Nagaland Culture : नागालँड म्हटलं की समोर येते ती चालती बोलती लिपी. कला, लोककथा, मिथकं आणि इतिहास यांचा मिलाफ म्हणजे आजचा नागालँड! या निसर्गसंपन्न प्रदेशातील लोक दररोजच्या जीवनात आजही निसर्गाशी समरूप असे जीवन जगत आहेत. सध्या देशभर विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा विध्वंस करत जो बट्ट्याबोळ सुरू आहे, तो पाहता नागालॅंडमधील लोकांचं जगणं हे विशेष आहे.
इथली शांत संयमी शेतकरी माणसं जगाला विविधतेत एकतेचा सांगावा देणारी आहेत. ते आजही परंपरेचा डोलारा कुठलीही तमा न बाळगता, आनंदाने जगत दिमाखात सांभाळत आहे. ते सगळे सण सर्वाना सोबत घेऊन साजरे करतात. तसेच इथल्या वेगवेगळ्या जमातींच्या विविध भाषा, सांस्कृतिक आक्रमणात आजही टिकून आहेत, जिवंत आहेत, हे थोर म्हणावे लागेल.
इथल्या प्रत्येक जमातीची जीवनशैली म्हणजे खरं तर जादू आहे. त्यांची शेतीशी नाळ अजूनही घट्ट आहे. कृषी संस्कृतीशी निगडित अनेक परंपरा नागा समाजातील १६ महत्त्वाच्या जमातींमध्ये आजही पाळल्या जात आहेत. आजही इंग्रजी शाळेत शिक्षण घेणाऱ्या नागा पिढ्या कुठलाही संकोच न बाळगता हे सगळं आनंदाने निभावतात, हे विशेष. सुगी झाल्यावर आणि सणासुदीच्या अगोदर गावातल्या स्वच्छतेला इथं अग्रक्रम दिला जातो. त्यात सार्वजनिक विहिरी, रस्ते यांची सफाई केली जाते आणि मग सणासुदीच्या वेळी पारंपरिक नाच, गाणी आणि मेजवानीची लयलूट असते.
इथल्या सरकारने राज्यातील विविध आदिवासी परंपरांचे प्रदर्शन भरवून जगभरातल्या नागरिकांना याचा आनंद घेता यावा यासाठी हॉर्नबिल फेस्टिव्हल सन २००० मध्ये पहिल्यांदा सुरू केला. हॉर्नबिल म्हणजे धनेश. नागा संस्कृतीत मोठे महत्त्व असलेल्या या पक्ष्याचे नाव या सणाला देण्याचा उद्देश देखील अनोखा आहे. सगळ्या आदिवासी समुहांच्या वेगवेगळ्या परंपरा आजही गावोगावी साजऱ्या होता असतात. त्याचं अनोखं प्रदर्शन इथं अनोख्या उत्साहात पार पडतं. अनेक चालीरीती, परंपरा या फेस्टिव्हलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दरवर्षी १ ते १० डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या या फेस्टिव्हलला जगभरातून लोक हजेरी लावतात.
तुम्हाला माहिती असेलच की भारतीय राज्यघटनेतील कलम ३७१ ए नुसार नागालँड राज्याला विशेष घटनात्मक तरतुदी लागू आहेत. त्या अनुषंगाने आजही इथल्या वेगवेगळ्या गावांत जाण्यासाठी इथल्या गावप्रमुखाची परवानगी घ्यावी लागते.
या फेस्टिव्हल दरम्यान जवळपास सर्वच समुदायांना त्यांचे पारंपरिक पोशाख, अनोख्या चालीरीती, कला, संगीत आणि पाककृती अनुभवता येतात. शिवाय हे सगळं एकाच मंचावर. विविध नागा जमातींच्या लोकांची विशिष्ट घरे, सार्वजनिक मुरुंग, लोककला, पाककला, पिकं हे सगळं अनुभवायची संधी नागालँडमधल्या कोहिमा शहराजवळच्या कसिमा या ‘हेरिटेज व्हिलेज’मध्ये दरवर्षी असते.
खरं तर सबंध नागालॅंडमधल्या सर्व जमातींची जीवनशैली ही हॉर्नबिल म्हणजे धनेश या पक्ष्याशी व शेतीशी निगडित कशी आहे आणि या फेस्टिव्हलला त्याचं नाव का दिलं आहे, हे गेल्या वर्षी आम्हाला नागालॅंडच्या सांस्कृतिक मंत्र्याच्या तोंडून ऐकायला मिळालं. ते म्हणाले, ‘‘धनेश हा एकमेव पक्षी आपल्या जोडीदारासोबत आनंदाने राहतो. आमचे वेगवेगळ्या जमातींचे समूहसुद्धा धनेशसारखे जगतात. त्याची आणि आमची जीवनशैली बऱ्यापैकी सारखीच आहे. कष्ट करून एकमेकांशी एकरूप राहून, निसर्गाशी प्रामाणिक राहून आम्ही सर्व आजही त्याच्यासारखे जगत आहोत. ग्रेट हॉर्नबिल म्हणजे विणीच्या हंगामात धनेश पक्ष्यांची मादी मोठ्या ढोलीत आपल्याला कोंडून घेते, त्या ढोलीचं दार चिखलाने लिंपून घेऊन बाहेरून चोचीतून अन्न येईल एवढी जागा ठेऊन आपल्या उडायचे पंख काढून ढोलीबाहेर टाकायला सुरु करते.
या दरम्यान ती पूर्णपणे अन्नासाठी आपल्या जोडीदारावर अवलंबून असते. दरम्यान नर धनेश पक्ष्याला रोज कुटुंबासाठी खूप काळजीपूर्वक मेहनत करावी लागते. मादी संपूर्ण आयुष्य एका जोडीदारासोबत असते. याच दरम्यान नराचा अपघाती मृत्यू झाला किंवा त्याची शिकार झाली तर धनेशचं अख्खं कुटुंब उद्धवस्त होतं. मादी बिनपंखाची आतच कोंडून मरू शकते. पुढची पिढी, पुढचं कुटुंब सगळं संपून जातं. खरं तर याच्या कुटुंबाचा प्रवास हा असा कष्ट, समर्पणानं भरलेला आहे. नंतर पिल्लं ढोलीत थोडी मोठी झाल्यावर चिखलाने लिंपलेलं ढोलीचं दार चोचीने तोडून नर, मादी आणि त्याचं कुटुंब आनंद साजरा करत पुढचं आयुष्य एकमेकांसोबत आनंदात घालवतात. आमच्या सर्व जमातींचं जीवन त्याच पद्धतीचं आणि ते आम्ही वेगवेगळ्या प्रकारे साजरं करत असतो. त्यामुळे या पक्ष्याचं नाव महोत्सवाला दिलं आहे.’’
हॉर्नबिल फेस्टिव्हलमध्ये आदिवासी जमातींचे वेगवेगळे सादरीकरण हे मुख्य आकर्षण असते. दहा दिवस रोज वेगवेगळ्या जमाती मोठ्या प्रांगणात येऊन त्यांचे अनोखे नृत्य, संगीत आणि लोकगीते सादर करत असतात. काही जमातींच्या युद्धनृत्यांपासून ते शेतीकामातील विविध आनंद सोहळ्याची प्रात्यक्षिके अचंबित करून खिळवून ठेवतात. हे प्रदर्शन इथल्या विविधतेचा आणि प्रतिभेचा उत्तम पुरावा असतो. यात कृत्रिमतेचा लवलेश नसतो. शिवाय हरेक कबिल्यात त्यांच्या त्यांच्या पद्धतीची पारंपरिक नागा पाककृतींची विस्तृत श्रेणी इथे चाखायला मिळते. त्यात मांसाहारी, बांबूच्या कोंबांपासून बनवलेले पदार्थ, रेशीम किडे, नाकतोडे आणि इथल्या प्रसिद्ध असलेल्या नागा मिरच्या यांसारख्या अनेक पाककृतीचा खजिना उपलब्ध असतो. त्याचा मनमुराद आस्वाद इथे घेता येतो. शिवाय नागा जमातींच्या अशा अनोख्या पाक परंपरांबद्दल पुरेपूर माहिती इथे घेता येते.
माझ्यासोबत असलेल्या उमेश गोलांडे या निखळ साहसी मित्रामुळं खरं तर आम्हाला वेगवेगळ्या समुहांसोबत राहून त्यांच्या जगण्याचा मागोवा घेता आला. कारण कुठल्याही गोष्टीला ना घाबरता हा माझा सोबती आपल्या सर्व शंका मोडक्यातोडक्या इंग्रजी भाषेत विचारायला जायचा तेव्हा मी ‘आम्ही सह्याद्रीतले नागा’ म्हणून सुरु व्हायचो आणि मग गप्पा पार डोंगरदऱ्या, शेती, माती आणि साहसापर्यत जायच्या.
खरं तर या प्रदेशात मांसाहारावर पूर्ण भर असताना ही माणसं शेती कशाला करत असतील? हा प्रश्न मला पडलेला आणि त्याच उत्तरही मिळालं. शेतीतून त्यांना परिपूर्ण आणि संतुलित आहार मिळतो. त्यांच्या दररोजच्या पारंपरिक आहारात ते बघायला मिळालं. खरं तर नाचणी, काळा, लाल, लाल काळा तांदूळ, बाजरी आणि अनेक भरड, तृणधान्यांची नावे आम्हाला नवीन होती. इथल्या विविध पिकांची रेलचेल पहिली की आपण शहरात असून ‘इन्स्टंट फूड’च्या पिशव्यात अडकून मागास असल्याची भावना नक्कीच होते.
निसर्ग आणि पहाड नावाचं परिपूर्ण जीवनसत्त्व शेती, सुगी आणि सणावाराच्या माध्यमातून आजही इथं आपसूकच मिळवलं जातं. हे सगळं पाहिल्यावर इथल्या विविधतेचा हेवा वाटतो. इथं शेतीत वेळेला खूप महत्त्व आहे. आपण सारखं इंडियन स्टॅण्डर्ड टाइम (IST) असं का म्हणतो कुणास ठाऊक; पण इथल्या शेतीच्या वेगवेगळ्या वेळांना ते लागू पडत नाही. लोथा जमातीच्या समूहात भात कापणीला म्हणजेच सुगीला संपूर्ण गाव सोबतीनं डोंगरकपाऱ्यावर झूमच्या शेतीत ते कापून झोडायला जमा होतं. इथल्या धानाची प्रार्थना आणि धूपबत्ती झाल्यावर कोण उशिरा आलाच तर त्याची परत पाठवणी केली जाते. ‘लेट कमर्स नॉट अलाऊड’ असं! मग समूह गायनाने सुरु होते ती भाताची कापणी. मी इथं वापरात असलेली शेतीसाठीची वेगवेगळी हत्यारं, अवजारं खरेदी केली. डिझाईनमधला छोटा बदल मोठ्ठा परिणाम घडवतो. वारंवार वापर, सामुहिक शहाणपण यातून ज्ञान मग तंत्रज्ञान असा रंजक टप्पा या सर्वांत लपलेला आहे. असे अनेक पैलू उलगडत गेले. तिथं असताना ती सर्व हत्यारं सोबत कुठं वागवायची म्हणून तिथं भारतीय पोस्ट सेवेच अनोखं दालन होतं तिथून पाठवून दिले. मी पुण्यात यायच्या आधी ते घरी पोहोचले.
(लेखक अभियंता व ट्रेकर आहेत.)
९९२३००५४८५
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.