
सद्यस्थितीत देशात १३६ कोटी लोकसंख्या (Population) आहे असे गृहीत धरले. यांपैकी ४० ते ४२ कोटी मध्यम आणि नव-मध्यम वर्ग (India Middle Class) आहे तर २५ कोटींच्या घरात कनिष्ठ मध्यम वर्ग आहे. मात्र कोरोना महामारीच्या (Corona Pandemic) लॉकडाउनपासून या मध्यम वर्गाची संख्येत मोठ्या प्रमाणावर घसरण होऊन कनिष्ठ मध्यम वर्गाची वाढ होणे चालू झाले आहे. परिणामी याच वर्गातून बेरोजगारी संख्या वाढत आहे. या मध्यम वर्गाने समाजात पुढारपण करायला सुरुवात केल्यापासून भांडवली व्यवस्थेला खतपाणी घालण्याचे काम केले.
या वर्गाकडे बुद्धिजीवीचे, सांस्कृतिक, शैक्षणिक, विविध संस्थात्मक आणि संघटनात्मक नेतृत्व आल्यामुळे तळागाळात-वंचित वर्ग विकासापासून दूर फेकला गेला आहे. कारण वंचित वर्गाचा राज्य व्यवस्थेशी थेट संपर्क किंवा संबंध येईना असे झाले. मध्यम वर्गाने राज्य व्यवस्था आणि वंचित घटक यांच्या संपर्काची आणि मदत वाटपाची मध्यस्थीच्या रूपाने साखळी तयार केली. मध्यम वर्गाने मध्यस्थी करताना हा वंचित घटकांकडे जाणारा विकास निधी असो की योजनांचा लाभ असो त्यातील बराच भाग स्वतःकडे ठेवून घेण्याची भूमिका घेतली. परिणामी तळागाळापर्यंत पाझर नगण्य जातो.
या मध्यम वर्गाने भाषा, विद्या, जीवनमूल्य, निष्ठा आणि साहित्य हे सर्व स्वकेंद्रित तयार केले. याच जोरावर राज्यव्यवस्थेला भांडवली व्यवस्थेच्या दिशेने लोटले. सद्यस्थितीत या मध्यम वर्गाने धार्मिक आणि सांस्कृतिक घटकांना वैयक्तिक न ठेवता हळूहळू सार्वजनिक-सामाजिक करायला लागला आहे. एक जातीय-वर्गीय वर्चस्व निर्माण कारणाचे प्रयत्न केले आहेत. उदा. उच्च जातीची संस्कृती अंगीकृत करून बहुजनवादी संस्कृतीवर आक्रमण करणे चालू आहे. गणपती उत्सवाच्या निमित्ताने आपण हे पहिले आहे.
दुसरे, प्रसार माध्यमांचा सर्व अवकाश याच मध्यम वर्गाने व्यापला आहे. त्यामुळे तळागाळातील समाज व्यवस्थेचे बातम्या-वार्तांकन येणे खूप दुर्मीळ झाले आहे. परिणामी सर्वसामान्यांच्या प्रश्नांची दाहकता कमी करून टाकली. मध्यम वर्गीयांनी स्वतःच्या प्रश्नांपुढे सामान्यांच्या प्रश्नांना दुय्यम केले. या मध्यम वर्गाने स्वतःचे पूर्णपणे ‘इंडिया’करण करून घेतले. भारताकडून मजुरांच्या रूपाने सेवा-श्रम घेतो, मात्र त्यांच्या प्रति उत्तरदायित्वाची-जबाबदारीची थोडीही जाणीव नाही. मध्यम वर्ग एक स्वकेंद्रित (स्वार्थी) रूपाने स्वतःचे सामाजिक प्रतिनिधित्व करतो. याच मध्यम वर्गाच्या सामाजिक संघटना आहेत, धार्मिक संघटना, व्यापारी संघटना, व्यावसायिक संघटना, जातीय संघटना, सांस्कृतिक संघटना अशा कितीतरी प्रकारच्या संघटना आहेत. त्यातून स्वतःचे हितसंबंध जोपासण्याचे काम केले जाते. याशिवाय तळागाळापर्यंत मदतनिधी, योजनांचा व इतर प्रकारचा लाभ पोहोचू देत नाही.
या मध्यम वर्गावर बोलावे तेवढे कमीच आहे. मात्र, लॉकडाउनपासून मध्यमवर्गाने काही धडा घेतला तर बरे होईल असे चित्र होते. पण धडा घेईल तो मध्यम वर्ग कसला? त्यामुळे आज मध्यम वर्गातून बेकारी, महागाई, बेरोजगारी, आर्थिक चणचण ही सर्वांना तोंड देत आहे. तरीही हा वर्ग सर्व सामान्यांचे प्रश्न पुढे येऊ न देता धार्मिक-सांस्कृतिक आणि अस्मितेच्या प्रश्नांचा वाहक बनत चालला आहे. त्यामुळे राजकीय व्यवस्थेला तळागाळातील-सर्वसामान्यांच्या आर्थिक प्रश्नांना सोडवण्यास बगल देणे सहज शक्य होत आहे.
सोमिनाथ घोळवे, पुणे
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.