Women Empowerment
Women EmpowermentAgrowon

Women Empowerment : 'बाएफ' संस्थेतील वरिष्ठ प्रकल्प अधिकारी मीना गांगुर्डेंनी आदिवासींच्या जीवनात पेरला आनंद

मीना गांगुर्डे या नाशिक जिल्ह्यात बाएफ संस्थेत २३ वर्षांपासून कार्यरत आहेत. दुर्गम आदिवासी भागातील विविध आव्हाने पेलत त्यांनी इथले शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आधुनिक शेती पद्धती व तंत्रज्ञान पोहोचविण्यासह महिला सक्षमीकरणाचे कार्य केले. आदिवासी शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद पेरला.

Nashik Story : नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात बाएफ या स्वयंसेवी संस्थेत वरिष्ठ प्रकल्प अधिकारी म्हणून मीना गांगुर्डे कार्यरत आहेत. त्यांचे बालपण नाशिकमध्ये गेले. शैक्षणिक जीवनात उत्कृष्ट कबड्डीपटू म्हणून विद्यापीठाचे मैदान गाजवताना पारितोषिके मिळवली.

कराटे प्रकारात ‘ग्रीन बेल्ट’ मिळवला. सामाजिक कार्य विषयात पदव्युत्तर पदवी मिळविल्यानंतर ऑक्टोबर २००० मध्ये त्या ‘बाएफ’ संस्थेसोबत जोडल्या गेल्या. या २३ वर्षांच्या प्रवासात आदिवासी भागांत कृषी व महिला सक्षमीकरण संबंधित विविध ११ प्रकल्पांवर त्यांनी यशस्वी कार्य केले आहे.

दुर्गम भागातील भौगौलिकता, समस्या लक्षात घेता तेथे काम करणे अत्यंत आव्हानात्मक असते. मात्र मीनाताईंनी ते पेलताना आदिवासींना आधुनिक शेती पद्धतीकडे वळविले. नवे तंत्रज्ञान त्यांच्यात बिंबविण्यासाठी अविरत मेहनत घेतली.

सुधारित पद्धतीने भात, आंबा, पेरू, काजू लागवडीसह वानिकी क्षेत्र वाढ, कृषिपूरक व्यवसाय स्थापन करणे आदी उपक्रम यशस्वी केले. कौटुंबिक जबाबदारी सांभाळून १० हजारांहून अधिक आदिवासी शेतकरी कुटुंबांसोबत काम केले.

सासूबाई शाहूबाई, पती संजय व मुलगा मानस असे मीनाताईंचे कुटुंब आहे. पण घरची जबाबदारी सांभाळताना समर्पित भावना व निरंतर कृतिशीलतेने शेतकऱ्यांच्या सेवेत त्यांनी कुठे कुचराई केली नाही.

Women Empowerment
Maize Seed : घरचे बियाणे वापरावर आदिवासी शेतकऱ्यांचा भर

यशस्वी प्रकल्प

ज्या प्रकल्पांमध्ये मीनाताईंचा वाटा मोलाचा राहिला, त्यातील निवडक पुढीलप्रमाणे...

-सन २०००- सुवर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना- पेठ तालुक्यात १०० बचत गट निर्मिती व ग्रामीण उद्योजकता उभारणी.

-सन २००३- त्र्यंबकेश्‍वर तालुका- ३० गावांमध्ये जनउत्कर्ष बायफवाडी प्रकल्पांतर्गत रोपवाटिका, सुधारित शेती, फुलशेतीच्या अनुषंगाने एक हजार कुटुंबासमवेत काम. दोन गावांमध्ये एक हजार हेक्टरवर पाणलोट क्षेत्रविकास.

- २००८- ‘एडीपीएम’ प्रकल्पांतर्गत तंत्रशुद्ध पद्धतीने एकहजार शेतकऱ्यांकडे भाजीपाला लागवड. त्यामुळे रोजगारासाठीचे स्थलांतर थांबले. ३५ विहिरींची बांधणी व पाइपलाइन.

-२००९- इगतपुरी तालुक्यातील पाच गावांत पाणी वापर संस्था व सामूहिक शेतीच्या अनुषंगाने पाच शेतकरी गट निर्मिती.

-२०१०- पशुधन विकास या कार्यक्रमात पर्यवेक्षक म्हणून नाशिक व जळगाव जिल्ह्यांत कार्य.

-२०१६ व २०१८- त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात ग्रामसमृद्धी कार्यक्रमांतर्गत पाच गावांत ५० महिला बचत गटांचे सबलीकरण. तेजस्विता कार्यक्रमातून बँक जोडणी.

-२०१७- ‘एसबीआय’ बँक कार्यक्रमाच्या माध्यमातून साप्ते व कोणे येथे १५ कुटुंबांसाठी बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित. शेणस्लरीपासून ‘बायोप्रोम’ खत उत्पादन व वापरासाठी विस्तार.

-२०१९- इगतपुरी तालुक्यात ६०० जनावरांसाठी ५० टक्के अनुदानावर कालवडी पैदाशीसाठी तीन वर्षांचा नाबार्ड मदतीने सॉर्टेड सिमेन कार्यक्रम.

-२०२० ते २०२१- टाटा इन्स्टिट्यूट ‘सस्टेन प्लस’ कार्यक्रमांतर्गत १०० बायोगॅस, गांडूळ खत प्रकल्प, परसबाग निर्मिती.

-२०२१ व २०२२- इगतपुरी तालुका- शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या साह्याने २५० बायोगॅस संयंत्रे कार्यान्वित. गांडूळ खत, अझोला, परसबाग निर्मिती. तीनशेहून अधिक शेतकऱ्यांकडे प्रकल्प.

Women Empowerment
Cashew MSP : काजू बीला हमीभावाची मागणी शेतकरी का करतायत?

- २०२३- त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील सहा गावांत ‘साथी प्रकल्प’ अंतर्गत चार गावांत ३५ कुटुंबांसोबत मशरूम उत्पादन, घेवडा, टोमॅटो, कोबी, काकडी, कारली लागवडीचा विस्तार, १०० शेतकऱ्यांना सुधारित गहू, तर २२५ शेतकऱ्यांना हरभरा बियाणे वितरण व क्षेत्रवाढ. गांडूळ खत व भाजीपाला रोपवाटिका उभारणीसाठी महिला शेतकऱ्यांना प्रशिक्षण व अर्थसाह्य.

तत्कालीन मुख्य कार्यक्रम समन्वयक वरिष्ठ अधिकारी किशोर चपळगावकर, एस. जी. पाटील, पशुसंवर्धन अधिकारी कमलाकर मोरगावकर, मुख्य कार्यक्रम अधिकारी सुधीर वागळे, प्रादेशिक संचालक वीरवसप्पा दयासा, तत्कालीन प्रकल्प अधिकारी श्‍याम गायधनी, सहायक प्रकल्प अधिकारी मुकुल बाविस्कर, पशुधन विकास अधिकारी निशिकांत भंगाळे, कृषी अधिकारी राहुल जाधव आदींचे मार्गदर्शन लाभले.

गांगुर्डे यांच्या पुढाकारातून स्थापित बचत गटांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याचा राज्यस्तरावर गौरव झाला आहे.

संपर्क - मीना गांगुर्डे ९४२०५८७२१०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com