Bailpola 2023 :नंद्या-भावड्याची बैलजोडी आणि आम्हा भावंडांची ‘दूधआई‘!

Animals In Farm : एक काळ होता जेव्हा लोकं दावणीच्या जनावरांना कुटुंबातले सदस्य मानत असत. आता तर दावणीला जनावरंच उरलेली नाहीयेत. ट्रॅक्टरची मिरवणूक काढली जाते. कृषी संस्कृती हळूहळू लोप पावत चाललीय.
Animal In Farm
Animal In FarmAgrowon

बाप उत्तम भलरी म्हणायचा. लयबद्ध, तालासुरात. औत मुडानावर म्हणजे वळणावर गेलं की, "ये रे बैला ये... सर्जा ये रे राजा ये..." असे तो तारस्वरात म्हणायचा. शिवारातली समदी लोकं सखाबाबा औत हाकतोय, असं धरून चालायची. मातीचं सोनं करणाऱ्या बैलांवर, गायींवर, काळी माती, शेतीशिवारावर बापाचा भारी जीव होता. नांगरणी, वखरणी, पेरणी तो मनोभावे करायचा.

"माती पुरणासारखी मऊ झाली पायजेल. तवा पेरा करायचा म्हंजे रगाट पीक येईल." असं बाप म्हणायचा. माती कसणारा हा धनी आपल्या दावणीच्या जित्राबांवर किती जीवापाड प्रेम करायचा, हे शब्दांत नाही सांगता येणार! कुळव हाकताना काडी, कचरा, दगड वेचून वावर स्वच्छ, सुंदर झाले की निगुतीनं बापाची पेरणी सुरु होई. काळ्या आईला साष्टांग दंडवत घातल्याबिगर बापानं कधीही पेरणी केली नाही. शेता-मातीविषयी निसर्गाविषयी बापानं हयातभर कृतज्ञता जपली...

घरातल्या आमच्या भावंडांइतकाच माझ्या बापाचा गायी-बैलांवर जीव होता... वीस वर्षे आमच्या दावणीला असलेली नंद्या-भावड्याची जोडी बापाला स्वतःच्या जीवाइतकीच प्यारी होती. ही बैलं म्हणजे केवळ जनावरं नव्हती. आमच्या कुटुंबातले सदस्यच होते ते. आम्ही जे कडधान्य खायचो, तेच जात्यावर भरडून, भिजवून, उकडून आई बैलांनाही चंदी-चारा म्हणून खाऊ घालायची. दावणीची जनावरं अन घरातल्या धान्याच्या पोत्यांच्या ठीक्यांवर श्रीमंती मोजली जायचा काळ होता तो. शेतातली माती आणि दावणीची जनावरं यांच्यावर बापाचं प्रेम नव्हतं तर अद्भुत अद्वैत होतं! बापाला गायी-बैलांचं दुखणंखुपणं कळत होतं. इतका एकरूप झालेला होता तो त्यांच्याशी. शेण बघून किंवा दूध कमी दिले तर बाप त्या जनावरांवर लगेच झाडपाल्याच्या औषधाचा उपचार करायचा. बापाला औषधी वनस्पतीची माहिती होती. हालता, फिरता होता तोवर तो क्वचितच दवाखान्यात गेला असेन.

Animal In Farm
Plant-Based Meat : मासांहाराची चव शाकाहारी पदार्थात ते कसं?

आमची बैलपोळयाच्या दिवसाच्या सोहळयाची लगबग तर विचारु नका. चारआठ दिवसांवर सण आला की सगळ्या घराला तयारीचे वेध लागायचे. आम्हा पोरांना सुट्टी असायची.सकाळी लवकर उठून बैल रानात चारायला घेऊन जायचो. मनाई हुकूम म्हणजे चराईबंदी असलेल्या राखीव रानात हिरवं लुसलुशीत गवत असायचं. तिथलं गवत बैल आवडीनं खात असत. थोडा वेळ चरले की बैल तट होत. बैलपोळयाच्या दिवशी चराईबंदी असलेल्या क्षेत्रात मुद्दाम बैल चारायला न्यायचो. या दिवशी वन विभागाचे शिपाई बैल कोंडवाड्यात कोंडत नसत. सण असायचा ना बैलांचा! दोन्ही कुशी तट होईपर्यंत बैल चारायचे. भुडकीच्या डोहावर नेऊन बैलांना मस्त अंघोळ घालायचो. घरी आल्यावर शिंगाना हिंगळ लावणं, बेगडं चिकटवणं, रंगीबेरंगी कागदांनी बाशिंग सजवणं, माठवटी, घुंगुरमाळा रंगात भिजवणं, पितळी तोडे, माळा असा साज साफसूफ करणं... ही कामं आमची पोरांची. केवढी धमाल असायची. हे दृश्य नुसतं आठवलं तरीही आनंदानं मन नाचू लागतं! 

मुलांना चुका करायच्या 'स्वातंत्र्यात' कल्पकता बहरते! चित्रकलेच्या वहीत, पेपरात इतकं मन लावून चित्र काढलं नसेन इतकी कलाकारी पणाला लावून बैल सजवायचो आम्ही. शाळेतले रंग-रेषांचे नियम इथं नव्हते. विशेष म्हणजे हट्ट करूनही गोळ्या बिस्किट्स खायला चार आणे, आठ आणे न देणारा बाप बैल सजवायला रंग, हिंगळ, बेगडं, चवार, झूली अशा गोष्टी आणायला हात ढिल्ला सोडायचा.

पोळयाच्या दिवशी गावातून सगळ्या बैलांची मिरवणूक निघायची. आणखी काही शेतकऱ्यांच्या बैलजोड्या भारी सजलेल्या असत. त्यात आमची बैलजोडी आम्हालाच उठून दिसायची. कारण त्यात आम्ही जीव ओतून काम केलेलं असायचं. मोठी माणसं पोरांचं तोंडभरून कौतुक करायची! किती भारी वाटायचं! उर अभिमानानं भरुन येई. परीक्षेसह इतर ठिकाणी कौतुक वाट्याला यावं, असं काही कर्तृत्व नव्हतं आमचं! असो. तो वेगळा विषय आहे. सायंकाळी बैलं घरी आली की आई, भावजया बैलांची पूजा करायच्या. बैलांचे पाय धुवून पुरणपोळीचा नैवद्य खाऊ घालत. "ग्वाड झाली का रे भावड्या?" असं बाई लटकंलटकं विचारायची. मग काय बैलं माना डोलवून घुंगुरमाळांचा नाद करत पुरणपोळी छान झाल्याची जणू दाद द्यायचे. किती लख्ख आठवतात या चित्रगोष्टी! मेंदूने मेमरीत तंतोतंत जतन करून ठेवल्यात.

Animal In Farm
Tomato Market Price : दर पडल्याने शेतकऱ्याने पेटवला टोमॅटो, किलोचा भाव मिळतोय कॅरेटला

मैनी नावाची गाय होती. वासरू म्हणून आली आणि पुढं आयुष्यभर आमच्याकडे राहिली. आम्हाला आईसारखी प्रेमळ वाटायची ती. मैनीला भेटलो नाही, तिच्या पाठीवर हात फिरवला नाही, असा दिवस उजडला नसेन. आईसोबत मैनीच्या दुधावर आमचं भावंडांचं भरणपोषण झालंय. ती आमची 'दूधआई'च होती! ती गेली तेव्हा आमचं सारं कुटुंब रडत होतं... घरात सूतक पडल्यासारखं वातावरण होतं. रानात गुरं राखायला जायचो तेव्हा त्या कामाचं कधी ओझं वाटलं नाही. सुरपारंब्या, लिंगोरच्या, आबाधोबी, सूर मारत डोहात मस्त पोहणं... किती खेळ रंगायचे तिकडे रानात. सीताफळं, बोरं, कंदमुळं असा रानमेवा शोधताना दिवस किती आनंदात जायचा...

भावड्या नावाचा बैल चरायला रानात गेलता. आडवाटेतल्या माळीतून चालताना पाय घसरला आणि घोकटीच्या उंच कातळकड्यावरुन तो कोसळला. तिथंच तो निसर्गतत्त्वात विलीन झाला. रानात बैलं चारायला थोरला भाऊ गेलता. भावड्या म्हंजे बापाचा जीव की प्राण! तामसी बाप भावावर इतका भडकला की, भावाचा जीवच घेईन की काय वाटायचं... भावड्या गेल्यावर पुढचे कितीतरी दिवस बापाला जेवण गोड लागत नव्हतं... भावड्याला जिथं पुरलं होतं, तिथं बापानं दिवाळीच्या दिवशी पणती लावलेली आठवतेय! पुढचे किती क्षण बाप तिथं एकटक बघत बसला होता. आजही लख्ख आठवतोय तो प्रसंग. काळजावर कोरला गेला आहे. नंद्या-भावड्याची जोडी म्हंजे आमच्या दावणीचं भूषण होतं. आधी म्हटलंय तसं ते कुटुंबातले सदस्य होते, त्यांच्याशिवाय आम्ही कोणी नाही, हेच बाप आम्हाला सांगायचा.

घोटीच्या बाजाराहून परत येताना चोरटे वाटेत आडवे आले, तेव्हा या बैलांनी वेगानं धावत, कसं त्या कठीण प्रसंगातून सुखरूप सोडवलं याचं रसभरीत वर्णन बापाकडून ऐकताना अंगावर रोमांच उभे राहायचे... शेती, माती आणि जनावरांशी माझ्या आई-बापाचं विलक्षण अतूट नातं होतं. आज दोघेही हयात नाहीयेत. आठवणी तेवढ्या सोबत करताय. आज बैल पोळ्याच्या सण आहे. त्यामुळं आई-बाप, नंद्या-भावड्याची जोडी आणि मैना गाय सगळ्यांच्याच आठवणी जाग्या झाल्या. मनात भावभावनांचं एकच काहूर माजलंय. मनाच्या गाभाऱ्यात सगळीकडं उदास करणारी अस्वस्थ लहर पसरलीय. 

एक काळ होता जेव्हा लोकं दावणीच्या जनावरांना कुटुंबातले सदस्य मानत असत. आता तर दावणीला जनावरंच उरलेली नाहीयेत. ट्रॅक्टरची मिरवणूक काढली जाते. कृषी संस्कृती हळूहळू लोप पावत चाललीय. बहुजन समाजानं आपली संस्कृती आणि परंपरा सोडून देऊन टीव्ही, सिनेमे आणि युट्यूबवरवरले व्हिडिओ बघून त्या प्रभावाखाली येऊन इतर संस्कृतीतील नवनवीन सण-उत्सव आयात केलेत. ते आनंदाने साजरे करू लागलेत. नवीन रितीरिवाज, नवीन देव-देवकंसुद्धा स्वीकारलीत. त्याबद्दल तक्रार नाही. मात्र आपण कोणाचे वारस आहोत? याचाही शेतकऱ्यांच्या लेकरांना विसर पडलाय. याबद्दल मनात खंत आहे. बळीराजाला पाताळात घातलेला वामन आज मनामनावर राज्य करू लागलाय. शेवटी काळाचा महिमा अगाध असतो!  शेताच्या बांधावरची मावलाई, म्हसोबा, मोठ्याबाबा, बिरोबा यांचा विसर पडत चाललाय. त्या ‘दगडांना‘ शेंदूर फासायला यांचे मन गुंतत नाही. दांडिया खेळायला मात्र त्यांचे मन ओढ घेत धावत सुटते. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. अर्थात जगभरातल्या संस्कृतीच्या पाऊलखुणा अशाच बदलत जातात याला इतिहास साक्षीदार असतो. समाजातील प्रबळ वर्गाची संस्कृती आणि भाषा इतरांना नाईलाजानं स्वीकारायला लागते. बैलपोळ्यासारखे सण आणि कित्येक उत्सव आता केवळ आठवणी बनून राहिलेत. शेती-शेतकऱ्यांच्या आयुष्यात आजच्याइतका अंधार कधीही नव्हता. शेतामातीची आजच्या इतकी परवड नव्हती झाली. कृषी संस्कृती सुखात नांदत होती. काळाच्या उदरात सगळं कुठंतरी गुडूप झालंय. पूर्वसंचित बनून राहिलंय. केवळ स्मरण रंजनापुरतं... हे सारं आठवलं की मन पाखरू होतं. भूतकाळात विहार करत राहतं. आईबापाच्या आठवणी भोवतीनं फेर धरुन नाचू लागतात... काळजात वेदनेची कळ उठते. मन व्याकूळ होतं. दरवर्षी पोळा येतो डोळे ओले होतात.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com