Kolhapur Gokul Dudh Sangh : 'गोकुळने केवळ कोल्हापूरच्याच नव्हे तर महाराष्ट्र आणि देशाच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांना आर्थिक सुबत्ता देण्याचे काम गोकुळने केले. दुधाचा महापूर ही संकल्पना राबवल्यापासून कोल्हापूरच्या आर्थिक विकासाला चालना मिळाली असल्याचे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाच्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त भेटवस्तू वाटप, अद्ययावत लोणी व पेढा प्रकल्पाचा शिलान्यास, गोकुळ पेट्रोल पंप भूमिपूजन आणि गोकुळ श्री पुरस्कार वितरणानिमित्त 'गोकुळ'च्या गोकुळ शिरगाव येथील मुख्य कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
राज्यातील आदर्श दूध संघ कसा असावा तर तो 'गोकुळ'सारखा असावा. गोकुळचा नाव लौकिक महाराष्ट्र आणि देशात झाला आहे. त्याला कोठेही गालबोट लागू देऊ नका. आपसात मतभेद होऊ देऊ नका. गोकुळच्या प्रगतीला कोणाची दृष्ट लागू देऊ नका', तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा बँक, गोकुळ सारख्या संस्था आदर्शवत काम करत आहेत. असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.
'पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, 'गोकुळने गाय दूध संकलन बंद केलेले नाही किंवा त्याचा खाडाही केला जात नाही. येणारे सर्व दूध तोटा पत्करून स्वीकारत आहे. त्यामुळे दूध पावडरवर अनुदान मिळावे.'
'गोकुळ'चे अध्यक्ष अरुण डोंगळे म्हणाले, 'गुणवत्तेमुळे गोकुळ राज्यात प्रसिद्ध झाला आहे. मुंबई बाजारपेठेमुळे गोकुळला चांगले दिवस आले. यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. गोकुळ सध्या एक - रुपयामधील ८२ पैसे शेतकऱ्यांना देत आहेत. मुंबईमध्ये 'गोकुळ-शक्ती' म्हणून गाय दूध विक्री सुरू केली जाणार आहे. एक फेब्रुवारीपासून हे दूध विक्री केले जाणार आहे.' यावेळी विश्वास पाटील, बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील-चुयेकर, किसन चौगले, अजित नरके, कर्णसिंह गायकवाड, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले उपस्थित होते.
मुंबई, पुणे, बारामतीमध्ये मागणी
'राज्यातील मुंबई, पुणे, बारामतीसह इतर ठिकाणी गोकुळ दूध विक्री केंद्र मिळावे, यासाठी अनेक लोक माझ्याकडे येतात. यावरून 'गोकुळ'चे दूध या मोठ्या शहरात किती प्रसिद्ध आहे, हे लक्षात येते. हाच दर्जेदारपणा टिकवला पाहिजे', असेही पवार यांनी सांगितले.
कोल्हापूर जिल्ह्यातील सात-आठ कारखान्यांची उलाढाल एका बाजूला आणि एकट्या 'गोकुळ'ची उलाढाल एका बाजूला आहे. याचे सर्व श्रेय हे दूध उत्पादकांचेच असल्याचेही पवार यांनी नमूद केले.
'गोकुळ श्री पुरस्कार'चे मानकरी
म्हैस दूध उत्पादक : विजय विठ्ठल दळवी, लिंगनूर (प्रतिदिन २०.५८० लिटर). शुभम मोरे, गजवणे (प्रतिदिन १९.५०० लिटर) व वंदना जरळी, गडहिंग्लज (प्रतिदिन १९.३४० लिटर).
गाय दूध उत्पादक : शांताराम साठे, सरवडे (प्रतिदिन ४०.२२५ लिटर), दीपक सावेकर, बेलवळे, बुद्रुक (प्रतिदिन ३१.११० लिटर) व करीम मुल्ला, वडणगे (प्रतिदन ३०.८२० लिटर).
अनुदान शेतकऱ्यांच्याच खात्यावर
'शासनाने गाय दूधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले आहे. हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरच जमा झाले पाहिजे, अशी शासनाची भूमिका आहे. यामुळे शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळणार असल्याचे पवार यांनी सांगितले. गोकुळबाबत काही अडीअडचणी असतील तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मी स्वतः, पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि मंत्री चंदकांत पाटील आम्ही सर्व गोकुळसोबत आहोत. संघाच्या सर्व अडचणी दूर केल्या जातील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
एक मिनिटात बक्षिसाची रक्कम झाली १ लाख
'गोकुळ श्री' पुरस्काराच्या माध्यमातून प्रतिदिन सर्वाधिक दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना ३० हजार, पंचवीस हजार, वीस हजार असे अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाला बक्षीस दिले होते. त्यानंतर, उपमुख्यमंत्री पवार यांनी संघाची एवढी मोठी उलाढाल आणि बक्षीस एवढे कमी देता, हे बरोबर नाही. दूध उत्पादकांना जास्त बक्षीस द्यावे, तुम्ही तुमच्या खिशातील पैसे देत नाही, असे म्हणून आता ज्यांनी गोकुळ श्री पुरस्कारमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे, त्यांना १ लाख, ७५ हजार आणि ५० हजार अशी बक्षिसे द्या, असा आदेश दिला आणि तत्काळ हे बक्षीस मंजूर करण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.