कमोडिटीज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड ही शेतीमालाच्या काढणी पश्‍चात तंत्रज्ञानाबाबत सहकार्य करणारी देशातील सर्वांत मोठी कंपनी आहे. शेतीमाल पुरवठा साखळीशी संबंधित विविध सेवा देते.

या कंपनीच्या देशभरातील केंद्रांच्या साखळीद्वारे शेतीमाल खरेदी, साठवणूक, वाहतूक, शेतीमाल तपासणी व चाचणी, इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग, पीक व हवामान इत्यादीबाबत मार्गदर्शन, बाजारभावाबाबत माहिती, विविध कृषी, अन्न आणि इतर शेतीमाल विषयक वस्तूंबाबत प्रशिक्षण आणि मार्गदर्शन या क्षेत्रात शेतीमाल व्यवस्थापनाबाबत सेवा दिल्या जातात. कंपनीकडे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे मान्यताप्राप्त संशोधन आणि विकास केंद्र आहे. त्या माध्यमातून हवामान आणि पीक निरीक्षण, शेतीमाल उत्पादन व उत्पन्न आणि अन्न सुरक्षेच्या विविध पैलू याबाबत मार्गदर्शन करण्यात येते.

Agriculture Warehouse
Agriculture Warehouses : गोदामामध्ये शेतीमाल साठवण सुविधा

‘एनसीएमएल’चे उद्देश ः

१) शेतीमाल विषयक एकात्मिक व्यापार आणि पुरवठा साखळी बाबत सेवा देणे.

२) शेतीमालाशी संबंधित सर्वसमावेशक तारणविषयक जोखीम व्यवस्थापन सेवा देणे.

३) शेतीमाल उत्पादक आणि व्यापाऱ्यांना स्पॉट आणि भविष्यातील बाजारपेठेशी जोडणे

४) शेतीमाल बाजारविषयक अचूक सल्लागार सेवा देणे.

५) शेतीमाल विषयक विश्‍वासार्ह आणि कमी खर्चात शेतीमाल चाचणी आणि प्रमाणीकरणाबाबत सेवा देणे.

६) सुरक्षित आणि पारदर्शक गोदाम पावतीविषयक बाजार तयार करणे आणि गोदाम पावती अर्थसाह्य योजनेस प्रोत्साहन देणे.

‘एनसीएमएल'तर्फे सुविधा ः

१) शेतीमाल साठवणूक

२) शेतीमाल खरेदी आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन

३) शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा

४) शेतीमालाशी संबंधित गरजांसाठी कर्जपुरवठा

५) शेतीमाल चाचणी व प्रमाणीकरण विषयक सेवा

६) शेतीमाल बाजारभाव, हवामान अंदाज इत्यादीविषयक मार्गदर्शन

७) सर्व्हे, इन्स्पेक्शन आणि लेखापरीक्षण विषयक सेवा

८) शेतीमाल विक्रीविषयक ऑनलाइन डिजिटल प्लॅटफॉर्म (मार्केटयार्ड.कॉम)

नॅशनल कमोडिटीज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीची १०२

गोदामे, १०,००० वाहने आणि ९३५ ठिकाणी केंद्रे तसेच ७० लाख चौरस फूट क्षेत्रात कामकाज सुरू असून, ५०० कोटींहून अधिक उलाढाल आहे.

‘एनसीएमएल’तर्फे ग्राहकांना सेवा ः

१) शेतकरी

२) विमा कंपन्या

३) शासकीय यंत्रणा

४) बँक व इतर वित्तीय संस्था

५) खासगी उद्योग

६) संशोधन आणि शिक्षण क्षेत्रातील संस्था

७) पायाभूत सुविधा, गोदाम आणि वाहतूक विषयक सेवा देणाऱ्या संस्था

विविध बॅंका, खासगी क्षेत्रासोबत सहकार्य ः

१) बँक ऑफ इंडिया, कॉर्पोरेशन बँक, पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक या संस्था नॅशनल कमोडिटीज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्या भागधारक आहेत. तसेच काही खासगी बँका ‘एनसीएमएल’मार्फत सेवा घेतात. त्याचप्रमाणे भारतीय कपास निगम लिमिटेड, ग्राहक अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय, मिनरल आणि मेटल ट्रेडिंग कंपनी (एमएमटीसी लिमिटेड), नाफेड, केंद्र शासन पुरस्कृत राज्य विपणन महामंडळ मर्यादित हे शासनाचे विविध विभाग एनसीएमएलचे सहकार्य घेतात. काही खासगी उद्योजकांकडून सुद्धा एनसीएमएलच्या सेवा घेतल्या जातात. एनसीडीईक्स हे भारतातील महत्त्वाचे कमोडिटी एक्स्चेंज एनसीएमएल मार्फत सेवा घेते. अन्न प्रक्रिया व निर्यात क्षेत्रातील उद्योग तसेच विमा कंपन्यासुद्धा एनसीएमएल मार्फत सेवा घेतात.

२) नॅशनल कमोडिटीज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेडच्या विविध सेवांपैकी सेवा देणाऱ्या संस्थेत एनसीएमएल कॉमग्रेड (NCML CommGrade) ही अन्न तपासणी करणारी संस्था असून, भारतातील मोठ्या प्रयोगशाळांपैकी ही एक अग्रगण्य प्रयोगशाळा आहे. भारतात १४ पेक्षा जास्त वर्षांहून अधिक काळ अन्न आणि पेय परीक्षण विषयक सेवा देण्याचा या कंपनीला अनुभव असून, भारतातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरिंग सेवा देणारी ही सर्वोच्च कंपनी आहे.

कॉमग्रेड या कंपनीकडे देशभरात अत्याधुनिक १५ ठिकाणी अन्न परीक्षण प्रयोगशाळांचे नेटवर्क असून उच्च दर्जाचे रासायनिक, सूक्ष्मजीवशास्त्र आणि कीटकनाशक विषयातील विशेषज्ञ उपलब्ध आहेत. नॅशनल अॅक्रिडिटेशन बोर्ड ऑफ टेस्टिंग लॅब (एनएबीएल), कृषी आणि अन्न प्रक्रिया पदार्थ निर्यात विकास ॲथॉरिटी (अपेडा), असोसिएशन ऑफ मायक्रोबायोलोजिस्ट ऑफ इंडिया (एमएआय), असोसिएशन ऑफ फूड सायंटिस्ट आणि टेक्नोलोजिस्ट ऑफ इंडिया (एओएफएसटी), हजार्ड अॅनालिसिस आणि क्रिटिकल कंट्रोल पॉइंट (एचएसीसीपी), ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्डस (बीआयएस), फूड सेफ्टी स्टॅण्डर्ड ॲथॉरिटी ऑफ इंडिया (एफएसएसएआय), एक्स्पोर्ट प्रमोशन काउंसिल (ईपीसी), टी बोर्ड, केंद्र सरकार पुरस्कृत मार्केटिंग आणि इन्स्पेक्शन विभाग (एमएआय) या सर्व विभागामार्फत कॉमग्रेड प्रयोगशाळा प्रमाणित आहेत.

‘एनफीन’ संस्थेचे कार्य ः

१) नॅशनल कमोडिटीज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेडची एनसीएमएल फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड (एनफीन) संस्था आहे. ही संस्था अर्थपुरवठा करण्याचे काम करते. ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत नोंदणीकृत कंपनी आहे. नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी (एनबीएफसी) या प्रकारात गणली जाते.

२) या कंपनीचा उद्देश कृषी आणि ग्रामीण व्यवसायाकरिता आर्थिक साह्य करणे असून, ही एनसीएमएल कंपनीची अनुदानित कंपनी आहे. एनसीएमएल ही शेतीमाल वाहतूक, गोदामविषयक सेवा व शेतीमाल पुरवठा साखळी व्यवस्थापन आणि तारण व्यवस्थापन या विषयात मागील बऱ्याच वर्षांपासून कार्यरत आहे. या कंपनीच्या संचालक मंडळाने ३३६ कोटी रुपयांचे भांडवल एनफीन कंपनीकरिता उपयोगात आणण्याचे ठरविले. या कंपनीमार्फत विविध प्रकारची कर्ज वितरित करण्यात येत असून, डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे कर्ज वितरणाची सुविधा दिली जाते.

एनसीएमएल मार्केटयार्ड प्रायव्हेट लिमिटेड चे कार्य ः

१) एनसीएमएल मार्केट यार्ड प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी एनसीएमएल या कंपनीची अनुदानित कंपनी आहे. एनसीएमएल या कंपनीच्या देशभरातील संपूर्ण ग्राहकांना शेतीमाल वाहतूक, बाजारपेठ व ऑनलाइन एक्स्चेंज विषयक देण्यात येणाऱ्या सेवांचे व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगाने मार्केटयार्ड.कॉम ची निर्मिती करण्यात आलेली आहे.

२) ऑनलाइन एक्स्चेंजमार्फत होणाऱ्या खरेदी विक्रीच्या व्यवहारांचे योग्य रीतीने व्यवस्थापन करण्यासाठी मार्केटयार्ड.कॉम ची मदत घेतली जाते. या ई-मार्केट प्लॅटफॉर्ममुळे शेतीमालाची किंमत शोधणे, शेतीमालाचे व्यवहार योग्यरीतीने करणे, ग्राहकांकडील गोदामातील धान्याचा साठा हाताळणे, विविध ठिकाणांवरील सौद्यांचे तारण व्यवस्थापन करणे याबाबी सोप्या होतात. एका क्लिकवर मोठमोठे व्यवहार तत्काळ करणे या प्लॅटफॉर्ममुळे सोपे होते.

Agriculture Warehouse
Agriculture Warehouse : गाव तिथे गोदाम योजना दोन महिन्यांत दृष्टिपथात

‘मार्केटयार्ड प्लॅटफॉर्म’चा फायदा ः

१) गोदामात परीक्षण करून साठवणूक केलेला शेतीमाल एका बटणाच्या क्लिकवर खरेदी अथवा विक्री करणे या संकल्पनेत पुढारलेली कंपनी म्हणून एनसीएमएल अग्रगण्य कंपनी आहे.

२) कमीत कमी कालावधीत खरेदीचे व्यवहार सर्व प्रकारच्या गोष्टींची पूर्तता जसे की शेतीमाल नमुना तपासणी व साठ्याची तपासणी केली जाते.

३) खरेदीदार व विक्रेते यांना कमीत कमी वेळेत शेतीमाल व्यवहार पूर्ण करून व्यवहारातील जोखीम कमी करण्याचे कार्य कंपनीमार्फत केले जाते.

४) एक सिंगल प्लॅटफॉर्मवर देशातील व देशाबाहेरील अनेक खरेदीदार व विक्रेते यांना व्यवहार करण्यासाठी सामावून घेतले जाते.

५) या प्लॅटफॉर्ममुळे गोदाम व्यवसायाशी संबंधित सर्व सेवा एकाच ठिकाणावर उपलब्ध होत असल्याने शेतकरी उत्पादक कंपनी व सहकारी संस्था यांनी नव्याने या व्यवसायात उतरताना एनसीएमएलशी संबंधित सर्व सेवा घेणे आवश्यक आहे. तत्पूर्वी चालू हंगामापासूनच छोटे मोठे व्यवहार करण्यास हरकत नाही, जेणेकरून अशा प्रकारच्या बाजारपेठेबाबत ज्ञान वाढत जाऊन पर्यायी बाजारपेठेत प्रवेश करण्यास गोदाम असणाऱ्या शेतकरी कंपन्यांना पुढील कामकाज करणे सोपे जाईल. अधिक माहितीसाठी www.ncml.com या संकेतस्थळास भेट द्यावी.

संपर्क ः प्रशांत चासकर, ९९७०३६४१३०

(शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, एमसीडीसी, स्मार्ट

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या., पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com