Pune News : काहीच दिवसांपूर्वी राज्यात लोकसभा निवडणूक पार पडली. यात मोदींच्या नेतृत्वातील भाजपला राज्यात मोठे यश मिळवता आले नाही. महायुतीला महाविकास आघाडीने रोखले. यानंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले असून सर्वच राजकीय पक्ष विधानसभेच्या तयारील लागले आहेत. यादरम्यान माकपच्या शिष्टमंडळाने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची सोमवारी (ता.२४) भेट घेतली. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसह शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत ज्येष्ठ नेते नरसय्या आडम व उदय नारकर यांच्या नेतृत्वात ही भेट घेण्यात आली. शिष्टमंडळात आमदार विनोद निकोले, माजी आमदार जे.पी.गावीत, डॉ. डी.एल.कऱ्हाड, डॉ. अजित नवले, शैलेंद्र कांबळे, किरण गहला यांचा समावेश होता.
राज्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला माकपने भरीव साथ दिली. त्याच पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत माकपला योग्य न्याय मिळावा अशी मागणी शिष्टमंडळाने पटोले यांच्याकडे केली आहे. तर माकपने विधानसभेला १२ जागांची मागणीचा प्रस्ताव पटोले यांच्याकडे दिला आहे.
तर याआधी माकपने असाच प्रस्ताव मागील आठवड्यात शरद पवार यांनाही दिला असून लवकरच उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली जाणार असल्याचे शिष्टमंडळाने म्हटले आहे. तर डहाणू, कळवण, नाशिक (पश्चिम), सोलापूर (मध्य) व अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, यासह १२ विधानसभा मतदार संघात लढण्याची तयारी सुरू केल्याची माहिती देखील माकपने दिली आहे.
तसेच राज्यात दुधाचा व कर्जमाफीचा प्रश्न ऐरणीवर आला असून २८ जून पासून विविध संघटना दुधाच्या प्रश्नावरून रस्त्यावर उतरले आहेत. याचदरम्यान राज्यातील आशा सेविका, अंगणवाडी सेविका, शालेय पोषण आहार कर्मचारी, बांधकाम कामगार यांचे देखील विविध प्रश्नावरून आंदोलने होत आहेत. त्यावरून माकप व जन संघटना रणांगणात उतरत आहेत. आगामी अधिवेशनात श्रमिकांचे हे प्रश्न केंद्रस्थानी आणावेत अशी आग्रहाची भूमिका माकपच्या शिष्टमंडळाने यावेळी नाना पटोले यांच्याकडे लावून धरल्याचेही शिष्टमंडळाने म्हटले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.