जंगली ॲन्थुरिअमही निर्यात करणारा मिझोराम

दक्षिण आशिया खंडामधील अनेक राष्ट्रे ही वातावरण बदलाच्या दबावाखाली आहेत. त्यातील एक मुख्य आणि तेवढेच गरीब राष्ट्र म्हणजे बांगलादेश. एका बाजूला बंगालचा उपसागराचा तडाखा आणि दुसऱ्या बाजूला येथून वाहणाऱ्या गंगा, ब्रह्मपुत्रासारख्या महाकाय नद्यांना दरवर्षी येणारे महापूर यामुळे अपरिमित हानी होते. बांगलादेशामध्ये ब्रह्मपुत्रेस जमुना म्हणतात, तर गंगेला पद्मा. देशाला एकेकाळी सुजलाम् सुफलाम् करणारी हीच नदी हवामान बदलामुळे काळजीचे कारण ठरत आहे. या बांगलादेशच्या सीमेवरील भारतातील एक छोटे राज्य मिझोरामही अशाच प्रकारच्या चक्रीवादळे, प्रचंड पाऊस, नद्यांना येणारे पूर यांचा सामना करत आहे.
Wild Anthurium
Wild AnthuriumAgrowon

मिझोराम हे भारताच्या ईशान्येकडील सात राज्यांपैकी एक. मिझो या आदिवासींची भूमी म्हणून मिझोराम म्हणतात. या राज्याची सीमा त्रिपुरा, आसाम, मणिपूर या राज्यांना जोडलेली आहे, तर तब्बल ७२२ कि.मी आंतरराष्ट्रीय सीमा ही बांगलादेश आणि म्यानमार या दोन राष्ट्रांशी जोडलेली आहे. १९७२ पर्यंत मिझोराम हा आसामचाच एक भाग होता. मात्र नंतर तो केंद्रशासित प्रदेश करण्यात आला. १९८७ मध्ये त्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा प्राप्त झाल्याने भारतीय संघ राज्यामधील २३ वे राज्य ठरले. जेमतेम १२ लाख लोकसंख्या असलेल्या या राज्यात तब्बल ९१ टक्के घनदाट जंगल आहे. संपूर्ण आदिवासी असलेले हे राज्य आज सुशिक्षित शेतकऱ्यांचे राज्य म्हणून ओळखले जाते. म्हणूनच त्यांनी वातावरण बदलाविरुद्धच्या लढाईत चांगले यश प्राप्त केले आहे.

Wild Anthurium
Agriculture Technology : नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या निधीत गैरव्यवहाराचा संशय

येथील ६७ टक्के लोकसंख्या पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. मात्र मिझोरामच्या शेतकऱ्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथील शेतकरी केवळ स्वतःच्या घराला वर्षभर पुरेल इतकेच धान्य उत्पादन घेतात. शेतात धान्य पिकवायचे आणि खळ्यामधूनच बाजारात न्यायचे, ही संकल्पनाच येथे नाही. म्हणूनच असेल कदाचित येथील शेतकरी मला खूप आनंदी दिसला. शेतात पिकविलेल्या धान्यांची विधिवत पूजा करून मग घरी आणले जाते. आपणही नव्या धान्याची पूजा करतो, पण त्यानंतर त्याला त्वरित बाजार दाखवतो. म्हणूनच मला ती ‘उत्तरपूजा’ वाटते. शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव नसलेल्या दलालांनी भरलेली बाजारपेठ आणि मंड्या एका प्रकारे धान्यासाठी स्मशानभूमीप्रमाणे वाटतात. येथे जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाट्याला बहुतांश वेळा दु:खाशिवाय काहीही येत नाही.

मॉन्सूनच्या पावसावर होणारे भात हे मिझोराममधील मुख्य पीक. रब्बी हंगाम येथे फारसा नाहीच. भात पीक काढणीनंतर भाजीपाला, फळ उत्पादन, मसाला पिके घेतली जात असली तरी प्रामुख्याने जंगलामधील विविध उत्पादनावर हे लोक प्रामुख्याने अवलंबून असतात. दोन दशकांपूर्वी तेथील लोकसंख्येस पुरेल एवढे भात उत्पादन राज्यात होत असे, मात्र आता जेमतेम २६ टक्के भात उत्पादन होते. उर्वरित अन्य राज्यातून मागवले जाते.

Wild Anthurium
BBF Technology : जादा पावसातही बीबीएफवरील लागवडीची पिके जोमदार

भाताचे उत्पादन कमी होण्यास तीन मुख्य कारणे आहेत.

१) येथे पडणारा मुसळधार पाऊस, २) पारंपरिक भात वाण आणि ३) जंगल कापून तयार झालेल्या मोकळ्या जागी भातशेती करणे. त्याला ‘जूम’ किंवा ‘Shifting Cultivation’ असे म्हणतात.

आदिवासी जंगलातील एखादी मोकळी जागा शोधतात. तेथील काही वृक्ष कापून टाकतात. त्या अर्ध्या, पाव एकरवर त्यांच्या कुटुंबास वर्षभर पुरेल एवढा भात पिकवितात. ही भातशेती ३-४ वर्षे त्याच जागेवर चालते. पुढे ते क्षेत्र परत जंगलासाठी सोडले जाते. नवीन क्षेत्र शोधले जाते. हजारो वर्षांपासून सुरू असलेल्या पारंपरिक पद्धतीमध्ये तिथे पुन्हा झाडी वाढत असे. मात्र आता वातावरण बदलामुळे अशा आदिवासींनी सोडलेल्या ‘जूम’ जागेवर पुन्हा जंगल निर्मिती होण्याऐवजी विदेशी तणे माजू लागली आहेत. त्याचा प्रसार जंगलात होऊ लागला. पूर्वी तीन ते चार वर्षांनी जागा बदलली जाई. मात्र त्यात उत्पादन कमी होत असल्यामुळे दोनच वर्षांत नवीन जागा शोधली जाऊ लागली आहे. या नव्या ‘जूम’ पद्धतीमुळे जंगलाचे ऱ्हासाचे प्रमाण वेगाने वाढले आहे. परिणामी, वातावरण बदलाचा वेग विशेषतः तापमान वाढ आणि पावसाचा अनियमितपणाही वाढत चालला आहे. राज्य शासनाच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी ‘जूम’ पद्धती बंद करण्यासाठी फार मोलाचे कार्य केले आहे.

फुले आणि फळांच्या शेतीला प्रोत्साहन

१९४७ च्या तुलनेत आज जेमतेम ३० टक्के आदिवासी ही जूम शेती करत आहेत. येथील कृषी विभागाने आदिवासी युवकांनाच सुशिक्षित करून जूम आणि सपाट भागातील भातशेतीमधील व त्याच्या उत्पादनामधील फरक समजावून दिला. कृषी खाते एवढ्यावरच थांबले नाही. त्यांनी आदिवासींना ‘जूम’ शेतीऐवजी जंगलामधून ‘ॲन्थुरियम’ ची फुले गोळा करण्यास प्रोत्साहन दिले. ही फुले राज्यशासनाकडून थोड्या अधिक दराने खरेदी केली जात असल्यामुळे या आदिवासींना आर्थिक स्रोतही निर्माण झाला. पूर्वीच्या जूम शेतीनंतर सोडलेल्या जागांवर वाढलेले विदेशी तण शासकीय खर्चाने काढण्यात आले. या जागी लावण्यासाठी त्याच आदिवासी कुटुंबांना उत्कृष्ट बांबू वाण दिले. अनेक ठिकाणी फळ वृक्षांची लागवड केली. यातून आदिवासींना शाश्‍वत आणि पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्याने जंगलाचा ऱ्हास कमी झाला.

शासनाच्या या प्रयत्नांमुळे आज मिझोराममध्ये ॲन्थुरियमची प्रतिवर्षी ७ दशलक्ष फुले उत्पादित होतात. त्यांची निर्यात आखाती देश, इंग्लंड आणि जपानमध्ये केली जातात. जंगलातील नैसर्गिक फुलांसोबतच हरितगृहामध्येही उत्पादन होऊ लागले आहे. थोड्याशा प्रशिक्षण आणि अनुभवानंतर अनेक आदिवासी शेतकरी आता ॲन्थुरियमबरोबरच गुलाब शेतीही करू लागले आहे. फळबागेमध्येही केळी, हळद, पॅशनफ्रूट, संत्री यांचेही उत्पादन वाढू लागले आहे. मिझोराममधील पेरुसारखे दिसणारे चोचो (ChowChow) हे औषधी गोड फळ पूर्वी आदिवासीच्या घरातच वापरले जाई. आज मात्र भोपळ्याच्या कुळातील या फळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असून, निर्यातही होत आहे. २००९ पर्यंत मिझोरामचे फळबाग आणि फूल उत्पादन जेमतेम ६ टक्के होते, ते आज १० टक्क्यांवर गेले आहे.

सक्षम बांबू त्याला उंदरांचे ग्रहण

- बांबूमध्येही अशीच यशकथा दिसते. या राज्यात तब्बल २७ प्रकारच्या बांबू प्रजाती आहेत. देशाच्या एकूण बांबू उत्पादनाच्या १४ टक्के बांबू मिझोराममध्ये तयार होतो. त्यातील ५ टक्के जंगलामधून मिळतो. आज वातावरण बदलामध्ये होरपळत असलेल्या मिझोरामच्या शेतकऱ्यांच्या पारंपरिक भातशेतीला बांबूचा चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. आज येथे बांबूवर आधारित अनेक व्यवसाय दिसतात. मिझोराम पर्यटनामध्येही बांबूचा मोठा सहभाग आहे. अर्थात, त्याला एक दु:खद किनारही आहे. बांबू दर ५० वर्षांनी फुलोऱ्यात येतो. तयार झालेले बी प्रथिनयुक्त असल्याने ते खाण्यासाठी उंदीर येतात. बांबू वनामध्ये असलेले हे लाखो काळे उंदीर पुढे अन्य शेत, घर येथील अन्नधान्य फस्त करतात. उंदरांचे प्रमाण १९५८-५९ मध्ये जितके विनाशकारी होते, तितकेच २००६-०७ मध्येही विनाशकारी होते. वातावरण बदलास सक्षमपणे सामोरे जाणारा बांबूला लागलेले हे तेवढ्याच सक्षम उंदराचे ग्रहण मिझोरामचे भविष्य नक्कीच काळवंडू शकते, यात शंका नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com