Sustainable Agriculture: तामिळनाडू राज्यातील पल्लपट्टी येथील सरोजा कुमार यांनी सुमारे दहा एकरांत नंदवनम हे नैसर्गिक शेतीचे मॉडेल विकसित केले आहे. कमी पाऊस, वाढते तापमान, पाणीटंचाई आदी प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी सुमारे पाच हजारांहून अधिक झाडांची, पिकांची विविधता तयार केली आहे. जोडीला शेतमालाचे मूल्यवर्धन करून उत्पन्नाचा स्रोतही तयार केला आहे. .तामिळनाडू राज्यात करूर जिल्ह्यात पल्लपट्टी हे गाव आहे. येथील सरोजा कुमार यांना लहानपणापासूनच शेतीची आवड होती. शेतात फेरफटका मारणे, तेथील कामकाज समजून घेण्यात त्यांना रस वाटायचा. महाविद्यालयीन जीवनात इंग्रजी साहित्य विषयात पदवी आणि रुग्णालय व्यवस्थापनात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. दरम्यानच्या काळात निसर्ग संवर्धन, सेंद्रिय शेती व जैवविविधता क्षेत्रातील विविध उपक्रमांत सहभाग नोंदविला. .Sustainable Farming : नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक तरतुदींसाठी प्रयत्न करू.विवाहानंतर मुलांचे संगोपन आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये त्या व्यग्र झाल्या. सासरची दहा एकर शेती होती. पती टिंबर व्यवसाय पाहायचे. प्रापंचिक जबाबदाऱ्यांमुळे सरोजा कुमार यांना आपल्या शेतीकडे म्हणावा तेवढा वेळ देता आला नाही. मात्र मुले शिक्षणासाठी वसतिगृहात गेल्यानंतर त्यांनी त्याकडे पूर्ण लक्ष देण्यास सुरूवात केली. मजूररटंचाई, वाढता उत्पादनखर्च, पाण्याच्या मर्यादा या समस्या होत्या. अशावेळी एकाच पिकावर अवलंबून राहण्याऐवजी बहुविध पीक पद्धती व त्यास फळझाडांची जोड दिल्यास ते फायदेशीर ठरेल असा विचार त्यांनी केला..नैसर्गिक शेतीला दिले प्राधान्यसन २०११ मध्ये तमिळनाडूतील ज्येष्ठ पर्यावरणवादी कृषितज्ज्ञ डॉ. जी. नम्माळवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण घेतले. नैसर्गिक शेतीचे प्रणेते मासानोबू फुकुओका यांच्या ‘द वन-स्ट्रॉ रिव्होल्युशन’ या पुस्तकातूनही प्रेरणा मिळाली. निसर्गाच्या प्रक्रिया समजून घेणे, जमिनीची सुपीकता टिकविणे आणि अनावश्यक मानवी हस्तक्षेप कमी करणे ही त्यांच्या शेतीची प्रमुख सूत्रे बनली. सन २०१२ मध्ये अर्ध्या एकरात शेवगा आणि वांग्यांची लागवड करून शेतीचा श्रीगणेशा झाला. .पुढे टोमॅटो, भेंडी, चवळी, घेवडा, एरंडी आदींचाही प्रयोगांत समावेश झाला. उन्हाळ्यात विहिरीतील पाणी कमी पडू लागल्याने झाडे जगविण्यासाठी स्वतः पाणी वाहून न्यावे लागले. पुढे सुमारे तीन लाख रुपये खर्चून पाण्याची टाकी उभारली. सन २०१५ मधील दुष्काळात झाडे जगविणे हेच मोठे आव्हान ठरले. अनेकवेळा प्रयोग थांबविण्याचा विचार मनात आला; मात्र आपले मनोधैर्य खचू दिले नाही. प्रयत्न अधिक जोमाने सुरू ठेवले. हळूहळू अर्ध्या एकरावरील प्रयोगाचे रूपांतर दहा एकरांहून अधिक क्षेत्रावर झाले. नंदवनम (नंदनवन) असे त्याचे नामकरण केले आहे. यात पाच हजारांहून अधिक झाडे आहेत. आवळा, जांभूळ, मोह, केळी, चिकू, डाळिंब, अंजीर, पेरू, तुती, बोर, करवंद, शेवगा, कढीपत्ता आदींच्या स्वरूपात पिकांची विविधता जपली आहे. नारळाची सुमारे १०० तर नोनीची २०० हून अधिक झाडे आहेत. उडीद, मूग, तूर, भुईमूग, एरंडी आणि भाजीपालाही आहे. वनस्पतींच्या वाढीसाठी जागा उपलब्ध करून देताना शेतीची रचना स्थानिक हवामान आणि पाण्याच्या उपलब्धतेशी जुळवून घेतली आहे..अन्नसाखळी जपणारी शेती‘नंदवनम’मध्ये प्रवेश केल्यावर उंच झाडांमधून झिरपणारा सूर्यप्रकाश, पक्षांची किलबिल, पानांची सळसळ जाणवते. झाडांखाली वाळलेल्या फांद्या, पालापाचोळ्याचे आच्छादन दिसते. त्यामुळे जमिनीतील ओलावा टिकण्यास मदत होते. या अवशेषांचे नैसर्गिक खत जमिनीला मिळते. गांडुळे, लाभदायक सूक्ष्मजिवांची मातीतील संख्या वाढण्यास मदत होते. त्यामुळे नांगरणी विरहित शेतीला त्यांनी प्राधान्य दिले आहे. उंच, मध्यम उंचीची फळझाडे, झुडुपे आणि जमिनीलगत वाढणाऱ्या वनस्पती अशा विविध थरांमुळे उपलब्ध जागेचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग होतो. .काही झाडे सावली देतात तर काहींची फुले परागीभवन करणाऱ्या कीटकांना आकर्षित करतात. फळे आणि बियांमुळे पक्षांना अन्न मिळते. मानवी प्रयत्नांबरोबर निसर्गातील प्राणीमात्रांचाहीचा नंदवनममध्ये सहभाग आहे. मोर, पोपट, वटवाघळे, वनमांजरे, विविध कीटक आणि फुलपाखरे यांचा परिसरात वावर आहे. हे सर्व घटक अन्नसाखळीत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे एखाद्या कीटकाला उपद्रवी न समजता त्याची परिसंस्थेतील भूमिका ओळखण्याचा प्रयत्न सरोजा करतात. लालसर, चुनखडीची माती आणि काही ठिकाणी क्षारयुक्त पाण्याच्या अडचणी असतानाही त्यावर मात करण्याचा प्रयत्न केला आहे..प्रक्रियेद्वारे वाढवले उत्पन्नाचे स्रोतनंदवनममधील काही शेतमालावर प्रक्रिया देखील केली आहे. यात शेवगा बियांचे तेल, शेवगा पावडर, एरंडेल तेल, नारळाचे तेल, नोनीचा रस आणि सिरप, आवळा पावडर तसेच खोबऱ्याच्या तेलापासून साबण अशी विविध उत्पादने तयार केली जातात. डाळिंबाच्या सुकविलेल्या फुलांपासूनही उत्पादने बनविण्याचा प्रयत्न आहे. मोठ्या प्रमाणावर घाऊक विक्री करण्यापेक्षा मर्यादित प्रमाणात निर्मिती करून थेट ग्राहकांना उत्पादने पुरवण्यावर भर आहे..Natural Farming: एकाच दिवशी एक लाख लिटर जिवामृत निर्मिती.शेवग्याच्या तेलाची पाच हजार रुपये प्रति लिटर दराने विक्री होते. नंदवनमतून दरमहा सुमारे एक लाख रुपयांची उलाढाल होते. शेतीची देखभाल करण्यापासून ते प्रक्रिया, पॅकिंग आणि विक्री या प्रक्रियेपर्यंत मोठ्या प्रमाणावर श्रमांची गरज भासते..अन्य शेतकऱ्यांना प्रेरणासरोजा यांची प्रेरणा घेऊन कर्नाटक राज्यातील शोभा शिवण्णा यांनीही एक एकरांत नंदवनमचा प्रयोग सुरू केला. पुढे तीन एकरांपर्यंत त्याचा विस्तार केला. त्यांनीही सेंद्रिय खतनिर्मिती, मूल्यवर्धित उत्पादनांच्या विक्रीतून शेतीला पूरक उत्पन्नाचा मार्ग तयार केला आहे. परिसरातील काही शेतकरी देखील शेवग्यापासून विविध उत्पादने तयार करून विक्री करू लागले आहेत. काहींनी या क्षेत्रात त्यांच्यापेक्षाही मोठा व्यवसाय उभा केला आहे. .आपल्या प्रयोगातून मिळालेला अनुभव इतरांपर्यंत पोहोचविणे आणि निसर्गसंवर्धनाचा विचार रुजविणे हा त्यांच्या कामाचा महत्त्वाचा भाग आहे. नंदवनमला अनेक शेतकरी, अधिकारी, अभ्यासक, विद्यार्थी आणि निसर्गप्रेमींनी भेटी देत या प्रयोगाची माहिती घेत असतात. विविध गावांनी देखील प्रेरणा घेत नैसर्गिक शेती, जैवविविधता संवर्धन आणि शेतीमाल मूल्यवर्धन यांसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सरोजा सध्या ऊटीपासून चेन्नईपर्यंतच्या १०० दिवसांच्या जनजागृती प्रवासात सहभागी झाल्या आहेत. विविध शेतांना भेटी देण्यासह निसर्ग संवर्धन आणि शाश्वत शेतीचा संदेश पोचविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे..‘हे जंगल म्हणजे माझे स्वातंत्र्य’सरोजा यांच्यासाठी नंदवनम केवळ उत्पन्नाचे साधन नाही. कुटुंबाची अन्नसुरक्षाही त्यातून साध्य झाली आहे. मातीच आपल्याला पोसते. त्यात काम करताना माझा रंग बदलतो. हे जंगल माझ्यासाठी केवळ शेत नाही. हे माझे स्वातंत्र्य आहे असे सरोजा सांगतात. .हवामान बदल, वाढते तापमान, पाणीटंचाई आदींच्या पार्श्वभूमीवर करूरच्या जमिनीवर फुललेले नंदवनम शेतीकडे पाहण्याचा सकारात्मक व आशावादी दृष्टिकोन देते. सरोजा यांना त्यांच्या या कार्याबद्दल महिला किसान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.सरोजा कुमार९४८९४३४५५१.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.