Mumbai News : महाभ्रष्ट महायुती सरकारच्या अनागोंदी कारभारावर ‘कॅग’ने गंभीर ताशेरे ओढल्याने सरकारच्या मोठमोठ्या दाव्यातील हवा निघाली आहे. राज्यावरचा ८ लाख कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर चिंताजनक असून, पुरवणी मागण्या व कर्जाचे सरकार समर्थन करत असले, तरी ‘कॅग’ने सरकारला इशारा दिला आहे, तसाच इशारा विरोधी पक्षांनी महाभ्रष्टयुती सरकारला दिला होता. परंतु विरोधकांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून आपल्याच मस्तीत असलेल्या सरकारला ‘कॅग’ने चपराक लगावली आहे.
‘कॅग’ने राज्याच्या आर्थिक बेशिस्तीवरच बोट ठेवले आहे. महायुती सरकारने राज्याला दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचवले आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
‘कॅग’च्या अहवालावर प्रतिक्रिया देताना श्री. पटोले म्हणाले, की तीन पक्षांचे महायुती सरकार सत्तेत आल्यापासून सर्वच विभागांत भ्रष्टाचार बोकाळला आहे. ‘टेंडर घ्या, कमिशन द्या’ या धोरणानुसार कंत्राटदार मित्रांचे खिसे भरण्यासाठी हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू केले, पण त्यातून राज्याचे भले होण्यापेक्षा सरकारच्या मित्रांचेच भले झाले.
मागील दोन वर्षांत या सरकारने तब्बल २.५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज काढल्याने राज्यावर ८ लाख कोटी रुपयांचे कर्ज झाले आहे. कर्जाचे हे प्रमाण राजकोशीय स्थूल उत्पन्नाच्या १८.७३ टक्के आहे. राजकोशीय कायद्यातील तरतुदीपेक्षा हे प्रमाण जास्त आहे. महसुली जमा आणि खर्च यांच्यात तफावत आहे.
अर्थसंकल्पात तरतूद केलेला निधी खर्च होत नसतानाही कोट्यवधी रुपयांच्या पुरवण्या मागण्या सादर करण्यात आल्या. अंतरिम अर्थसंकल्प सादर केल्यानंतर लगेच ९४ हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या मंजूर करून घेतल्या. पुरवणी मागण्यांवर सरकारला सभागृहातच जाब विचारणार होतो. पण सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घालून, चर्चेविना बहुमताच्या जोरावर मागण्या मंजूर करून घेतल्या.
महाराष्ट्र कोषागार नियमावलीनुसार सर्व विभागाने आपले खर्च व जमा यांचा महालेखाकार कार्यालयातील लेखांमध्ये नोंद केलेल्या खर्चाशी ताळमेळ घेणे आवश्यक आहे. पण राज्य शासनाने एकूण खर्चाच्या १४.२० टक्के आणि जमेच्या २.२२ टक्के रकमांचा ताळमेळच केलेला नाही. यातून असे निदर्शनास आले, की ३४४०.७० कोटींच्या रकमा महसूल विभागाऐवजी भांडवली विभागात चुकीच्या अर्थसंकल्पीत करून मांडलेल्या आहेत. २०२३ मध्ये महसुली खर्च ४ लाख ७ हजार ६१४.४० कोटी केला, असेही श्री. पटोले म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.