Agrowon Dubai Tour : संस्मरणीय, अभ्यासपूर्ण दुबई अभ्यास दौरा

Agriculture Tour : युरोपबरोबरच आखाती देशही आता आरोग्यपूर्ण आहाराला महत्त्व देऊ लागले आहेत. त्यामुळे शेतीमालातील किमान रासायनिक अवशेष पातळी (एमआरएल) कमी ठेवण्याचे, गुणवत्ता राखण्याचे मोठे आव्हान येत्या काळात भारतीय शेतीमाल निर्यातदारांबरोबरच शेतकऱ्यांपुढेही असेल याची जाणीव ‘सकाळ-ॲग्रोवन’ने आयोजित केलेल्या अभ्यास दौऱ्यात सहभागी झालेल्या प्रत्येकाला झाली.
Agrowon Dubai Tour
Agrowon Dubai Tour Agrowon
Published on
Updated on

धनश्री शुक्ल

Sakal Agrowon Tour : ‘सकाळ ॲग्रोवन’च्या वतीने आयोजित दुबई शेतीमाल निर्यात अभ्यास दौऱ्यावर गेलेली राज्यातील शेतकरी व व्यावसायिकांची पहिली टीम नुकतीच परतली. या दौऱ्यात खूप काही शिकायला मिळाल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया सर्व सहभागींनी व्यक्त केली. त्याचबरोबर दुबईत प्रस्थापित झालेल्या संपर्काचा वापर करून लवकरच आपण शेतीमालाच्या निर्यातीत उतरणार असल्याचा विश्‍वासही यापैकी अनेकांनी व्यक्त केला. काही जणांनी तर त्यासाठी पूर्वतयारीही सुरू केली आहे. या दौऱ्यात विविध बाजारांना भेटी देण्याबरोबरच तिथे काम करणाऱ्या अनेक आयातदारांशी चर्चा करण्याची, आखाती देशांच्या अपेक्षांची नेमकी माहिती मिळविण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर स्थलदर्शन आणि खरेदी करता आल्याने सहलीत सहभागी झालेल्या प्रत्येकाला छान मौजमजा करता आली. हा दौरा हसत-खेळत मुक्त वातावरणात झाल्याने सर्वांमध्ये मैत्रीचे अनोखे बंध तयार झाले.

दुबईतून वाढत असलेली शेतीमालाची मागणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नामी संधी ठरली आहे. हा शेतीमाल दुबईत निर्यात होतोच; पण तेथील आयातदार हाच शेतीमाल पुन्हा विविध आखाती देशांसह युरोपातही पाठवतात. त्यामुळे दुबई आपल्यासाठी उत्तम व्यवसाय केंद्र बनले आहे. दौऱ्यात सहभागी शेतकऱ्यांना, व्यावसायिकांना दुबईतील बाजारपेठा बारकाईने बघता आल्या. तसेच तेथील आयातदार कंपन्यांच्या प्रतिनिधींशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळाली. बाजारपेठेची मागणी व अपेक्षा, निर्यातीमधील संधी व जोखीम, कंटेनरची होणारी विक्री, दुबईत कंपनी कशी स्थापन करायची अशा महत्त्वपूर्ण प्रश्‍नांची उत्तरे मिळाली.

Agrowon Dubai Tour
Agrowon Dubai Tour : ‘ॲग्रोवन’चा दुसरा दुबई दौरा ६ ऑक्टोबरपासून

पहिल्या दिवशी विम्पी लॅबोरेटरीज या अत्याधुनिक तपासणी सुविधेला भेट आयोजित केली होती. लॅबचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. चंद्रजित यांनी लॅबचे कामकाज कसे चालते हे समजावून सांगितले. लॅबमध्ये मातीपासून ते पिकापर्यंत सर्व प्रकारच्या गुणवत्ता चाचण्या घेऊन प्रमाणपत्र दिले जाते. या लॅबने चाचणी केलेल्या आणि प्रमाणित केलेल्या सर्व गोष्टी वापरण्यासाठी योग्य आहेत असे तिथल्या सरकारी यंत्रणेकडून ग्राह्य मानले जाते. दुपारच्या सत्रात जबेल अली या फ्री झोनमध्ये विनायक देशपांडे यांच्या आस्थापनेला भेट दिली. श्री. देशपांडे भारतातून व इतर देशातून मोठ्या प्रमाणावर शेतीमाल मागवतात. तो रिपॅकिंग करून दुबईबरोबरच आखाती देशांमध्ये विकला जातो. त्याचबरोबर इतर आखाती देशात पुन्हा निर्यात केला जातो. श्री. देशपांडे यांनी भारतीय निर्यातदारांकडून निर्यात करताना होणाऱ्या चुका व आखाती बाजारपेठांची अपेक्षा, निर्यात करताना येणारी आव्हाने, आर्थिक फसवणुकीचे प्रकार याबद्दल तपशीलवार मार्गदर्शन केले.

दुसऱ्या दिवशी सकाळी अल अविर मार्केटला भेट दिली. अल अविर हे ताजी फळे आणि भाजीपाल्याचे दुबई येथील सर्वांत मोठे मार्केट आहे. हे मार्केट आशियायी देशांतून फळे-भाजीपाल्याची आयात करण्यासाठी, आखाती देशांना पुरवठा करण्यासाठी तसेच आफ्रिका आणि युरोपीय देशांना निर्यात करण्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे अनेक महाराष्ट्रीयन उद्योजक उत्तम व्यवसाय करीत आहेत. ऑल इन दुबई फूडस्टफ ट्रेडिंग कंपनीचे श्रद्धेश पवार यांनी अल अविर मार्केटबद्दल माहिती दिली. त्याचबरोबर जी सेव्हन फूड्स कंपनीचे ईश्‍वर फुंदे, भूमी फूडस्टफ कंपनीचे शहाजी डोलताडे, टायटन्स ॲडव्हान्स जनरल ट्रेडिंग कंपनीचे मोहित टेकरीवाल, यश ट्रेडिंग कंपनीच्या जान्हवी आगरवाल यांनी या मार्केटमध्ये चालणाऱ्या व्यवसायाची सांगोपांग माहिती दिली. त्याचबरोबर या साऱ्यांनी हॉटेलवर येऊन दुबईमध्ये व्यवसाय यशस्वीपणे कसा करायचा, त्यामध्ये कोणत्या अडचणी येतात, पेमेंटबाबत कोणती काळजी घ्यायची याबाबत सादरीकरणासह तपशीलवार माहिती दिली.

तिसऱ्या दिवशी दुबईतील भारतीय वकिलातीला (कौन्स्युलेट) भेट दिली. कौन्स्युलेट जनरल के. कालीमुथू यांच्यासह तिथल्या कर्मचाऱ्यांनी ‘सकाळ-ॲग्रोवन’च्या नेतृत्वाखाली आलेल्या टीमचे अगत्यपूर्वक स्वागत केले. भारतीय वकिलातीच्या कामकाजाबद्दल त्यांनी माहिती दिली. त्याचबरोबर दुबईमध्ये व्यवसाय करताना कोणती काळजी घ्यावी, काही अडचणी असल्यास भारतीय वकिलात कोणत्या प्रकारचे साहाय्य करू शकते याबद्दल अवगत केले. भारत सरकारच्या दुबईमध्ये व्यवसायवृद्धीच्या आगामी महत्त्वाकांक्षी योजनांबाबतही त्यांनी माहिती दिली. दुपारी कमोडिटी मार्केटला भेट दिली. यामध्ये भारतातून मसाले, काजू, बेदाणे आदी आयात कसे केले जातात, त्याच्या गुणवत्तेचे निकष काय असतात याबद्दल तेथील व्यावसायिकांनी माहिती दिली.

Agrowon Dubai Tour
Dubai Success Story : वाळवंटातील संपन्न आनंदवन : दुबई

चौथ्या दिवशी मसाल्यांच्या शीतगृहाला भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती घेतली. त्याचबरोबर तयार पराठे बनविणारा प्रकल्पही पाहिला. शेवटच्या दिवशी चीनच्या ड्रॅगन मार्केटला भेट दिली. चिनी कंपन्यांकडून स्वस्तातील मालाची कशी विक्री होते हे समजून घेतले. नंतर मूळचे साताऱ्याचे असलेल्या राहुल घोरपडे यांच्या ग्रीन प्रीफॅब कारखान्याला भेट दिली. मोठ्या निवासी प्रकल्पांसाठी लागणारी भव्य प्रीफॅब कार्यालये अत्यंत कमी वेळात ते तयार करतात. दुबई सरकारसह अनेक नामवंत त्यांचे ग्राहक आहेत. त्यांची यशकथा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली. ज्यांना आम्ही भेटी दिल्या ते सर्व भारतीय वंशाचे असून दुबईमध्ये उत्तमपणे व्यवसाय करीत आहेत. त्या सर्वांनी आम्हाला व्यवसाय करण्यासाठी मदत करण्याची तयारी दाखवली. सर्वांनी ‘सकाळ ॲग्रोवन’च्या नेतृत्वाखाली आलेल्या टीमचे मनापासून स्वागत केले.

पर्यटन स्थळांना भेटी

या दौऱ्यात दुबईतील पर्यटनस्थळांना भेटी देण्याची संधीही सहभागींना सायंकाळी तसेच फावल्या वेळात मिळाली. बुर्ज खलिफा, दुबई मॉल, दुबई फ्रेम, ड्रॅगन मॉल, मीना बझार, ओल्ड दुबई यांसारख्या प्रेक्षणीय स्थळांच्या भेटी झाल्या. अभ्यासाबरोबरच स्थलदर्शन आणि खरेदी करता आल्यामुळे या दौऱ्याचा आनंद द्विगुणित झाला.

दुबईचा अभ्यास दौरा आयोजित केल्याबद्दल मला मनापासून कृतज्ञता व्यक्त करायची आहे. हा दौरा एक अविश्‍वसनीय अनुभव ठरला, ज्याने प्रत्येक प्रकारे माझ्या अपेक्षांपेक्षाही अधिक काही मिळवून दिले. दुबईचे नावीन्यपूर्ण व्यवसाय लॅण्डस्केप एक्सप्लोर करण्याची संधी खरोखरच समृद्ध करणारी होती. काळजीपूर्वक क्युरेट केलेल्या प्रवास कार्यक्रमामुळे दुबईने घेतलेल्या उल्लेखनीय भरारीची माहिती मिळाली. या दौऱ्यादरम्यान मिळालेले ज्ञान, कनेक्शन आणि आठवणींसाठी मी आभारी राहीन.
पूजा प्रकाश पुजारी
दुबई दौऱ्याच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व पडद्यावर दिसणाऱ्या आणि पडद्यामागच्या सदस्यांचे आभार. विशेषतः धनश्री मॅडम आणि ‘ॲग्रोवन’ टीम, ज्यांनी शिक्षण आणि एन्जॉयमेंट यांचा सुंदर मिलाफ साधून हे आयोजन सफल केले. आयोजकांनी वेगवेगळ्या वयोमान, व्यवसाय आणि विचारधारांचे लोक एकत्र घेऊन या सर्वांची खूप सुंदर मोट बांधली. विविध प्रांतातल्या भारतीय लोकांनी तिथे जाऊन प्रस्थापित केलेले व्यवसाय पाहणे, त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणे, त्यांचे अनुभव ऐकणे यांतून निश्‍चितच वेगळ्या लेवलचा कॉन्फिडन्स मिळाला. हा एक पूर्णपणे नवीन अनुभव आमच्यासाठी अधिक समृद्ध करणारा आणि प्रेरणादायक ठरला.
मयूरेश तळेकर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com