विनाजोखमीच्या शेतीचं मृगजळ

‘विनाजोखमीची शेती' शक्य नसली तरी ‘कमीत कमी जोखमीची शेती' करणं मात्र शक्य आहे. त्यासाठी काही गोष्टींची खूणगाठ बांधावी लागेल. पहिलं काम शेतीवरचं अवलंबन कमी करणं. त्यामुळे जोखीम कमी होते. आपल्या आर्थिक कुवतीला न झेपणारा कुठलाही नवा प्रयोग न करणं. उत्पादनखर्च कमी करण्याचा प्रयत्न करणं. शेतीत नवी गुंतवणूक करताना त्याचा परतावा मिळणं कितपत शक्य आहे, ते नीट अजमावून घेणं. आपल्या आवाक्यातील पशुपालन करणं. मी या सगळ्या बाबींचा अवलंब करतो.
Risk Free Farming
Risk Free FarmingAgrowon

गेल्या आठवड्यात एका निवृत्त प्राध्यापकाचा फोन आला. सुरुवातीलाच त्यांनी स्वत:बद्दल लांबलचक माहिती सांगायला सुरुवात केली. त्यांना मध्येच थांबवून मी म्हटलं, की तुमचा बायोडाटा मला कशाला सांगताय? कशासाठी फोन केला, ते मुद्याचं बोला. त्यांना हे अनपेक्षित असावं. मग त्यांनी ॲग्रोवनमधील माझ्या लेखांचं कौतुक सुरू केलं. मी परत त्यांना थांबवून म्हटलं, की तुमचं झालं असेल तर फोन बंद करतो. ते म्हणाले, मी तुमच्याशी चर्चा करायला फोन केलाय आणि तुम्ही फोन बंद करतो म्हणताय, असं का सर? मी म्हटलं, की तुम्ही नोकरीतून रिटायर झाला असलात, तरी पेन्शन चालू असणार. पोटापाण्याची चिंता नाही. तुमच्याकडं वेळच वेळ असेल; पण मी माझ्या कामांमध्ये व्यग्र आहे. तुम्ही नेमका कशासाठी फोन केलाय, ते बोला.

प्राध्यापक मग मूळ विषयावर आले. ते म्हणाले की, गावाकडं वडिलोपार्जित जमीन आहे. त्यात माझ्या हिश्शाला बारा एकर येते. ती जमीन मला कसायचीय. तुमचे लेख मी नियमित वाचतो. मला तुमचा सल्ला हवाय. मला विनाजोखमीची शेती करायचीय. एक वेळ फायदा नाही झाला तरी चालेल पण नुकसान व्हायला नको...त्यांचं ऐकून मी मस्त हसलो. मी म्हटलं, खरेखुरे वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक शोभता तुम्ही. नोकरी लागल्यापासून निवृत्त होईपर्यंत कसलीच जोखीम अनुभवली नसेल तुम्ही. मी शेतीत कोणालाच सल्ला देत नाही; पण तुम्हाला एक सांगतो. शेतीच्या नादाला लागू नका. तुम्ही म्हणता तशी विनाजोखमीची शेती वास्तवात अस्तित्वात नाही.

त्यावर प्राध्यापक बोलले, असं कसं म्हणता सर? अशी कोणती पिकं म्हणा, वनशेती म्हणा, झिरो बजेट... काहीतरी असेल, की ज्याच्यात रिस्क नाही. मी म्हटलं, तुमचं हे बोलणं ऐकून मला वाटतं की तुम्ही माझे ‘ॲग्रोवन’मधले लेख वाचत नाही. माझ्या विविध लेखांत मी शेतीमधील जोखमींबद्दल विस्ताराने लिहिलंय. इतक्या वर्षांत मला तरी शून्य जोखीम असलेली शेती शोधता आलेली नाही. झिरो बजेटची शेती ही संकल्पना हास्यास्पद आहे. शेती आणि जोखीम हे समीकरण अटळ आहे. त्यामुळं तुम्ही शेती न करणं किंवा पैशानं लावणं उत्तम. त्याहीपेक्षा आजपर्यंत शेती करणाऱ्या तुमच्या छोट्या भावाला शेती देऊन टाकणं अधिकच उत्तम.

Risk Free Farming
Organic Farming: सेंद्रीय शेतीचे क्षेत्र वाढवण्यासाठी सरकारचा पुढाकार

भावाला शेती द्या, हा सल्ला त्यांच्या जिव्हारी लागला असावा. रडवेल्या सुरात ते म्हणाले, लाखोंची वडिलोपार्जित मालमत्ता आहे ही. असं कोणी कोणाला सोडतंय का? मी म्हटलं, तुम्ही विचारलं म्हणून सांगितलं. मी काही सल्ला द्यायला बसलेलो नाही.

प्राध्यापकांनी फोन बंद केला. मी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. हे प्राध्यापक काही अपवाद नाहीत. अनेक जण नेमकं काय केलं म्हणजे शेतीत फायदा होईल, असा प्रश्‍न विचारतातच.

मला एका गोष्टीचं मोठं आश्‍चर्य वाटतं. शेतीबाहेरील लोकांना शेती फायद्याची आहे, रोमँटिक आहे असं वाटणं मी समजू शकतो; पण वर्षानुवर्षे शेती करणाऱ्यांना हे कसं काय समजत नाही, की हमखास फायद्याची किंवा विनाजोखमीची शेती नसतेच. इतक्या वर्षांच्या अनुभवांनंतरही ही बाब लक्षात न येण्याइतके ते निर्बुद्ध नाहीत. शेतकरी हा हुशार आहेच. तो क्रिएटिव्ह आहे. एका दाण्याचे शंभर दाणे करण्यात तो मोलाची भूमिका बजावतो. तरीही तो असा विचार कसा काय करतो? कारण फायद्याची शेती हे त्याचं स्वप्न आहे. हे स्वप्न तो सतत बघत असतो आणि ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रयत्नशीलही असतो. काही वेळा त्याला फायदा होतो. बऱ्याचदा नुकसान. या नुकसानीला या जोखीम कारणीभूत ठरतात.

Risk Free Farming
Natural Farming : शाश्‍वत विकासासाठी नैसर्गिक शेतीची गरज

काही जोखीम सगळ्या शेतकऱ्यांसाठी सारख्या असतात; तर काही जोखीम विशिष्ट भागातील शेतीसाठी असतात. शिवाय प्रत्येक शेतकऱ्याच्या काही वेगळ्या जोखीम असतात. पावसाबाबत हवामानाचे अंदाज बऱ्यापैकी अचूक असतात. काही वेळा चुकतात. मात्र हे अंदाज लक्षात घेऊन कोणती पिकं घ्यायची, हे शेतकऱ्याला ठरवता येत नाही. कारण जमिनीचा दर्जा, पाण्याची उपलब्ध सुविधा लक्षात घेऊनच कोणतं पीक घ्यायचं ते ठरवावं लागतं. अतिवृष्टी किंवा दुष्काळामुळे होणारं नुकसान टाळता येत नाही. इथं आपत्ती व्यवस्थापन फारसं कामाला येत नाही. नदीकाठच्या पिकांचं महापुरामुळं नुकसान होतं. अशा नैसर्गिक जोखमींचा शेतीला बसणारा फटका अटळ आहे. अशा संकटात सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी, अशी अपेक्षा असते. बऱ्याचदा सरकार मदत करतेही; पण ती अत्यंत तुटपुंजी असते. पीकविम्याचं वास्तव दरवर्षी शेतकरी अनुभवत आहेत. त्यात शेतकऱ्यांपेक्षा कंपन्यांचंच भलं होतंय.

गेल्या काही वर्षांत हरिण, डुक्कर, माकड, नीलगाय या प्राण्यांचा शेतीला मोठ्या प्रमाणात उपद्रव होतोय. दरवर्षी ओरड होते; पण यावर ना शेतकरी संघटितपणे रस्त्यावर आले ना सरकारने काही केले. प्रत्येक शेतकरी आपल्या रानातली हरणं बाहेर हाकलतो. ती शेजारच्या शेतात पिकांचं नुकसान करतात. पुन्हा त्या शेतात येतात. शे-पन्नास हरिण एकाच वावरात चरायला उतरले, तर पिकाची वाट लागणारच. यावर उपाय काय? उत्तर कोणाकडंच नाही. डुकरं तर यापेक्षा अधिक नुकसान करतात. त्यांना हाकलणं जिवावर बेतू शकतं. हा उपद्रव कसा थांबवायचा, याचंही उत्तर कोणाकडं नाही. वन्यजीव संरक्षण कायद्यांत शेतकऱ्यांचा विचार होत नाही. शेतकरी नशिबाला दोष लावून सगळं नुकसान सहन करणार. एखाद्या वर्षी काही भागांत अचानक गोगलगायी जन्मतात आणि उगवलेली पिकंच्या पिकं फस्त करतात. कधी औषधांना न जुमानणारी रोगराई उद्‌भवते. मोठं नुकसान होतं. या सगळ्या आपत्तींवर प्रभावी उपाय शोधण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही.

दुसऱ्या बाजूला सरकार शेतीमालाच्या किमती वाढू नयेत, शेतकऱ्यांना चांगले दर मिळू नयेत, यासाठीच सतत निर्णय घेत असते. सोयापेंड, खाद्यतेल, डाळी इ. आयातींसाठी सरकार करत असलेले करारमदार बघितले की लक्षात येतं- सरकार हीच शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी जोखीम आहे. आज बाजारात एखाद्या पिकाला चांगले भाव आहेत म्हणून ते पीक घेतलं आणि सुदैवाने त्याचं उत्पादन चांगलं झालं, तरी सरकार त्याला भाव मिळू देत नाही. सोयाबीन, कापूस, तूर यासह जवळपास सगळ्याच पिकांना हे लागू पडतं. त्यामुळे विशिष्ट पीक घेणं फायद्याचं ठरेल, असं ठामपणे म्हणता येत नाही. या सरकारी अरिष्टाविरुद्ध शेतकरी संघटितरीत्या लढण्याच्या मानसिकतेत नाहीत.

त्याच वेळी देशातला मध्यमवर्ग हा ही शेतकऱ्यांसाठी मोठं संकट आहे. पेट्रोल-डिझेलसह इतर वस्तूंचे भाव गगनाला भिडले तरी तोंड न उघडणारा हा वर्ग शेतीमालाचे दर काही काळासाठी वाढले तर मात्र प्रचंड बोंबाबोंब करतो. वृत्तपत्रांसह सगळी इलेक्ट्रॉनिक माध्यमंही अशा बातम्यांना ठळक प्रसिद्धी देतात. सरकार लगेच हस्तक्षेप करते. ज्या देशातील मध्यमवर्गाला शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळावा, असं वाटत नाही, तिथली लढाई अधिक कठीण असते.

ही सगळी परिस्थिती विचारात घेतली, तर विनाजोखमीची शेती हे मृगजळ असल्याचं लक्षात येतं. परंतु ‘विनाजोखमीची शेती’ शक्य नसली तरी ‘कमीत कमी जोखमीची शेती’ करणं मात्र शक्य आहे. त्यासाठी काही गोष्टींची खूणगाठ बांधावी लागेल. पहिलं काम शेतीवरचं अवलंबन कमी करणं. त्यामुळे जोखीम कमी होते. आपल्या आर्थिक कुवतीला न झेपणारा कुठलाही नवा प्रयोग न करणं. अशा प्रयोगात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. त्यातून बाहेर पडणं अवघड होऊन जातं. उत्पादनखर्च कमी करण्याचा प्रयत्न करणं. शेतीत नवी गुंतवणूक करताना त्याचा परतावा मिळणं कितपत शक्य आहे, ते नीट अजमावून घेणं. आपल्या आवाक्यातील पशुपालन करणं. शेतीतील जोखीम कमी करण्यासाठी हे उपाय आहेत. मी या सगळ्या बाबींचा माझ्या शेतीत अवलंब करतो. त्यामुळेच माझी शेती आनंददायी बनली आहे

खरं तर हे काही ‘रॉकेट सायन्स’ नाही. प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या वर्षानुवर्षांच्या अनुभवातून हे सगळं कळतं. पण तो अनुभवातून धडा घेत नाही. मोहात पडून, कोणाचा तरी सल्ला ऐकून तो त्याच त्या चुका करतो. माहीत असूनही मृगजळाच्या मागे धावतो आणि रडत बसतो. एकदा शेतीचं वास्तव नीट समजून घेतलं तर तक्रारी करत बसण्याची गरज राहत नाही. आजचा काळ हा शेतीसाठी अधिकच प्रतिकूल आहे. येणारा काळ आणखी बिकट असेल. झिरो बजेट नैसर्गिक शेतीच्या नावाखाली एका नव्या संकटात शेतकऱ्यांना ढकलण्याची केंद्र सरकारची तयारी दिसतेय. अशा कठीण प्रसंगी केवळ स्वत: शेतकरीच स्वत:चा बचाव करू शकतो. इतर कोणीच त्याला वाचवू शकत नाहीत. हे जेवढ्या लवकर त्याला कळेल, तेवढं त्याच्या हिताचं आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com