Nagpur News : दोन ते ५५ रुपये अशी अत्यल्प भरपाई मिळालेल्या यवतमाळ जिल्ह्यातच काही शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल साडेपाच लाख रुपयांचा विमा परतावा जमा झाला आहे. राज्यात लाखात भरपाई घेणाऱ्या अशा शेतकऱ्यांमध्ये देखील यवतमाळने आघाडी घेतल्याचे समोर आले आहे.
घाटंजी तालुक्यातील शिवणी गावच्या दिलीप राठोड यांना ५५ रुपये ९९ पैसे परतावा मिळाल्याने त्यांनी या रकमेवर दरोडा पडेल म्हणून पोलिस संरक्षण मागितले होते. या अत्यल्प भरपाईचे पडसाद विधान परिषदेतही उमटले. त्यानंतर कृषी आयुक्तालयाकडून या प्रकरणी कृषिमंत्र्यांना या विषयी सादरकरीण करण्यात आले.
त्यानुसार राठोड यांनी वेगवेगळ्या पिकांसाठी तीन अर्ज सादर केले. यातील एका अर्जात केवळ काही गुंठे क्षेत्र संरक्षित केल्याने त्यांना ५५ रुपये भरपाई रक्कम मिळाली होती. त्यांच्या एकत्रित तीन अर्जाची भरपाई ही १ हजार रुपयांच्या घरात आहे, असे कृषी विभागाने सांगितले.
राज्यात सर्वाधिक भरपाई मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या १४ इतकी आहे. त्यामध्ये यवतमाळच्या पाच शेतकऱ्यांसह कविता तपासे (हिंगणघाट, वर्धा), विजय वाटमोडे (वर्धा), गंगाहरी मालपानी (औसा, लातूर), सुदेश नेमीव्हनाथ (औसा, लातूर), जयंत कुळकर्णी (रेणापूर, लातूर), संभा चौधरी (भिवापूर, नागपूर), विठ्ठल वाघ (परभणी), धोंडीबा सहाने (खेड, पुणे), सीताराम हांडे (जुन्नर, पुणे) यांचा समावेश आहे.
राज्यात अत्यल्प भरपाई मिळाली म्हणून यवतमाळ जिल्हा चर्चेत आला. त्याच जिल्ह्यातील पाच शेतकऱ्यांना काही लाखांत भरपाई मिळाली आहे. राज्यात लाख रुपयांची भरपाई मिळणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण यवतमाळमध्ये सर्वाधिक आहे.
त्यामध्ये झरी जामणीतील चंद्रप्रकाश छाछडा यांना सात अर्जांसाठी ५ लाख ६० हजार ६४८ रुपये, कळंबमधील किशोर यादव रुईकर यांना ४ लाख २६ हजार ७७, गोविंद गणपत रुईकर ३ लाख ७६ हजार ५७६, नारायण गणपत रुईकर ३ लाख २७ हजार ५७०, वसंत वामन सराटे यांना ३ लाख १२ हजार ९०६ रुपये इतकी विमा भरपाई मिळाली आहे.
दीड लाखांवर अर्जधारकांना कमी परतावा
काही गुंठे क्षेत्र संरक्षित करणाऱ्या शेतकऱ्यांना कमी परतावा मिळाला. परंतु त्यांना एकत्रित कर्जांपोटी किमान एक हजार रुपये देण्यात आले आहेत. दरम्यान शून्य ते १०० रुपये परतावा मिळालेले ६१७५, १०१ ते ५०० रुपये मिळालेले ४३५३३, ५०१ ते १००० रुपये मिळालेले ७७८७२ याप्रमाणे १००० रुपयांपेक्षा कमी परतावा असलेल्या अर्जाची संख्या १ लाख २७ हजार ५८० इतकी आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.