Pune News : पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेतील प्रमाणकांमध्ये (ट्रिगर्स) एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आता फळबागेचा विमा उतरविण्यासाठी किमान शेतजमिनीची अट पाळावी लागणार आहे.
कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे, की कोकणातील फळ उत्पादक शेतकऱ्याला हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी किमान दहा गुंठे शेतजमिनीवर फळबाग असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
तसेच राज्याच्या उर्वरित भागात कुठेही फळबाग असल्यास बागेचे क्षेत्रफळ किमान २० गुंठे हवे. तसेच राज्यात आता कुठेही फळबागेचा विमा काढण्यासाठी कमाल क्षेत्र केवळ चार हेक्टरपर्यंत राहील. चार- दोन फळझाडांनाही बाग दाखवून खोटा विमा काढून नुकसान भरपाई लाटण्याचे प्रकार होत असल्यामुळे हा बदल करण्यात आला आहे.
राज्यात मृग बहर २०२४ हंगामाकरिता फळबाग विमा योजनेतून नुकसान भरपाई मिळण्यासाठी यंदा ६३ हजार ७३७ अर्ज आले होते. तपासणीअंती यातील हजारो अर्ज बोगस आढळले आहेत. कृषी विभागाच्या पथकांनी ५१ हजार अर्जांची तपासणी केली. तपासणीत दहा हजारांच्या आसपास अर्जांमध्ये खोटी माहिती दिल्याचे आढळून आले आहे.
तेथे बागांचा पत्ताच नव्हता. तसेच साडेतीन हजार प्रकरणांमध्ये फळबाग छोटी असतानाही ती मोठी असल्याचे दाखवून विमा काढण्याचा प्रकार झालेला आहे. तसेच १५१ प्रकरणांमध्ये फळबागेचे वय कमी असतानाही ती जास्त वयाची असल्याचे भासवून विमा भरपाई मिळविण्याचा प्रयत्न झालेला आहे.
‘‘आम्ही मृग बहर-२०२४ हंगामातील आलेल्या अर्जांपैकी साडेतेरा हजारांहून अधिक अर्ज अपात्र ठरविले आहे. या अर्जांपोटी भरण्यात आलेला विमा हप्तादेखील जप्त करण्यात आला आहे,’’ असे कृषी विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, कृषी विभागाने आंबिया बहर २०२३ मधील भरपाई वाटपाचे काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. राज्यातील सव्वादोन लाख शेतकऱ्यांना आंबिया बहरात फळपीक विमा काढला होता. त्यातून विमा कंपन्यांनी ८११ कोटी रुपयांची विमाहप्ता रक्कम गोळा केली होती. त्यापैकी १६४ कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट शेतकऱ्यांकडून जमा झाली होती.
‘‘बिया बहराकरिता राज्यात ८३६ कोटी रुपयांच्या आसपास भरपाई वाटण्याचे निश्चित करण्यात आले होते. ही रक्कम जवळपास १.९२ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना वाटण्यात आली आहे. म्हणजेच विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांपैकी ८५ टक्के शेतकऱ्यांना विमा भरपाई देण्यात आली आहे,’’ असे सूत्रांनी स्पष्ट केले.
भरपाई मिळविण्यात जळगाव जिल्हा आघाडीवर
आंबिया बहर २०२३-२४ मधील फळपीक विम्यातून भरपाई मिळवण्यात जळगाव जिल्हा आघाडीवर आहे. या जिल्ह्यात ५३ हजार २६१ शेतकऱ्यांना ३३७ कोटी रुपये मिळाले आहेत. जालन्यात २५ हजार २५४ शेतकऱ्यांना १६५ कोटी रुपये, सिंधुदुर्गामध्ये ३९ हजार १२२ शेतकऱ्यांना ७० कोटी ८० लाख, तर रत्नागिरीतील ३२ हजार ५६३ बागायतदारांना ७९ कोटी १९ लाख विम्यापोटी मिळाले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.