Yeola News : पालखेड डाव्या कालव्याला शेती सिंचनासाठी सोडलेल्या आवर्तनातून वितरिका क्रमांक ४६ ते ५२ ला पाणी द्यावे, या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांचे उपोषण चौथ्या दिवशीही सुरुच आहे. या पाण्याबाबत शनिवारी (ता. २७) जिल्हाधिकारी कार्यालयात प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक होऊनही पाणी देण्यासंदर्भात कुठलाही तोडगा निघाला नसल्याने शेतकऱ्यांनी उपोषण सुरूच ठेवले आहे.
पालखेड कालव्याला आवर्तन सुटूनही शेतीसिंचनासह पिण्यासाठी बंधारे भरून न मिळाल्याने पाणी मिळावे, या मागणीसाठी लाभधारक शेतकऱ्यांनी येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. सुरेगाव, देवळाणे, देवठाण, बोकटे, खामगाव गवंडगाव, अंदरसूल येथील सुमारे १५० शेतकरी पाटबंधारे कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले असून शनिवारी (ता. २७) उपोषणाचा चौथा दिवस आहे.
२३ जानेवारी रोजी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी चारी क्रमांक ४६ ते ५२ ला पाणी सोडण्याचे आश्वासन दिले होते. पालकमंत्री दादा भुसे यांचीही लाभधारक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने २२ जानेवारी रोजी भेट घेतली होती. या वेळी मंत्री भुसे यांनी पालखेड विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र दिले होते.
कालव्याला शेती सिंचनासाठी आवर्तन दिले होते. त्या पाणी आवर्तनात अधिक पाणी दिल्याने पालखेड विभागाच्या अधिकाऱ्यांनी कालव्याचे पाणी २३ जानेवारीपूर्वीच बंद केले. यामुळे लाभधारक शेतकरी संतप्त झाले आहेत. एक तर अल्प पाऊस झाला असून जलस्रोत कोरडे आहेत. त्यात आवर्तनातून हक्काचे पाणी मिळणे अपेक्षित असताना तेच न मिळाल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.
शनिवारी (ता. २७) मारोतराव पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुणाल दराडे तसेच जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय बनकर यांनीही उपोषणस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविला. कुणाल दराडे यांनी वैभव भागवत यांच्याशी बोलणे करून शेतकरी दुष्काळी परिस्थितीत होरपळत असल्याने पाणी देऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली.
उपोषणाची दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता आमले, कार्यकारी अभियंता वैभव भागवत, तहसीलदार आबा महाजन, गटविकास अधिकारी अभिजित पारखे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकऱ्यांची बैठक झाली.
बैठकीला बाजार समितीचे संचालक अल्केश कासलीवाल तसेच शेतकरी प्रतिनिधी संजय भागवत, रामदास भागवत, रामभाऊ डुंबरे, अण्णासाहेब भागवत, शंकर सोनवणे, नाना शेळके आदी उपस्थित होते. पाटबंधारे विभागाचे भागवत यांनी पालखेड कालव्यातून दिलेल्या पाण्याची आकडेवारी सांगत आता धरणातील शिल्लक पाणी पुढील दिवसांसाठी पिण्यासाठी ठेवणे अत्यावश्यक आहे.
त्यामुळे पाणी देणे अशक्य असल्याचे सांगितले. तर शेतकरी बंधारे भरून देण्याच्या मागणीवर ठाम राहिल्याने कुठलाही तोडगा निघाला नाही. अजूनही पाणी देणे कसे शक्य आहे हे कासलीवाल व शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. अपर जिल्हाधिकारी पारधे यांनी पालकमंत्र्यांशी चर्चा करून पाणी देण्याबाबत निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.