
Indapur News: ‘‘सरकारे ही नागरिकांची नसून ठेकेदार, उद्योगपती व सरकारी संपत्तीवर दरोडा टाकणाऱ्यांची आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्यातील अनेक नद्या मृत होत आहेत, तर मोठ्या धरणांपैकी एक असलेल्या उजनी धरणाची गटारगंगा झाली आहे. भीमा नदी व उजनी धरणातील प्रदूषणाचा फटका कोट्यवधी नागरिकांना बसत आहे. उजनी धरणातील प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारवर अवलंबून न राहता व्यापक जनआंदोलन उभे करण्याची आवश्यकता आहे,’’ असे प्रतिपादन मॅगसेसे पुरस्कार विजेते जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी केले.
दुर्गादेवी मंदिरांमध्ये उजनी जलाशय प्रदूषण जनजागृती कार्यक्रमांमध्ये ते बोलत होते. तत्पूर्वी डॉ. राजेंद्रसिंह यांनी उजनी जलाशयातील प्रदूषणाची पाहणी केली. कार्यक्रमासाठी नरेंद्र चुघ, विनोद बोधनकर, तेलंगणाचे व्ही. प्रकाशराव, आंध्र प्रदेशचे सत्यनारायण बोलीशेट्टी, राजेंद्र पवार, रमाकांत कुलकर्णी, सुनील रहाणे, आकांक्षा पांडे, भजनदास पवार, मारुती वणवे, हनुमंत बंडगर, तेजस देवकाते, गुराप्पा पवार, सचिन बोगावत, संपत बंडगर, रमेश धवडे, संतोष सवाणे, सीमा काळंगे, सखाराम खोत उपस्थित होते.
डॉ. राजेंद्रसिंह म्हणाले, की पुणे व पिंपरी-चिंचवड शहराला २० टीएमसी लागते. हेच पाणी उजनीतील ११७ टीएमसी पाणी प्रदूषित करते. शहरातील मैलापाणी व रासायनिक कंपन्यांमुळे उजनी धरणातील पाणी प्रदूषित झाले आहे. ज्या लोकांनी सरकार निवडले तेच सरकार मतदारांना मलमूत्र पाजत आहे, ही शोकांतिका आहे. प्रदूषणामुळे मानवी आरोग्य, शेती व जनावरे यांचे आरोग्य धोक्यात असून, लोक कर्करोगांसह त्वचा रोगाने त्रस्त आहेत. शासनाने जागे होऊन तत्काळ कठोर उपाय योजण्याची आवश्यकता आहे. प्रास्ताविक मारुती वणवे यांनी केले सूत्रसंचालन शिवदास सूर्यवंशी यांनी केले. तर आभार सचिन बोगावत यांनी मानले.
प्रदूषणमुक्तीच्या लढ्यासाठी उजनी बचाव समितीची स्थापना
डॉ. राजेंद्रसिंह यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत इंदापूर, दौंड, कर्जत करमाळा तालुक्यातील नागरिकांनी एकत्र येत उजनी बचाव समितीची स्थापना करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून डॉ. राजेंद्रसिंह, नरेंद्र चुघ, विनोद बोधनकर यांच्या मार्गदर्शनाखाली भीमा नदी व उजनी धरण प्रदूषण मुक्तीचा लढा उभारण्यात येणार आहे. उजनी प्रदूषण मुक्तीच्या निर्णायक लढ्याची या वेळी घोषणा करण्यात आली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.