Agrowon Anniversary 2024 : मुक्तगोठा, पीक पद्धतीतील बदल ठरेल फायद्याचा

Agrowon Climate Change Conference : सूर ॲग्रोवन आयोजित हवामान बदल परिषदेत शनिवारी (ता.२०) ‘शेती आणि पशूंवरील परिणाम’ या गटचर्चेत व्यक्त करण्यात आला.
Agrowon Climate Change Conference
Agrowon Climate Change ConferenceAgrowon

Pune News : हवामान बदलाचे परिणाम वाढत आहेत, त्याला तोंड देण्यासाठी पीकपद्धतीत बदलांसह जनावरांसाठी मुक्त संचार गोठा पद्धती फायदेशीर ठरणार आहे, असा सूर ॲग्रोवन आयोजित हवामान बदल परिषदेत शनिवारी (ता.२०) ‘शेती आणि पशूंवरील परिणाम’ या गटचर्चेत व्यक्त करण्यात आला.

‘ॲग्रोवन’च्या वतीने आयोजित ‘हवामान बदल परिषदे’त शेती आणि पशुंवरील परिणाम या विषयावरील गटचर्चेच्या दुसऱ्या सत्रात सहभागी तज्ज्ञ बोलत होते. कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासाळकर, ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे, नागपूरच्या माफसूचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाने यांनी सहभाग घेतला.

पुणे कृषी महाविद्यालयाचे जलव्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. आर. डी. बनसोड यांनी या तज्ज्ञांशी संवाद साधला. हवामान बदलामुळे एकूण अन्नधान्य उत्पादनासह पशूंवर झालेल्या परिणामबाबत या वेळी सर्वकष चर्चा झाली. हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या समस्यांची मांडणी करताना, त्यावरील उपायांचीही या वेळी चर्चा करण्यात आली.

Agrowon Climate Change Conference
Climate Change : हवामान बदलाने वाढतेय भुकेची चिंता

गव्हाला ज्वारी उत्तम पर्याय ः

डॉ. मासाळकर म्हणाले, की पावसाचे प्रमाण असमान होत आहे. त्यात दिवसेंदिवस भर पडत आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे आणि बदलत्या वातावरणामुळे गहू, तांदूळ, सोयाबीन यांसारख्या अन्नधान्यांच्या उत्पादकेतवर परिणाम झाला आहे. सरासरी ३ ते ५ टक्के उत्पादकता कमी होत चालली आहे.

या समस्येला तोंड देण्यासाठी विद्यापीठ काम करते आहे. हवामानाला अनकूल आणि रोग-किडींना प्रतिकारक असे वाणे विकसित केले जात आहेत. गव्हापेक्षाही आता ज्वारी, बाजरी या पिकांवर भर द्यायला हवा. एक-दोन संरक्षित पाण्यात ही पिके चांगले उत्पादन देतात.

आगामी काळात एकवेळच्या जेवणात ज्वारीची भाकरीच खायला मिळणार आहे. गव्हाला पर्याय ज्वारी ठरू शकते. फळबागांमध्ये डाळिंब, सीताफळ, आंबा या फळांनाही बदलत्या हवामानाचा फटका बसतो आहे. आंब्याला पूर्वी एकाचवेळी मोहर यायचा, पण आता दोन-तीन वेळा येतो आहे, असे ते म्हणाले.

Agrowon Climate Change Conference
Climate Change : हवामान बदलामुळे आंबा, काजू बागायतदार चिंतेत

पीकबदल आवश्यक

डॉ. साबळे म्हणाले, की तापमान वाढते आहे. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी तर कधी ढगफुटी होते आहे, हे प्रकार थांबणारे नाहीत. केवळ भारतातच नव्हे, जगभरामध्ये हवामान बदल होत आहेत. या बदलांचा फटका सर्व पिकांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना बसतो आहेच, पण सर्वाधिक फटका द्राक्ष बागायतदारांना सोसावा लागतो.

आता द्राक्ष उत्पादक त्यावर उपाय म्हणून प्लॅस्टिक कव्हरचा वापर करत आहेत. भविष्यात अशीच स्थिती राहिली तर अन्नधान्य उत्पादनात मोठी घट होणार आहे. अन्न आणि पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येणार आहे. यंदा १०६ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे.

पावसाच्या अंदाजासाठी आम्ही काही मॉड्यूल विकसित केली आहेत. राज्यातील दुष्काळी ८४ तालुक्यांचा आम्ही अभ्यास केला आहे. या भागात उशिरा ऑगस्ट-सप्टेंबरला पाऊस होतो, या परिस्थितीत पीक पद्धतीत बदल महत्त्वाचा ठरणार आहे. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी कपाशीचे क्षेत्र कमी करून मका, बाजरी, ज्वारी, अशी पिके घेण्यावर भर द्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

मुक्तगोठा पद्धती अवलंबा

पशूंवरील परिणामांबाबत बोलताना डॉ. भिकाने म्हणाले, की हवामान बदलामुळे चारा आणि पाणीटंचाई या दोन समस्या अधिक भेडसावत आहेत. त्यात काही वेळा प्रत्यक्ष आणि काही वेळा अप्रत्यक्ष परिणाम होत आहेत. त्यात अप्रत्यक्ष परिणाम फार महत्त्वाचे आहेत. त्यात तापमानवाढ मोठा मुद्दा बनतो आहे.

या परिणामांमुळेच २५ ते ३० टक्के दूध उत्पादन घटू शकते. उष्ण वातावरणामुळे जनावरांच्या श्‍वसनवेगावर परिणाम होतो आहे. अनेक जनावरांमध्ये उष्णतेचा केवळ दूध उत्पादनावरच नव्हे, तर गुणवत्तेवरही परिणाम होतो आहे. उष्ण वातावरणात हिरवा आणि कोरडा चारा यांचे एकत्रित मिश्रण जनावरांना द्यावे. पण त्याहीपेक्षा मुक्तसंचार गोठा पद्धती फायद्याची ठरेल. त्यातून पाण्याचा अतिरिक्त वापर थांबेल, शिवाय जनावरांच्या आरोग्याचीही योग्य काळजी घेतली जाईल, असे ते म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com