
Chh. Sambhajinagar News : वारंवार आवाहन करूनही थकित वीजबिलांचा भरणा न केल्यामुळे गेल्या २५ दिवसांत महावितरणने छत्रपती संभाजीनगर परिमंडळातील १४ हजार ४३७ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. सद्यःस्थितीत घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील वीजग्राहकांकडे अद्याप १९२ कोटी रुपयांची थकबाकी आहे.
थकबाकी वसूल करण्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम आणखी तीव्र करण्यात आली आहे. कारवार्ई टाळण्यासाठी थकित वीजबिलाचा ताबडतोब भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. महावितरणचा संपूर्ण आर्थिक डोलारा ग्राहकांकडील वीजबिलांच्या दरमहा वसुलीवरच उभारलेला आहे. वीजबिलांच्या वसूलीमधूनच महावितरणला वीजखरेदीसह विविध देणी दरमहा द्यावी लागतात.
त्यामुळे थकित वीजबिलांच्या वसुलीला मोठा वेग देण्यात आला आहे. स्वतः मुख्य अभियंता पवनकुमार कछोट हे परिमंडलात विविध ठिकाणी दौरे करून शाखा कार्यालयांपर्यंत थकबाकी वसुलीचा आढावा घेत आहेत. थकित वीजबिलापोटी वीजपुरवठा खंडित करणे व खंडित केलेल्या वीजजोडण्यांची तपासणी करण्यासाठी महावितरणचे सर्व अभियंता, अधिकारी, कर्मचारी सध्या ‘ऑन फिल्ड’ आहेत. एका महिन्याचे वीजबिल थकित असले तरी बिलाची रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू आहे.
त्यामुळे थकबाकी तसेच चालू वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. याबरोबरच थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजजोडण्यांची विभाग, मंडळ व परिमंडळ व प्रादेशिक कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्वतंत्र पथकांद्वारे पडताळणी सुरू आहे.
थकबाकीदार हा शेजाऱ्यांकडून किंवा इतर ठिकाणाहून वायर किंवा केबलद्वारे विजेचा वापर करीत असल्याचे आढळल्यास दोहोंविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. थकीत व चालू वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी या महिन्यात सुटीच्या दिवशीही महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहे. यासह घरबसल्या वीजबिल भरण्यासाठी लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना mahadiscom.in ही वेबसाइट व मोबाइल अॅपद्वारे ‘ऑनलाइन’ सोय उपलब्ध आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.