Pune News : राज्यातील कृषी विद्यापीठांनी नॅनो खत वापराबाबत पीकनिहाय अभ्यास अद्यापही केलेला नाही. ही खते कशी वापरायची याच्या शिफारशीदेखील केलेल्या नसताना केंद्राकडून रब्बी हंगामासाठी नॅनो खताच्या ४५ लाख बाटल्यांचा पुरवठा करण्याचे नियोजन केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
केंद्रीय कृषी मंत्रालयाने रब्बीच्या २०२४-२५ मधील संभाव्य खत उपलब्धतेचा आढावा अलीकडेच घेतला होता. त्यात रब्बीसाठी राज्याला नियमित वापरातील ३४.७० लाख टन रासायनिक खते मंजूर करण्यात आली. यात १० लाख टन युरिया, डीएपी २.५ लाख लाख टन, एमओपी एक लाख टन, संयुक्त खते १२ लाख टन, तर सहा लाख टन सिंगल सुपर फॉस्फेटचा समावेश आहे.
मात्र रब्बीमध्ये नॅनो युरिया व नॅनो डीएपीचा वापर वाढवावा, असा आग्रह केंद्राचा आहे. त्यासाठी नॅनो युरियाच्या ३४.७० लाख बाटल्या; तर नॅनो डीएपीच्या ११ लाख बाटल्यांचा पुरवठा केला जाणार आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, राज्यातील कृषी विद्यापीठांनी नॅनो युरिया व नॅनो डीएपीच्या उपयुक्ततेविषयी अभ्यास केलेला नाही.
कृषी विद्यापीठांनी नॅनो खते वापराबाबत पीकनिहाय शिफारशी केलेल्या नाहीत. असे असतानाही खत कंपन्यांना लक्षावधी बाटल्यांचा पुरवठा करण्याची घाई होत आहे का, असा सवाल कृषी खात्यातील अधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. नॅनो खताची संकल्पना उपयुक्त असून ती पर्यावरणपूरक व खर्चात बचत करणारी आहेत. परंतु त्याचा योग्य वापर होण्यासाठी गावपातळीपर्यंत शिफारशी पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे नॅनो खतांची उपयुक्तता शेतकऱ्यांनी स्वतः अनुभवलेली नाही. त्यामुळे नॅनो खताच्या लक्षावधी बाटल्या केवळ बाजारात आणल्याचे समाधान केंद्राला मिळेल. मात्र त्याची अपेक्षित खरेदी शेतकऱ्यांकडून होणार नाही, असे कृषी शास्त्रज्ञांना वाटते.
...असा होणार रब्बीसाठी महिनानिहाय खत पुरवठा
(सर्व आकडे हजार टनांत, नॅनो युरिया व नॅनो डीएपीचे आकडे बाटल्यांमध्ये)
खताची श्रेणी ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एकूण
युरिया १०० १२० २२० २१० १६० १९० १०००
डीएपी ३२.५० ४५ ४५ ४७ ३७.५० ४२.५० २५०
एमओपी १३ १३ २० १८ १४ २२ १००
एनपीके १५६ २१६ २६४ २४० १६८ १५६ १२००
एसएसपी ७२ ७८ १२६ १२६ ९६ १०२ ६००
एकूण ३७३.५० ४७२ ६७५ ६४१.५० ४७५.५० ५१२.५० ३१५०
नॅनो युरिया ३४७००८ ४१६३८० ७६३४०३ ७२७८०३ ५५५१६९ ६५९३३६ ३४७००००
नॅनो डीएपी १४३००० १९८००० १९८००० २०९००० १६५००० १८७००० ११०००००
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.