Mango Jalna News : केसर आंबा लागवड (Kesar Mango Cultivation) करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी अति घन आंबा लागवड करावी, असा सल्ला फळबागतज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे यांनी दिला.
नुकताच दिळेगव्हाण (ता. जाफराबाद, जि. जालना) येथे ॲग्रो इंडिया गट शेती संघाचा २१७ वा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. कापसे बोलत होते.
डॉ. कापसे म्हणाले, ‘‘भारतातील शेती परवडत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे आपली शेती तुकड्या तुकड्यात विभागली गेली आहे. त्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे गट शेती. अति घन लागवड म्हणजे दीड मीटर बाय चार मीटरवर आंबा लागवड करावी.
जमीन कशी असावी, कोयीपासून व कलमापासून लागवड करून त्याचा जोड कसा साधावा, तसेच तिसऱ्या वर्षी तीन टन उत्पादन येण्यासाठी कशाप्रकारे मशागत करावी याचे आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना त्यांनी सांगितले. श्रीलंकेमधील शेतकऱ्यांचे आंबा उत्पादन तसेच निर्यातीबाबत सविस्तर माहिती दिली.
या वेळी भगवानराव बनकर यांच्या नेतृत्वाखाली फार्मर प्रोड्यूसर कंपनी मोठ्या प्रमाणात उभारण्याचे ठरले. तसेच या कंपनीच्या माध्यमातूनच पूर्ण प्रकल्पामधून गट शेतीतील सहा हजार एकरसाठी ठिबकद्वारे पाणी देण्याचे सुद्धा प्रकल्प हाती घेण्याची ठरले.
कार्यक्रमात कापूस पैदासकार डॉ. एस. एस. माने यांनी कापसामध्ये साडेतीन बाय पाऊण फुटावर लागवड केल्यास, तसेच ४५ ते ५५ दिवसादरम्यान वाढरोधकांची फवारणी केल्यास कापूस उत्पादनात भरीव वाढ होऊ शकते असे सांगितले.
प्रा. मुजफ्फर यांनी गव्हाचे विविध वाण व उत्पादन वाढीसाठीचे तांत्रिक मुद्दे विशद केले.
अकोला देवीचे लक्ष्मण सवडे व दरेकर मामा यांनी अहवाल सादर केला. गटप्रमुख राजेंद्र घोडके आणि श्री. शेख, तर खामखेडचे शिवाजी उगले, भातोडीचे रामेश्वर गायके, सावरगावचे गणेश मस्के, टेंभुर्णीचे खोत महाराज, चिखलीचे संतोष देशमुख यांनी आपल्या गटाचे अहवाल सादर केले. कार्यक्रमाचे संचालन भाऊराव आटपळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन भगवान बनकर यांनी केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.