डॉ. सचिन मांडवगणेRural Economy: विविध अभ्यासांनुसार भारतात फळे आणि भाजीपाल्याचे ३० ते ४० टक्के उत्पादन विविध टप्प्यांवर वाया जाते. हे नुकसान केवळ फळभाज्यांचे नसते. त्यामध्ये पाणी, जमीन, ऊर्जा, श्रम आणि पोषक घटक यांचाही अपव्यय दडलेला असतो. त्यामुळे या नुकसानीकडे केवळ कचरा म्हणून न पाहता त्यामध्ये दडलेल्या मूल्याकडे पाहण्याची गरज आहे. याच विचारातून ‘ग्रीन बायोरिफायनरी’ ही संकल्पना उदयास आली..हरितक्रांतीने भारताला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवले. त्यानंतर फळे आणि भाजीपाल्याच्या उत्पादनातही देशाने मोठी झेप घेतली. आज भारत हा जगातील प्रमुख फळे व भाजीपाला उत्पादक देशांपैकी एक आहे. मात्र उत्पादन वाढले तशी एक नवी समस्या निर्माण झाली ती म्हणजे उत्पादनोत्तर नुकसान. शेतातून निघालेली प्रत्येक फळभाजी ग्राहकांपर्यंत पोहोचत नाही. काही फळे झाडाखाली पडतात, काही आकारमानामुळे बाजारात नाकारली जातात, काही वाहतुकीत खराब होतात, तर काही बाजारात विक्री अभावी उरतात. .Brown Biorefinery: ‘ब्राउन बायोरिफायनरी’तून कृषी अवशेषांचे मूल्यवर्धन.विविध अभ्यासांनुसार भारतात फळे आणि भाजीपाल्याचे ३० ते ४० टक्के उत्पादन विविध टप्प्यांवर वाया जाते. हे नुकसान केवळ फळभाज्यांचे नसते. त्यामध्ये पाणी, जमीन, ऊर्जा, श्रम आणि पोषक घटक यांचाही अपव्यय दडलेला असतो. त्यामुळे या नुकसानीकडे केवळ कचरा म्हणून न पाहता त्यामध्ये दडलेल्या मूल्याकडे पाहण्याची गरज आहे. याच विचारातून ‘ग्रीन बायोरिफायनरी’ ही संकल्पना उदयास आली. मागील लेखात आपण ‘ब्राऊन बायोरिफायनरी’च्या माध्यमातून पिकांच्या अवशेषांमधील मूल्य समजून घेतले. आजच्या लेखात आपण फळे, भाजीपाला आणि बागायती पिकांमधून निर्माण होणाऱ्या हिरव्या जैवसंपत्तीची रचना, त्यातील आव्हाने आणि औद्योगिक क्षमता समजून घेणार आहोत..हिरवी जैवसंपत्तीशेतीमध्ये निर्माण होणाऱ्या सर्व प्रकारच्या फळभाज्या, त्यातील नाकारलेले उत्पादन, पडलेली फळे, प्रक्रिया उद्योगातील अवशेष, साली, गर, बिया आणि बाजारातील उरलेला माल यांना एकत्रितपणे हिरवी जैवसंपत्ती म्हणता येईल. ब्राऊन जैवसंपत्ती आणि हिरवी जैवसंपत्ती यांच्यात मूलभूत फरक आहे. काडीकचरा, पेंढा आणि पिकांचे अवशेष यामध्ये सेल्युलोज, हेमिसेल्युलोज आणि लिग्निन यांचे प्रमाण जास्त असते. याउलट फळभाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण ७० ते ९५ टक्क्यांपर्यंत असते. त्यामध्ये नैसर्गिक साखर, पेक्टीन, सेंद्रिय आम्ले, रंगद्रव्ये, पॉलीफेनॉल्स, जीवनसत्त्वे आणि विविध जैवसक्रिय संयुगे मोठ्या प्रमाणात आढळतात. याच घटकांमुळे आज कचरा समजली जाणारी हिरवी जैवसंपत्ती अनेक उद्योगांसाठी मौल्यवान कच्चा माल ठरू शकते..हिरव्या जैवसंपत्तीतील मूल्यनिर्मितीची आव्हानेहिरव्या जैवसंपत्तीमध्ये मूल्यनिर्मितीच्या मोठ्या संधी असल्या तरी काही मूलभूत आव्हानेही आहेत. ब्राऊन जैवसंपत्तीमध्ये उच्च कार्बन-नायट्रोजन गुणोत्तर आणि कमी घनता ही प्रमुख अडचण असते, तर हिरव्या जैवसंपत्तीमध्ये ७० ते ९५ टक्क्यांपर्यंत असलेले आर्द्रतेचे प्रमाण हे सर्वात मोठे आव्हान आहे..उच्च आर्द्रतेमुळे फळे आणि भाजीपाला अत्यंत नाशवंत बनतात. त्यामधील नैसर्गिक साखर आणि पोषक घटकांमुळे सूक्ष्मजीवांची वाढ वेगाने होते आणि उत्पादनाची गुणवत्ता झपाट्याने घसरू लागते. याशिवाय वाहतुकीचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढतो. उदाहरणार्थ, एका टन हिरव्या जैवसंपत्तीची वाहतूक करणे म्हणजे प्रत्यक्षात ७०० ते ९५० लिटर पाण्याची वाहतूक करण्यासारखे आहे. परिणामी, कमी मूल्याच्या कच्च्या मालाची लांब अंतरावर वाहतूक आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य राहत नाही. त्यामुळे हिरव्या जैवसंपत्तीचे संकलन करून दूरच्या प्रक्रिया केंद्रात नेण्याऐवजी शेतस्तरावर किंवा गावपातळीवर प्राथमिक प्रक्रिया करणे आवश्यक ठरते..स्वच्छता, वर्गीकरण, पल्पीकरण, रस निष्कर्षण, निर्जलीकरण आणि गुणवत्तास्थिरीकरण यांसारख्या प्राथमिक प्रक्रिया वेळेत केल्यास मूल्यवान घटकांचे संरक्षण करता येते आणि पुढील मूल्यवर्धन अधिक परिणामकारकपणे करता येते. त्यामुळे ग्रीन बायोरिफायनरीमध्ये तंत्रज्ञानाइतकीच महत्त्वाची बाब म्हणजे शेताजवळील प्राथमिक प्रक्रिया व्यवस्था होय..हिरव्या जैवसंपत्तीमधील महत्त्वाचे घटकसाखर : जैवतंत्रज्ञान उद्योगाचे इंधनफळांमध्ये आढळणारी नैसर्गिक साखर ही हिरव्या जैवसंपत्तीची सर्वात महत्त्वाची संपत्ती आहे. ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि सुक्रोज या स्वरूपातील साखर विविध फळांमध्ये मुबलक प्रमाणात आढळते.साखर सूक्ष्मजीवांसाठी अन्न म्हणून काम करते. विविध जैवतंत्रज्ञान प्रक्रियांमध्ये याच साखरेपासून सेंद्रिय आम्ले, जैवइंधने, बायोस्टिम्युलंट्स आणि इतर मूल्यवर्धित उत्पादने तयार केली जातात. हिरव्या जैवसंपत्तीतील साखर ही जैवतंत्रज्ञान उद्योगाचे ऊर्जा चलन आहे..पेक्टीन : फळांच्या पेशींना जोडणारा नैसर्गिक डिंकसंत्री, मोसंबी, डाळिंब, पेरू आणि आंब्याच्या सालींमध्ये पेक्टीन हा महत्त्वाचा घटक आढळतो. वनस्पतींमध्ये हा पदार्थ पेशींना एकत्र जोडून ठेवण्याचे काम करतो.जॅम आणि जेली बनविताना मिश्रणाला घट्टपणा आणण्यासाठी पेक्टीनचा वापर केला जातो. अन्न प्रक्रिया उद्योग, औषधनिर्मिती आणि विशेष खाद्यपदार्थांमध्ये यास मोठी मागणी आहे.आज अनेक देश फळांच्या सालींपासून मोठ्या प्रमाणावर पेक्टीन तयार करून निर्यात करतात. त्यामुळे सालींना कचरा समजण्याऐवजी त्यांच्याकडे संसाधन म्हणून पाहणे आवश्यक आहे..पॉलीफेनॉल्स : वनस्पतींची नैसर्गिक संरक्षणव्यवस्थावनस्पती स्वतःचे संरक्षण करण्यासाठी विविध जैवसक्रिय संयुगे तयार करतात. त्यामध्ये पॉलीफेनॉल्स हा अत्यंत महत्त्वाचा समूह आहे.फळांच्या साली, बिया आणि इतर वनस्पती भागांमध्ये पॉलीफेनॉल्स मोठ्या प्रमाणात आढळतात. हे घटक अँटिऑक्सिडंट म्हणून कार्य करतात. आज न्यूट्रास्युटिकल्स, आरोग्यपूरक उत्पादने आणि नैसर्गिक अन्नघटकांच्या बाजारपेठेत त्यांना मोठी मागणी आहे.सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, पॉलीफेनॉल्स म्हणजे वनस्पतींची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती..बिया : दुर्लक्षित पण मौल्यवान संपत्तीफळप्रक्रिया उद्योगात किंवा बाजारात अनेकदा बिया कचरा म्हणून फेकून दिल्या जातात. मात्र अनेक बियांमध्ये उच्च मूल्याचे जैवसक्रिय घटक आढळतात. उदाहरणार्थ, चिकू आणि चिंचेच्या बियांमध्ये झायलो-ऑलिगोसेकेराइड्स (XOS) तयार करण्यासाठी उपयुक्त पॉलीसॅकराइड्स आढळतात.झायलो-ऑलिगोसेकेराइड्स हे एक महत्त्वाचे प्रीबायोटिक असून ते आतड्यातील उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या वाढीस चालना देतात. त्यामुळे त्यांचा कार्यक्षम अन्नपदार्थ, न्यूट्रास्युटिकल्स आणि आरोग्यपूरक उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागला आहे. आज कचरा मानल्या जाणाऱ्या या बिया भविष्यात आरोग्यवर्धक अन्नघटकांच्या उद्योगासाठी महत्त्वाचा कच्चा माल ठरू शकतात..रंगद्रव्ये : निसर्गाने दिलेले रंगफळे आणि भाज्यांचे आकर्षक रंग ही केवळ सौंदर्याची बाब नाही. त्या रंगांमागे अनेक उपयुक्त संयुगे दडलेली असतात.टोमॅटोमध्ये लायकोपीन, बीटमध्ये बेटालेन्स, जांभूळ आणि काळ्या द्राक्षांमध्ये अँथोसायनिन्स तर हिरव्या पालेभाज्यांमध्ये क्लोरोफिल आढळते. लाल मिरचीमध्ये कॅप्सॅन्थिन आणि कॅप्सोरुबिन ही नैसर्गिक रंगद्रव्ये आढळतात.अन्न उद्योगामध्ये कृत्रिम रंगांऐवजी नैसर्गिक रंग वापरण्याचा कल वाढत आहे. त्यामुळे अशा रंगद्रव्यांना भविष्यात अधिक महत्त्व प्राप्त होणार आहे..Post Harvest Management: मिनिमल प्रोसेसिंग : शेतीमाल प्रक्रियेतील नवी संकल्पना .सुगंधी तेल : सुगंधातील संपत्तीसंत्री, मोसंबी, लिंबू आणि इतर लिंबूवर्गीय फळांच्या सालींमध्ये सुगंधी तेले आढळतात. संत्र्याच्या सालीत आढळणारे लिमोनीन हे त्यातील प्रमुख संयुग आहे. हे तेल सुगंध उद्योग, सौंदर्यप्रसाधने, स्वच्छता उत्पादने, अन्न उद्योग आणि औषध उद्योगामध्ये वापरले जाते. आपण अनेकदा संत्र्याची साल कचऱ्यात टाकतो; परंतु त्याच सालीमध्ये उच्च मूल्याचे सुगंधी तेल दडलेले असते..सेंद्रिय आम्ले : चवीमागील विज्ञानफळांमधील आंबटपणा हा सेंद्रिय आम्लांमुळे निर्माण होतो. संत्रे आणि मोसंबीमध्ये सायट्रिक आम्ल, सफरचंदामध्ये मॅलिक आम्ल तर द्राक्षांमध्ये टार्टरिक आम्ल आढळते.अन्न संरक्षण, प्रक्रिया उद्योग आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रात या आम्लांचे महत्त्व मोठे आहे. अनेक औद्योगिक प्रक्रिया याच नैसर्गिक आम्लांवर आधारित असतात..आहारतंतू : आरोग्य आणि मूल्यनिर्मितीफळांच्या साली, गर आणि प्रक्रिया उद्योगातील अवशेषांमध्ये मोठ्या प्रमाणात आहारतंतू आढळतात. हे तंतू मानवी आरोग्यासाठी उपयुक्त आहेतच; शिवाय पशुखाद्य, फंक्शनल फूड्स आणि जैविक उत्पादनांसाठीही वापरले जाऊ शकतात.आज अनेक अन्न उद्योग फळप्रक्रिया अवशेषांपासून उच्च मूल्याचे फायबर उत्पादन तयार करत आहेत..सूक्ष्मपोषक घटक आणि जैवसक्रिय संयुगेफळे आणि भाज्या ही जीवनसत्त्वे, खनिजे आणि विविध जैवसक्रिय घटकांची नैसर्गिक भांडारे आहेत. उत्पादन बाजारात नाकारले गेले म्हणून त्यातील पोषणमूल्य नष्ट होत नाही. म्हणूनच नाकारलेल्या फळभाज्यांमध्येही मूल्यनिर्मितीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत..हिरव्या जैवसंपत्तीतील लपलेले उद्योगहिरव्या जैवसंपत्तीतील प्रत्येक घटक एखाद्या उद्योगाचा पाया बनू शकतो. साखरेपासून जैवतंत्रज्ञान उद्योग, पेक्टीनपासून अन्न उद्योग, आवश्यक तेलांपासून सुगंध उद्योग, पॉलीफेनॉल्सपासून न्यूट्रास्युटिकल्स, रंगद्रव्यांपासून नैसर्गिक रंग उद्योग आणि फायबरपासून पशुखाद्य व फंक्शनल फूड्स तयार होऊ शकतात. यामुळे शेतात निर्माण होणाऱ्या प्रत्येक फळभाजीकडे केवळ विक्रीयोग्य उत्पादन म्हणून नव्हे तर संभाव्य औद्योगिक कच्चा माल म्हणून पाहण्याची गरज आहे..मॅग्नेट प्रकल्पफळे आणि भाजीपाल्याचे उत्पादनोत्तर नुकसान कमी करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हे मॅग्नेट प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. विविध फळे आणि भाजीपाला पिकांसाठी मूल्यवर्धित उत्पादने विकसित करणे आणि त्यासाठी आवश्यक पुरवठा साखळी अधिक सक्षम करणे यावर या प्रकल्पाचा भर आहे..ग्रीन बायोरिफायनरीमूल्यवर्धनाच्या प्रत्येक टप्प्यावर निर्माण होणारे गर, साली, बिया आणि इतर उपउत्पादने यांच्यातील मूल्य ग्रीन बायोरिफायनरीतून शोधता येते. म्हणजेच, मुख्य उत्पादनातून मूल्यनिर्मिती करण्याबरोबरच त्या प्रक्रियेत निर्माण होणाऱ्या अवशेषांमधूनही अतिरिक्त मूल्य निर्माण करणे. अशा प्रकारे उत्पादनोत्तर नुकसान कमी करणे, मूल्यवर्धन वाढवणे आणि उपप्रवाहांचे पुनर्मूल्यांकन करणे यांना जोडणारी परिपूर्ण मूल्यसाखळी उभारणे हे ग्रीन बायोरिफायनरीचे अंतिम उद्दिष्ट आहे..भविष्याची दिशाकृषी क्षेत्रात उत्पादकतेची व्याख्या बदलत आहे. भविष्यात केवळ विक्रीयोग्य उत्पादन नव्हे, तर नाकारलेले उत्पादन, प्रक्रिया उद्योगातील अवशेष आणि बाजारातील उरलेला माल यांच्यातून निर्माण होणारे मूल्यही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.ब्राऊन बायोरिफायनरीने काडीकचऱ्याकडे संसाधन म्हणून पाहायला शिकवले; ग्रीन बायोरिफायनरी फळभाज्यांच्या नुकसानीकडे संसाधन म्हणून पाहायला शिकवते. पुढील भागात आपण बटाटा, संत्रे आणि डाळिंब यांवर आधारित ग्रीन बायोरिफायनरीची प्रत्यक्ष उदाहरणे आणि त्यातून शेतकऱ्यांसाठी निर्माण होणाऱ्या नव्या उत्पन्नाच्या संधी पाहणार आहोत.- प्रफुल्ल दाढे, ९०२८३ ८६७९८- आदित्य पोटोडे, ९८३४९ ०२३५०swaha@vnit.ac.in(लेखक विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (व्हीएनआयटी), नागपूर येथील ‘स्वाहा सेंटर ऑफ एक्सलन्स’चे केंद्र प्रमुख आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.