Indigenous Lifestyle: आदिवासींची निसर्गपूरक शेती अन् जीवनशैली

Tribal Farming: आदिवासी भागात काम करताना ‘काय करावं?’ यापेक्षा ‘कसं करावं?’ आणि ‘काय करू नये?’ याची जाणीव असणं गरजेचं आहे. यासोबतच व्यक्ती, संस्था, समूह आणि सरकार यांनी आदिवासींच्या जीवनशैलीच्या केंद्रस्थानी राहून, त्यांच्याशी सुसंगत पद्धतीने काम केलं तरच ते खऱ्या अर्थानं संवेदनशील आणि शाश्‍वत विकासाचं उदाहरण ठरेल.
Tribal Farming
Tribal FarmingAgrowon
Published on
Updated on

अनिकेत लिखार

Tribal Culture: आदिवासी भागात काम करताना ‘काय करावं?’ यापेक्षा ‘कसं करावं?’ आणि ‘काय करू नये?’ याची जाणीव असणं गरजेचं आहे. यासोबतच व्यक्ती, संस्था, समूह आणि सरकार यांनी आदिवासींच्या जीवनशैलीच्या केंद्रस्थानी राहून, त्यांच्याशी सुसंगत पद्धतीने काम केलं तरच ते खऱ्या अर्थानं संवेदनशील आणि शाश्‍वत विकासाचं उदाहरण ठरेल.

आदिवासी समाजाचा जीवनक्रम प्रामुख्याने जल, जंगल आणि जमिनीसारख्या नैसर्गिक संसाधनांवर आधारलेला आहे. त्यांची उपजीविका, संस्कृती, आहारपद्धती, शेती करण्याच्या पद्धती, तसेच धार्मिक परंपरा या साऱ्याच गोष्टी या नैसर्गिक संसाधनांशी अतूटपणे जुडल्या गेलेल्या आहेत. म्हणूनच आदिवासी बहुल भागात काम करताना शासन, प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि इतर निगडीत व्यवस्थेने विशेष जाणीव ठेवणे अत्यावश्यक आहे.

महाराष्ट्रातील गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, नाशिक, अमरावती अशा आदिवासी बहुल भागांत फिरताना दिसून येते, की येथील आदिवासी समाज निसर्गाशी सुसंगत राहून शेती करतो. येथील बहुतेक क्षेत्र हे कोरडवाहू असून त्यात प्रामुख्याने धान, ज्वारी, तूर, उडीद, मूग यांसारखी पिके ते घेतात; परंतु या व्यतिरिक्त काही ठिकाणी कोदो, कुटकी, सांवा, बरबटी, तीळ, जवस इ. पिकांसोबतच भाजीपाला सुद्धा घेतात. रानभाज्या व जंगलातील काही फळझाडे हे त्यांच्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहेत; जे त्यांना आवश्यक पोषण पुरवतात.

पावसाळी हंगामात मिळणाऱ्या रानभाज्या हे केवळ पोषणाचे नव्हे, तर उपजीविकेचेही साधन आहेत. हिंगोली जिल्ह्यात उगम ग्रामीण विकास संस्थेमध्ये कामानिमित्त गेलो असता संस्था काम करत असलेल्या क्षेत्रात ३७ प्रकारच्या रानभाज्या निदर्शनास आल्या होत्या. त्याची छोटी पुस्तिका सुद्धा त्यांनी तयार केली आहे. आदिवासी बहुल भागात भरपूर औषधी वनस्पती उपलब्ध असून प्रत्येक वनस्पतीचे आरोग्याच्या दृष्टीने असलेले महत्त्वसुद्धा लोकांना माहीत आहे. कुठल्या आजारावर कुठली वनस्पती केव्हा उपयोगी पडेल आणि कशा पद्धतीने ती वापरावी याचे सुद्धा पारंपरिक ज्ञान त्यांच्याकडे आहेत. विशेष करून जनावरांना होणाऱ्या आजारांवरचे उपचार सुद्धा त्यांना ठाऊक असतात.

Tribal Farming
Rural Development : ग्रामविकास, आर्थिक सक्षमतेच्या दिशेने...

शेतीकामामध्ये ते बैलाव्यतिरिक्त गाय, कोंबडी, बकरी यांसारखी जनावरेही सांभाळतात. गाई या प्रामुख्याने शेणखतासाठी पाळल्या जातात. त्यांची धार्मिक संस्कृती ही निसर्गाशी सुसंगत असून ते निसर्गाला देव मानतात. प्रत्येक हंगामात पेरणी करण्यापूर्वी एकत्रित धार्मिक पूजा करण्याची परंपरा आजही ते जपतात. पीक कापणी/काढणी विधिवत पूजा केल्यानंतरच केली जाते.

पिकांची साठवणूक आणि प्रक्रिया ही सुद्धा काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने केली जाते. जसे की साठवणुकीसाठी ‘ढोला’ वापरणे किंवा जात्यावर धान्य दळणे इ. पिकांवर आधारित स्थानिक मूल्यसाखळी निर्माण करणे आणि त्याचे व्यवस्थापन व वापर हेही ते अत्यंत कुशलतेने करतात. परंतु गेल्या काही वर्षांपासून नगदी पिकांचा समावेश या भागात झाल्यामुळे वरील बाबी हळूहळू कमी होत आहेत आणि बाजार केंद्रित व्यवस्थेकडे या भागांची वाटचाल सुरू आहे.

आणखी वैशिष्ट्यपूर्ण बाब अशी, की या भागात शेती, मशागतीची अवजारे जंगलातील लाकडांपासूनच बनवली जातात. कोणत्या झाडाचे लाकूड कोणते अवजार बनवायला योग्य असेल आणि ते कधी तोडावे, याचे पारंपरिक ज्ञान त्यांच्याकडे आहे. ही सर्व कौशल्ये पिढ्यान् पिढ्या शिकत पुढे आलेली आहेत. जंगलातील उत्पादने- जसे की मोह, चारोळी, तेंदू पत्ता, हिरडा, बेहडा, टोर, लाख, चिंच, बिबा इ. त्यांच्यासाठी उत्पन्नाचे स्रोत आहेत. त्यांच्या शेती पद्धती या पारंपरिक असून निसर्गाला साजेशा आहेत.

उदाहरणार्थ मेळघाटमधील मिश्रपीक पद्धती ज्यामध्ये एक एकरमध्ये तृणधान्य, भरडधान्य, तेलबिया, डाळवर्गीय, मसालावर्गीय पिके आणि भाज्या अशी सर्व पिके दिसतात. एक बाब इथे प्रकर्षाने जाणवली की जे शेतकरी मिश्रपीक घेतात आणि ज्याच्या घरी पोषणबाग आहेत, त्या घरात कुपोषणाचे रुग्ण नाहीत. अनेकदा आदिवासींना ‘मागास’ समजले जाते, पण वास्तवात त्यांच्याकडे पारंपरिक, अनुभवाधिष्ठित ज्ञान आणि जीवनशैली आहे. ती त्यांना अन्य कोणाच्याही समर्थनाशिवाय जगण्यास प्रेरित करते. त्यामुळे त्यांना केवळ साह्य करावे, अशा भूमिकेपेक्षा त्यांच्या ज्ञानाचा, कौशल्यांचा आणि जीवनपद्धतीचा सन्मान राखणारी भूमिका स्वीकारायला हवी.

Tribal Farming
Agriculture Success Story: महिला शेतकरी कंपनीपर्यंत रेवतीताईंचा प्रवास...

स्वयंसेवी संस्था किंवा शासकीय यंत्रणांनी आदिवासी भागात काम करताना तिथल्या खऱ्या गरजा समजून घेणे आवश्यक आहे. मूलभूत सुविधा देताना स्थानिक संस्कृती आणि पर्यावरणाचे भान ठेवले पाहिजे. जेव्हा जेव्हा त्यांना कोणत्याही साहित्याची, अवजारांची आवश्यकता भासते, तेव्हा त्यांनी ती साधने स्वतः बनवलेली असतात. ही स्वयंपूर्णता आणि आत्मनिर्भरतेची भावना आजच्या आधुनिक समाजालाही शिकण्यासारखी आहे.

‘मुख्य प्रवाहात सामील करणे’ ही संकल्पना राबविताना आदिवासींची जीवनशैली, सांस्कृतिक ओळख, त्यांच्या पारंपरिक व्यवस्थांचा ऱ्हास होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्याचा अट्टहास सोडून त्यांच्या ज्ञान, कला - कौशल्ये, संस्कृती - परंपरा, जीवन मूल्ये यांच्या बद्दल आदर सन्मान व्यक्त करून त्याचा आपल्या जीवनात समावेश करायला शिकण्यासाठी जायला हवे. आदिवासी भागात राहणाऱ्या गैर आदिवासी समाजाने ही बाब ध्यानात घ्यायला पाहिजे, की त्यांना औद्योगिक शहरी रचनेकडे नेणे घातक असून आपण त्यांच्या कृषिमूलक, सुसंस्कृत आदिवासी ग्रामीण रचनेकडे जाणे आवश्यक आहे.

काय करायला हवे ?

स्थानिक सहभाग महत्त्वाचा

सरकारी योजना राबवताना त्या भागाची भौगोलिक परिस्थिती आणि तिथल्या लोकांचे अनुभव लक्षात घेऊन काम करायला हवे. योजना बनवताना आणि राबवताना गावकऱ्यांचा सहभाग असावा. लोकसहभागातून तयार होणारी आणि स्थानिक गरजांवर आधारित कार्यपद्धती असायला हवी (बॉटम टू टॉप). त्यांची जीवनशैली आणि निसर्गाशी असलेला जवळचा संबंध ग्रामविकासात समाविष्ट करायला हवा. समृद्ध गाव म्हणजे काय आणि ते काय बघतात हा विचार सुद्धा विचारात घ्यायला हवा.

स्थानिक साधनांचा उपयोग

गावातील पीकपद्धती, बाजारपेठ आणि लोकांच्या गरजा समजून घेऊन बियाणे बँक, अवजारे बँक, रोपवाटिका आणि सामूहिक निविष्ठा केंद्रे सुरू करता येतील. ही केंद्रे चालवण्यासाठी स्थानिकांना प्रशिक्षण द्यावे.

गावातच उत्पादन व लहान प्रक्रिया केंद्रे

गावात कोणकोणत्या वस्तूंची निर्मिती होते आणि कोणकोणत्या वस्तू बाहेरून आणल्या जातात याची माहिती मिळवली, तर त्यातून गावात लहान उत्पादन आणि प्रक्रिया केंद्रे उभारता येतील. गावातच कच्चा माल उपलब्ध असेल, तर स्थानिक लोकांसाठी रोजगाराची संधी निर्माण होईल आणि तरुणांचे शहराकडे स्थलांतर कमी होईल.

कलेला बाजारपेठ

आदिवासी बांधवांकडे उत्कृष्ट कला आणि साहित्यनिर्मितीची क्षमता आहे. त्यांचा आत्मविश्‍वास वाढवून त्यांच्या कलाकृतींसाठी बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास त्यांना स्थायी उत्पन्न मिळू शकते.

रोजगार हमी योजना

मनरेगामधून मृदा व जलसंधारणाची कामे करता येतील. त्यातून गावातच काम मिळेल. वृक्ष लागवड व त्याची निगा राखण्याचे कामही रोजगार निर्माण करू शकते.

महिला बचत गटांसाठी संधी

महिला बचत गट पोषण बागा, खाद्यप्रक्रिया, हस्तकला यांसारख्या कामांमध्ये सामील होऊन उत्पन्न मिळवू शकतात.

गौण वन उपजातून उपजीविका

वनातून मिळणाऱ्या उत्पादनांची लहान प्रक्रिया केंद्रे गावात उभारून, त्यांच्यात संस्थात्मकरीत्या काम केले, तर चांगले रोजगार निर्माण गावातच होऊ शकतात.

मूल्यसाखळीत सहभाग वाढवणे

आदिवासी बांधव सध्या तेंदूपत्ता व मोह यांचे संकलन करतात, पण त्यांना या उत्पादनांच्या संपूर्ण मूल्यसाखळीत सामील करणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना अधिक उत्पन्न मिळू शकते.

म्हणूनच आदिवासी भागात काम करताना ‘काय करावं?’ यापेक्षा ‘कसं करावं?’ आणि ‘काय करू नये?’ याची जाणीव असणं गरजेचं आहे. यासोबतच व्यक्ती, संस्था, समूह आणि सरकार यांनी आदिवासींच्या जीवनशैलीच्या केंद्रस्थानी राहून, त्यांच्याशी सुसंगत पद्धतीने काम केलं तरच ते खऱ्या अर्थानं संवेदनशील आणि शाश्‍वत विकासाचं उदाहरण ठरेल.

(लेखक कोरडवाहू शेती क्षेत्रासाठी काम करणाऱ्या आरआरए नेटवर्कचे सदस्य आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com