
डॉ. मनोज माळी
Modern Farming Tools: हळद हे प्रमुख नगदी मसाला पीक आहे. हळदीचा उपयोग दैनंदिन आहारात, औषधांमध्ये, सौंदर्य प्रसाधनामध्ये, जैविक कीटकनाशकांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असतो. हळद पिकामध्ये सर्वसाधारणपणे जातीपरत्वे हळद काढणीस ७ ते ९ महिने लागतात.
प्रामुख्याने आंबे हळद, आयआयएसआर-प्रगती या हळव्या जातींना तयार होण्यास लागवडीपासून ६ ते ७ महिने लागतात. तर निम गरव्या जाती (फुले स्वरूपा) या ७ ते ८ महिन्यांत आणि गरव्या जाती (सेलम, कृष्णा) ८ ते ९ महिन्यांमध्ये काढणीस तयार होतात. त्यामुळे जातीपरत्वे कालावधी पूर्ण झाल्याशिवाय पाला कापणीस सुरुवात करू नये.
हळद काढणी
जमिनीच्या पोताप्रमाणे माळरानाच्या हलक्या जमिनीमध्ये पिकाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ८० ते ९० टक्के पाने वाळलेली असतात. तर मध्यम व भारी जमिनीमध्ये ६० ते ७० टक्के पाने वाळलेली असतात. हे हळद पीक परिपक्वतेचे मुख्य लक्षण मानले जाते.
हळदीच्या काढणीअगोदर १५ ते ३० दिवस पिकास पाणी देणे बंद करावे. एकदम पाणी देणे बंद करू नये. पाणी बंद करताना प्रथम थोडे थोडे पाणी कमी करून नंतर पाणी बंद करावे. त्यामुळे पानातील अन्नरस कंदामध्ये लवकर उतरण्यास मदत होते. त्यामुळे हळकुंडाला वजन, गोलाई आणि चकाकी येते. पाणी शेवटपर्यंत चालू ठेवले, तर हळकुंडाना नवीन फुटवे फुटू लागतात. त्यामुळे उत्पादनात घट होते.
पाला वाळल्यानंतर जमिनीच्या १ इंच वर खोड ठेवून धारदार विळ्याने हळद पिकाचा पाला कापावा. पाला बांधावर गोळा करावा. शेत ४ ते ५ दिवस चांगले तापू द्यावे. त्यामुळे हळदीच्या कंदामध्ये असलेल्या पाण्याच्या अंशामुळे जमीन साधारणपणे भेगाळली जाते. त्यामुळे हळदीची काढणी करणे सुलभ होते.
हळद लागवड पद्धतीनुसार हळद काढणीसाठी पद्धत अवलंब करावा. सरी वरंबा पद्धतीत टिकाव किंवा कुदळीच्या साह्याने हळदीची खांदणी करावी, तर गादी वाफा पद्धतीत ट्रॅक्टरचलित हळद काढणी यंत्राचा वापर करावा.
हळदीची काढणी करतेवेळी जमीन पूर्णपणे वाळली असल्यास हलके पाणी द्यावे. त्यामुळे हळद काढणी करणे सोपे होते.
खांदणी करून काढलेले कंद २ ते ३ दिवस सूर्यप्रकाशात चांगले तापू द्यावेत. त्यामुळे कंदास चिकटलेली माती पूर्णपणे निघण्यास मदत होते.
दोन ते तीन दिवसांनंतर हळदीच्या कंदाची मोडणी करावी. हळदीच्या कंदाचा गड्डा आपटल्यास हळकुंडे व गड्डे एकमेकांपासून वेगळे होतात. त्या वेळी जेठे गड्डे, बगल गड्डे, हळकुंडे, सोरा गड्डा, कुजकी सडलेली हळकुंडे या प्रमाणे कच्च्या मालाची प्रतवारी करावी. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी साठवणूक करावी.
हळदीची काढणी केल्यानंतर लवकरात लवकर हळदीची प्रक्रिया करावी. हळदीची प्रत व दर्जा चांगला राखण्यासाठी काढणी केल्यानंतर साधारणत: १५ दिवसांच्या आत प्रक्रिया करावी.
जातीपरत्वे एकरी १५० ते २०० क्विंटल ओल्या हळदीचे उत्पादन मिळते, तर प्रक्रिया करून ३० ते ४० क्विंटल होते.
प्रतवारी
अ) जेठे गड्डे
मुख्य रोपाच्या खाली वाढणाऱ्या कंदास जेठे गड्डे (मातृकंद) म्हणतात. या गड्ड्यांचा वापर प्रामुख्याने पुढील वर्षी लागवडीसाठी केला जातो. त्यामुळे काढणीनंतर हे गड्डे ताबडतोब सावलीमध्ये ठेवावेत.
ब) सोरा गड्डा
लागवडीसाठी वापरलेले कंद ५० ते ६० टक्के कुजून जातात. उरलेल्या ४० ते ५० टक्के कंदांना ‘सोरा गड्डे’ म्हणतात. हे काळपट रंगाचे मुळ्या विरहित असतात. यांना हळकुंडापेक्षा दुप्पट भाव मिळतो.
क) बगल गड्डे
जेठे गड्ड्याला आलेला फुटव्यांच्या खाली ‘बगल गड्डे’ तयार होतात, यास ‘अंगठा गड्डे’ असेही म्हणतात. साधारण ४० ग्रॅम पेक्षा जास्त वजन असणाऱ्या गड्ड्यांचा वापर बियाणे म्हणून करतात.
ड) हळकुंडे
बगल गड्ड्यांना आलेल्या कंदास ‘हळकुंडे’ असे म्हणतात. प्रामुख्याने प्रक्रिया करून बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी यांचा वापर केला जातो. यातील काही हळकुंडांना उपहळकुंडे येतात. त्यास ‘लेकुरवाळे हळकुंडे’ असे म्हणतात. याचा वापर धार्मिक कार्यात मोठ्या प्रमाणावर केला जातो.
काढणी पद्धती
पारंपरिक पद्धतीने हळद खांदणी :
या पद्धतीत पूर्णपणे कंद जमिनीतून निघत नाहीत. साधारणपणे १० ते १५ टक्के कंद हे जमिनीत राहतात.
सरी वरंबा अथवा गादी वाफा पद्धतीने लागवड केलेल्या ठिकाणी या पद्धतीद्वारे हळद काढणी करता येते.
या पद्धतीने काढणी करण्यासाठी एकरी १८ ते २० मजूर लागतात.
या पद्धतीने काढणी करताना कंदास इजा होण्याची शक्यता असते.
यांत्रिक पद्धती
हे हळद काढणी यंत्र कंदास खालून कंद वर उचलत असल्याने केवळ १ ते २ टक्के जमिनीमध्ये राहतात.
केवळ गादीवाफा पद्धतीने लागवड केलेल्या हळदीची काढणी यांत्रिकी पद्धतीने करता येते.
मजूर समस्येवर मात होते. मजुरी खर्चात बचत होते.
कंद जमिनीतून अलगद उचलत असल्याने कंदास कोणत्याही प्रकारची इजा होत नाही.
डॉ. मनोज माळी, ९४०३७ ७३६१४
(लेखक महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत हळद संशोधन योजना, कसबे डिग्रज सांगली येथे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.