Amravati APMC Election News : बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी व्यापारी- अडते मतदारसंघाच्या मतदार यादीत अपात्र मतदारांची (APMC Voter) नावे समाविष्ट करण्यात आल्याचा प्रकार समोर येऊ लागला आहे.
तीन ते पाच वर्षांपूर्वीच्या व यादीतून (Voter List) बाद असलेल्या परवान्यांचे नूतनीकरण करून ती नावे मतदार म्हणून समाविष्ट करण्यात आली आहेत. माजी संचालकांनी नियमाचे उल्लंघन करून ही नावे समाविष्ट केल्याचा आक्षेप आहे.
उच्च न्यायालयाने बाजार समितीच्या निवडणुका (APMC Election) ३० एप्रिलपर्यंत घेण्याचे निर्देश राज्य सहकारी प्राधिकरणास दिले आहेत. यापूर्वी प्राधिकरणाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार मतदार यादी तयार करण्यात आली होती.
मात्र त्यामध्ये ग्रामपंचायत व सेवा सहकारी संस्थांच्या नवनिर्वाचित सदस्यांना मताधिकार मिळाला नव्हता. यासंदर्भात उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल झाली होती.
त्यावर निर्णय देताना न्यायालयाने नवीन सदस्यांची नावे समाविष्ट करून मतदार यादी नव्याने तयार करण्याचे निर्देश दिले होते. या यादीचे काम सुरू झाले असून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने बाजार समितीकडून माहिती मागविली आहे.
दरम्यान अडते व व्यापारी मतदारसंघातून निवडून द्यावयाच्या दोन संचालकांसाठी अमरावती बाजार समितीने मतदार यादी तयार केली आहे. या यादीत अपात्र मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत, असे आरोप होऊ लागले आहेत.
तीन ते पाच वर्षांपासून ज्या अडते व व्यापाऱ्यांनी त्यांच्या परवान्यांचे नूतनीकरणच केलेले नाही त्यांचे परवाने काही माजी संचालकांनी विलंब शुल्क व दंड भरून काढली आहेत.
ज्या अडते किंवा व्यापाऱ्यांनी नियमित परवाना शुल्क भरले व सलग दोन वर्षे निर्धारित मुदतीत नूतनीकरण केले आहे तेच मतदार म्हणून पात्र ठरतात. हा नियम डावलून मुदतीनंतर जुन्या परवान्यांचे नूतनीकरण करून त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत.
अमरावती बाजार समितीत अशी जवळपास तीनशे नावे समाविष्ट करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे या संदर्भात तक्रार करण्याची तयारी काही व्यापारी व अडत्यांनी केली आहे. अपात्र मतदारांची नावे वगळण्याची मागणी त्यांनी केली आहे.
बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी मतदार यादी संदर्भात माहिती मागितली आहे. न्यायालयीन कामासाठी माहिती हवी असल्याचे कारण त्यांनी यासाठी दिले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.